संघाला जे कळले ते काँग्रेसला “वळेल” का…??; मोतीबागेचा अभ्यास करणारे कधी १० जनपथचा अभ्यास मांडू शकतील का…??


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पंतप्रधान नरेंद्र मोदींना जेव्हा दूर सारायचे तेव्हा सारेल. त्यांच्याजागी योगींना नाही, तर आणखी कोणाला आणून बसवायचे ते बसवेलही. पण भाजप पुढे जात राहील, याची व्यवस्था करेल… तशी व्यवस्था काँग्रेसमध्ये कोणी कऱणार आहे की नाही…??, हे मोतीबागेच्या जवळ राहणारे अनंतराव गाडगीळ हे १० जनपथला किंवा २४ अकबर रोडला विचारणार आहेत की नाहीत…??, हा खऱ्या शोधाचा राजकीय प्रश्न आहे. RSS may sidelind PM modi… but will congress be able to remove sonia or rahul gandhi from leadership??


काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अनंतराव गाडगीळ यांनी एक जबरदस्त जावईशोध लावला आहे. एक तर बरेच दिवसांनी बोललेत त्यामुळे ते अजूनही काँग्रेसमध्ये सक्रीय आहेत आणि ते प्रदेश प्रवक्ते आहेत, हे लोकांच्या नाही, तर निदान पत्रकारांच्या तरी लक्षात आले आहे.

पण त्यांनी लावलेला जावईशोध मात्र, त्यांचे स्वतःचे राजकीय अस्तित्व दाखवून देण्यापेक्षाही मोठा आहे. तो म्हणजे, “पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता ओसरली की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतःहून त्यांना बाजूला सारेल. त्यांचा अडवानी करेल,” हा तो जबरदस्त, तडाखेबंद जावईशोध आहे…!!

अनंतराव गाडगीळांना राजकारणाची परंपरा मोठी आहे. त्यांचे आजोबा काकासाहेब गाडगीळ हे पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळातले नभोवाणीमंत्री, नंतर पंजाबचे गाजलेले राज्यपाल, मोठे साहित्यिक. अनंतरावांचे वडील विठ्ठलरावही तितकेच राजकीय कर्तबगार. अखिल भारतीय काँग्रेसचे वरिष्ठ सरचिटणीस, केंद्रीय मंत्री, वर्षानुवर्षे प्रवक्ता राहिलेले. आणि प्रवक्ता राहूनही पत्रकारांपुढे नांगी टाकण्याऐवजी त्यांनाच पेचात पकडणारे आणि ऑफ द रेकॉर्ड दिल्लीतल्या भरपूर बातम्या देणाऱे खरोखरच आदरणीय असे प्रवक्ते. इंदिरा गांधींपासून नरसिंह राव, सीताराम केसरींपर्यंत सर्व काँग्रेस अध्यक्षांचे अत्यंत विश्वासू प्रवक्ते.

अनंतराव हे काकासाहेबांचे नातू आणि विठ्ठलरावांचे चिरंजीव आहेत. पण त्यांचे राजकीय कर्तृत्व अद्याप तरी महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले आहे. काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर एकदा संधी दिली आहे. सध्या ते पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आहेत. ते बऱ्याच दिवसांनी बोलले आहेत.



पण ते जे बोललेत ते फार महत्त्वाचे आहे. संघाच्या कार्यपध्दतीवर त्यांनी भाष्य करून थेट मोदींनाच दूर सारण्याचे धाडसी राजकीय भाकित त्यांनी केले आहे. पण त्यात तथ्य जरूर आहे. खरेच मोदींची लोकप्रियता ओसरली तर संघ मोदींना बाजूला नक्की सारेल. किंबहुना तशी संघाची परंपरा असल्याचे अनंतरावांनी “गरज सरो वैद्य मरो”, या मराठी म्हणीचा आधार घेऊन सांगितले आहे. ते देखील काही प्रमाणात खरे आहे. पण त्यासाठी त्यांनी वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवानींचे जे उदाहरण दिले आहे, ते राजकीयदृष्ट्या अर्धसत्य आहे. कारण संघाचा आणि त्यावेळचा राजकीय इतिहास तसे सांगत नाही.

