विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकावरून राज्यातील राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या विधेयकामुळे 50 टक्के जागा वाढणार असतील तर पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक विचार करू आणि ‘इंडिया’ आघाडीशी चर्चा करू, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. त्यानंतर पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेचा दाखला देत विधेयकाला पाठिंबा असल्याचे संकेत दिले आहेत; मात्र दुसरीकडे खासदार अमोल कोल्हे यांनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. Jitendra Awhad
‘माझ्या दैवताची जी भूमिका तीच माझी’: जितेंद्र आव्हाड; कन्या नताशा आव्हाड यांचा मात्र विधेयकाला विरोध
जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य: रुग्णालयात शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, डिलिमिटेशन ही घटनात्मक प्रक्रिया असून ती अनिवार्य असते, असे शरद पवार यांनी यापूर्वीच अनौपचारिक चर्चेत म्हटले होते. “साहेब हे माझे दैवत आहेत, त्यांची जी भूमिका तीच माझी भूमिका आहे,” असे स्पष्ट करत सुप्रिया सुळे यांनी 8 खासदारांना सोबत घेऊन याबाबत निर्णय घेतल्याची माहिती आव्हाड यांनी दिली. तसेच, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना, 1986 पासून आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याने निष्ठा काय असते हे आपल्याला माहीत असल्याचे आव्हाड म्हणाले.
खडकवासला-फुरसुंगी बोगद्याचे ६ किलोमीटर काम पूर्ण; दौंड, इंदापूर, बारामतीला मिळणार दिलासा
नताशा आव्हाड यांची टीका: दुसरीकडे, जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत डिलिमिटेशन विधेयकाला विरोध दर्शवला आहे. हे विधेयक लोकशाहीवर थेट आघात करणारे असल्याची टीका त्यांनी केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले असल्याने त्याची अंमलबजावणी करण्याची संधी भाजपकडे होती; त्यामुळे आता डिलिमिटेशनच्या चर्चेत महिला आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करणे दिशाभूल करणारे आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप नताशा आव्हाड यांनी केला आहे.
विधेयकाचा मसुदा आल्यावरच अंतिम निर्णय: खासदार अमोल कोल्हे; तर पृथ्वीराज चव्हाण यांचा अटींसह पाठिंबा
खासदार अमोल कोल्हे यांचे स्पष्टीकरण: एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले की, डिलिमिटेशनला पाठिंबा देण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. माध्यमांतून समोर आलेल्या 2-3 मुद्द्यांना सकारात्मक समजून जितेंद्र आव्हाड यांनी कदाचित ही प्रतिक्रिया दिली असावी; परंतु विधेयकाचा अधिकृत मसुदा (ड्राफ्ट) हातात आल्याशिवाय निर्णय घेता येणार नाही आणि मसुदा आल्यानंतर सर्व खासदार एकत्र बसून चर्चा करतील, असे कोल्हे यांनी स्पष्ट केले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, विधेयकातील नेमक्या तरतुदी पाहिल्याशिवाय अंतिम भूमिका घेता येणार नाही, मात्र काँग्रेसचा डिलिमिटेशनला विरोध नाही. परिसीमन करताना राज्यांची तुलनात्मक जागांची संख्या बदलू नये जेणेकरून कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही, अशी मागणी चव्हाण यांनी केली. तसेच, महिला आरक्षण लागू करण्यासाठी डिलिमिटेशन करत असल्याचा सरकारचा दावा खोटा असून त्यातून जनतेची फसवणूक केली जात असल्याचा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App