कोणतं दूध प्यावं, सुटं की पॅकेटमधलं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सुरक्षित पर्याय; ग्राहकांना महत्त्वाचा सल्ला

Tukaram Mundhe

विशेष प्रतिनिधी

बाजारात मिळणारे दूध नेमके कोणते खरेदी करावे, असा प्रश्न अनेक ग्राहकांना पडतो. यावर राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. सुटे दूध खरेदी करणे टाळा आणि पाश्चराइज्ड दूध सीलबंद पॅकेटमधूनच खरेदी करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दैनंदिन जीवनात दूध हा प्रत्येक घरातील महत्त्वाचा खाद्यपदार्थ आहे. सकाळचा चहा, कॉफी, लहान मुलांचा आहार किंवा इतर पदार्थांसाठी बहुतांश घरांमध्ये दररोज दूध खरेदी केले जाते. मात्र, बाजारात मिळणारे दूध सुरक्षित आहे का, त्याची साठवण योग्य पद्धतीने केली जाते का आणि कोणत्या प्रकारचे दूध वापरावे, याबाबत ग्राहकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

सुटे दूध खरेदी करू नका; मुंढेंचा सल्ला

अलीकडेच एका पत्रकार परिषदेत बोलताना तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना दुकानांमधून सुटे दूध खरेदी न करण्याचा सल्ला दिला. तुम्ही थेट शेतकऱ्यांकडून कच्चे दूध खरेदी करत असाल तर ते घेऊ शकता. मात्र, दुकानातून सुटे दूध विकत घेणे टाळावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

पाश्चराइज्ड दूध वापरत असाल तर ते सीलबंद पिशवी किंवा पॅकेटमधूनच खरेदी करावे. दूध खरेदी करताना त्याची उत्पादन तारीख आणि एक्सपायरी डेट तपासणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे मुंढे यांनी सांगितले.

दुधाच्या साठवणुकीकडेही लक्ष द्या!

दूध खरेदी करताना केवळ त्याच्या गुणवत्तेकडेच नव्हे, तर साठवणुकीकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. दुकानातील फ्रिजमध्ये दूध योग्य तापमानात ठेवले आहे का, याची खात्री ग्राहकांना नसते. सुटे दूध ज्या टँकरमधून आणले जाते, तो स्वच्छ आहे का, याबाबतही शंका असू शकते.

दुधाचे तापमान साधारण ४ अंश सेल्सिअस असणे आवश्यक आहे. गायीचे किंवा म्हशीचे दूध काढल्यानंतर ते दोन तासांपेक्षा अधिक काळ सामान्य तापमानात उघड्यावर ठेवल्यास त्यामध्ये आम्लता वाढवणारे घटक तयार होऊ शकतात, असेही मुंढे यांनी स्पष्ट केले.

तूप, लोणी आणि तेलातील भेसळीवरही कारवाईचा इशारा

दरम्यान, केवळ दुधाबाबतच नव्हे, तर तूप, लोणी आणि वनस्पती तेलातील भेसळीबाबतही तुकाराम मुंढे यांनी विक्रेत्यांना कडक इशारा दिला आहे. या पदार्थांमध्ये प्राण्यांच्या चरबीची भेसळ केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

तसेच कोणताही ठोस आधार नसताना ‘शुद्ध देसी तूप’ किंवा ‘शुद्ध दूध’ असे दावे करून ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्यांनाही सोडले जाणार नाही. ग्राहकांनी अशा प्रकारची विक्री आढळल्यास अन्न व औषध प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

एकूणच, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना ग्राहकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असून, सुरक्षित अन्नपदार्थांची निवड करण्यासाठी उत्पादनाची तारीख, एक्सपायरी डेट, पॅकेजिंग आणि साठवणुकीच्या अटी तपासणे महत्त्वाचे असल्याचे या सूचनांमधून स्पष्ट झाले आहे.

Tukaram Mundhe suggested a safe alternative

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात