विशेष प्रतिनिधी
मुंबई: विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी महायुतीतील घटकपक्षांमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या सुरू असलेल्या चर्चांना मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी पूर्णविराम दिला आहे. “एकाच छताखाली राहणाऱ्या दोन सख्ख्या भावांमध्येही काही मुद्द्यांवरून मतभेद होऊ शकतात, मात्र मतभेद झाले तरी मनभेद नसतात. महायुतीमधील दोन नेत्यांमधला किंवा दोन व्यक्तींमधील वैयक्तिक वाद म्हणजे थेट भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमधील संघर्ष असा अर्थ काढणे साफ चुकीचे आहे. विरोधकांनी उगाच दिवास्वप्ने पाहू नयेत; महायुती अजिबात बॅकफूटवर गेलेली नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली फ्रंटफूटवर येऊनच महाराष्ट्राच्या विकासाची धडाकेबाज बॅटिंग करत आहे,” अशा शब्दांत अमित साटम यांनी विरोधकांना सुनावले आहे.
आज 31 ऑक्टोबर 2026 रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना साटम यांनी महायुतीतील समन्वय, आगामी निवडणुकांचे अंतर्गत ऑडिट, राहुल गांधींचे अराजकतेचे राजकारण, रोहित पवारांची विधाने आणि महाराष्ट्राच्या 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या संकल्पावर परखड भाष्य केले.
1. “दोन भावांमध्ये वाद होतात, पण पक्ष वेगळे नाहीत; निलेश राणे-नवनाथ बन वादावर खुलासा” गेल्या काही दिवसांत महायुतीतील नेत्यांमध्ये रंगलेल्या शाब्दिक युद्धावर पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करताना साटम म्हणाले:
दोन व्यक्तींचा वाद पक्षाचा वाद नव्हे: “प्रसाद लाड-रामदास कदम किंवा निलेश राणे-नवनाथ बन यांच्यातील संघर्ष हा त्या त्या नेत्यांमधील वैयक्तिक भूमिकेचा विषय असू शकतो. विशिष्ट मुद्द्यांवरून नेत्यांमध्ये मते वेगळी असू शकतात, पण त्याला दोन प्रमुख पक्षांमधील युद्ध किंवा फूट म्हणणे हा बालिशपणा आहे.”
एकनाथ शिंदेंना पत्राची बातमी धादांत खोटी: “शिवसेनेच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी पदवीधर निवडणुकीत विरोधात काम केले त्यांच्यावर कारवाई करावी, असे कोणतेही पत्र मी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेले नाही. या केवळ विरोधकांनी आणि काही घटकांनी जाणीवपूर्वक पसरवलेल्या वावड्या आहेत.”
महाराष्ट्र ‘न्यूमेरो उनो’ बनवण्याचा ध्यास: “ठाण्यातील स्थानिक विषय असो वा संजय गायकवाड यांचे विधान, यामुळे सरकार बॅकफूटवर गेले हा विरोधकांचा दावा पूर्णपणे पोकळ आहे. तिन्ही प्रमुख नेते आजही एकत्र असून महाराष्ट्राला देशात क्रमांक 1 (न्यूमेरो उनो) करण्याचे काम वेगाने सुरू आहे.”
2. “2029 पर्यंत भारत 5 ट्रिलियन, तर महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था ठरणार!” महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचा ताळेबंद मांडताना त्यांनी महायुती सरकारच्या व्हिजनचा पुनरुच्चार केला:
फडणवीसांचे नेतृत्व ऐतिहासिक: “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2029 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठणार आहे. त्या ऐतिहासिक क्षणी एकट्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलरची झालेली असेल. याचे संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणांना जाते.”
निवडणुकीतील पराभवाचे अंतर्गत ऑडिट करणार: “लोकशाहीत निवडणुकांचे निकाल वर-खाली होत असतात, हा सत्ताकारणाचा स्वाभाविक भाग आहे. विधानपरिषदेत 1 ते 2 जागांवर निकाल अपेक्षेप्रमाणे का आले नाहीत आणि जनमत मिळवण्यात आम्ही कुठे कमी पडलो, याचे संघटनात्मक ऑडिट आम्ही नक्की करू. मात्र यामुळे सरकारच्या स्थैर्याला कोणताही धोका नाही.”
3. “सरदार पटेलांनी 565 संस्थाने जोडली, राहुल गांधी देशाला तोडण्याचा प्रयत्न करतायत” सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त काँग्रेस आणि राहुल गांधींवर हल्ला चढवताना ते म्हणाले:
565 संस्थानांचे ऐक्य: “1947 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी 565 संस्थानांचे विलीनीकरण करून आजचा अखंड भारत निर्माण केला. आपण एकसंध राहिलो नाही तर देश अराजकतेकडे जाईल, अशी ताकीद त्यांनी तेव्हाच दिली होती.”
79 वर्षांनंतर काँग्रेसची नौटंकी: “आज बरोबर 79 वर्षांनंतर राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष केवळ सत्ता काबीज करण्यासाठी देशात फूट पाडून अराजकता माजवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. मात्र हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा देश आहे. येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला देशाच्या इतिहासातील सर्वात कमी जागा मिळतील आणि जनता त्यांना धडा शिकवेल.”
4. “अक्कल कमी आणि पगार जास्त असणाऱ्यांना उत्तर देणे शासनाला ठाऊक आहे!” नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या 35,000 कोटी रुपयांच्या नियोजित खर्चावरून आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांचा साटम यांनी समाचार घेतला:
रोहित पवारांवर खोचक टोला: “विरोधकांकडे सध्या काहीही काम उरलेले नाही. रोज रात्री डोके खाजवून नवे विषय शोधायचे आणि सकाळी उठून सोशल मीडियावर ट्वीट करायचे, एवढाच उद्योग उरला आहे. त्यातही तुम्ही ज्यांचे नाव घेतले, त्यांची अवस्था ‘अक्कल कमी आणि पगार जास्त’ अशी झाली आहे.”
सरकारचे हात आणि मन स्वच्छ: “कुंभमेळा असो वा कर्जतचा पंप स्टोरेज प्लांट, विरोधकांच्या प्रत्येक खोट्या आरोपाला चोख उत्तर देण्याची समर्थता सरकारमध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये आहे. आमचे हात स्वच्छ आहेत आणि मनही साफ आहे. शेवटच्या घटकाची सेवा करण्याचे काम हे सरकार अविरतपणे करत राहील.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App