लालकृष्ण अडवानींना संघाने बाजूला सारले हे खरे आहे. पण ते “गरज सरो वैद्य मरो” या म्हणीनुसार दूर सारलेले नाही. अजिबातच नाही. उलट अडवानींना २००४ आणि २००९ च्या निवडणूकीत संपूर्ण अधिकाराची नेतृत्वाची संधी संघाने अडवानींना दिली होती. त्यावेळी भाजप जर सर्वांत मोठा पक्ष बनून पुढे आला असता, तर अडवानीच पंतप्रधान झाले असते. इतर कोणीही नाही, हा नजीकच्या काळात घडलेला इतिहास आहे. २००९ मध्ये तर अडवानींचे नाव अधिकृतरित्या पंतप्रधानपदासाठी जाहीर करून भाजपने निवडणूक लढवली होती. पण या दोन्ही निवडणूकांमध्ये भाजपला अपयश आले आणि तिथून संघ – भाजपमध्ये नेतृत्वबदलाचे मंथन सुरू झाले. याकडे काणाडोळा करता येणार नाही.

आणि अडवानीच कशाला… संघाचा जुना इतिहास तपासून पाहिला तर बलराज मधोक, खुद्द अटलबिहारी वाजपेयी यांनाही संघाने बाजूला सारलेच होते की. १९७० च्या दशकात बलराज मधोकांना बाजूला सारले. १९८५ च्या निवडणूकीत भोंगळ गांधीवादी समाजवाद तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केल्यानंतर भाजपचे २ खासदार लोकसभेत पोहोचले होते. त्यानंतर वाजपेयींना संघाने बाजूला सारूनच अडवानींना नेतृत्व दिले होते. त्यांनी पुढच्या ५ वर्षांत भाजपला २ खासदारांवरून ८६ खासदार संख्येवर नेले होते.

त्यामुळे संघात किंवा भाजपमध्ये नेतृत्व देणे आणि बाजूला सारणे ही प्रक्रिया काही नवीन नाही किंवा ती फक्त मोदी – अडवानींच्याच बाबतीत अमलात आणायची बाब नाही. ती राजकीय परिस्थितीनुसार संघात सर्वसामान्य बाब राहिली आहे आणि त्यामध्ये १०० टक्के राजकारणाचा भाग आहे… यात लपविण्यासारखे काही नाही.

… पण फक्त प्रश्न आहे, मोतीबागेजवळ राहून संघाच्या कार्यपध्दतीचा अभ्यास करणारे अनंतराव गाडगीळ ते स्वतः ज्या पक्षात आहेत, त्या काँग्रेस पक्षाच्या कार्यपध्दतीचा अभ्यास कधी करणार आहेत की नाहीत…?? त्यांच्या पक्षात अतिवरिष्ठ पातळीवर नेतृत्वाला दूर सारण्याची अर्थात बदलाची प्रक्रिया वर्षानुवर्षे थांबलेलीच आहे. एक नव्हे, सलग दोन लोकसभा निवडणूकीत दारूण पराभव, अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणूकांमध्ये पराभव. कितीतरी राज्यांमधून पक्ष संघटना संपूर्ण wipe out. अशी स्थिती असताना काँग्रेस पक्षात अजूनही बदल झालेला नाही. अजूनही तोच अध्यक्ष आणि तेच दोन स्टार प्रचारक…!!

आता तर कोरोनाचे कारण देऊन काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक अमर्याद काळापर्यंत लांबणीवर टाकली आहे. म्हणजे परत त्याच नेतृत्वाची पक्षावर पकड कायम. अशा स्थितीत बदल होणार कसा…?? आणि तो करायचा कोणी…?? काँग्रेसच्या या कार्यपध्दतीवर अनंतराव गाडगीळ काही संशोधन करणार आहेत की नाही…?? हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे.

संघ मोदींना जेव्हा दूर सारायचे तेव्हा सारेल. त्यांच्याजागी योगींना नाही, तर आणखी कोणाला आणून बसवायचे ते बसवेलही. पण भाजप पुढे जात राहील, याची व्यवस्था करेल… तशी व्यवस्था काँग्रेसमध्ये कोणी कऱणार आहे की नाही…??, हे मोतीबागेच्या जवळ राहणारे अनंतराव गाडगीळ हे १० जनपथला किंवा २४ अकबर रोडला विचारणार आहेत की नाहीत…??, हा खऱ्या शोधाचा राजकीय प्रश्न आहे.

RSS may sidelind PM modi… but will congress be able to remove sonia or rahul gandhi from leadership??

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात