विशेष प्रतिनिधी
पुणे : हर्षदाला मी गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. मागील दहा-बारा वर्षांपासून ती समाजकारणात व राजकारणात सक्रीय आहे. राजकारणाची जाण, भविष्याचा वेध घेण्याची क्षमता मला तिच्यात दिसून येते. पुरोगामी विचारांचा वारसा ती सक्षमपणे चालवेल याची मला खात्री आहे. उत्कृष्ट माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्यामुळे तिला समाजकारणाची ओढ लागली आहे. पदवीधरांचे प्रश्न ती विधिमंडळात प्रभावीपणे मांडेल. महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार बहुमताने विजयी होतील असा मला विश्वास आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.
पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिरात पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते जयंत पाटील, कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार बापूसाहेब पठारे, माजी खासदार अशोकराव मोहोळ, माजी आमदार उल्हासदादा पवार, जगन्नाथ शेवाळे, मोहन जोशी, माजी आमदार जयदेव गायकवाड, सारंग पाटील, विशाल तांबे, प्रकाश म्हस्के, प्रभाकर देशमुख, शिवाजीराव खांडेकर, शरदचंद्र धारुरकर, ज्ञानेश्वर कानडे, अंकुश काकडे, चंदूशेठ कदम, काका पलांडे, श्रीकांत पाटील, देवदत्त निकम, डॉ. सुदर्शन घेर्डे तसेच उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव व जयंत आसगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, हर्षदा देशमुख-जाधव ह्या आदर्श आमदार म्हणून विधानपरिषद गाजवतील याची मला खात्री आहे. जयंत आसगावकरांना आमदारकीचा अनुभव आहेच. सध्याची परिस्थिती पाहता आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. सध्या देशात, राज्यात अतिशय वाईट परिस्थिती आहे. देशातील आणि महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा झाला आहे. भाजप सरकार फक्त दिवास्वप्न दाखवत आहे जे खरं होणार नाही. आपण सर्वांनी जिद्दीने काम केलं तर आपले दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील हा विश्वास मला आहे.
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते जयंत पाटील म्हणाले, भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. भाजपने राष्ट्रवादी व शिवसेनेवर अविश्वास दाखवत जिथे त्यांचे आमदार आहेत तिथे भाजपचे निरीक्षक नेमले आहेत. त्यामुळे आपण मतदारांपर्यंत पोहचलो तर विजय आपलाच आहे. देशात बदलेल्या वातावरणाचा चांगला अंदाज या सुशिक्षित मतदारांना आहे. सरकारच्या विरोधी जनमत आहे हे सिध्द करण्यासाठी हे मतदार महाविकास आघाडीच्या उमेदवारांना साथ देतील याची खात्री आहे.
कॉंग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, आपला देश हा लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे गेलेला आहे. जनतेचा संपुर्ण व्यवस्थेतेवरचा विश्वास उडालेला आहे. भाजपचा सध्या सुरु असलेला पैसा फेक, तमाशा देख हा प्रकार समूळ नष्ट करायचा आहे. त्यामुळे पदवीधर व शिक्षकांना आपल्याला विचारांना योग्य दिशा देणारे नेतृत्व निवडण्याची ही संधी आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार विजयी करुन स्वाभिमानी मतदार पैशावर विकला जात नाही हे सर्वांनी दाखवून द्यायचे आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, शिक्षणाची पंढरी असलेला पुणे जिल्हा क्रांती करणारा जिल्हा आहे. अन्याय, हुकूमशाही, दडपशाही व आंदोलन चिरडण्याचा प्रकार सुरु असताना परिवर्तनाची नितांत गरज आहे. या मतदारसंघातील मतदारांच्यात सत्तेच्या विरोधात रोष आहे त्यामुळे विजय आपलाच आहे.
२०२९ ला केंद्रातील व राज्यातील अपयशी सरकार पदच्युत होणार आहे हे निश्चित.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, विधानपरिषदेत महाविकास आघाडीचा आवाज बुलंद करण्यासाठी आपले दोन्ही उमेदवार आपल्याला बहुमताने निवडून द्यायचे आहेत. ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता नाही तर परत कधी नाही या ध्येयाने निवडणूक हातात घ्यावी.
आमदार विश्वजीत कदम म्हणाले, मतदारांना प्रत्यक्ष भेटून ही निवडणूक आपल्याला यशस्वी करायची आहे. यासाठी सूक्ष्म नियोजन महत्वाचे आहे. हर्षदा देशमुख-जाधव या अतिशय चांगल्या पध्दतीने काम करत असून त्यांना पदवीधरांच्या प्रश्नांची जान व भान आहे. जयंत आसगावकर हे अभ्यासू उमेदवार आहेत. सत्ताधाऱ्यांचा माज उतरवला जाऊ शकतो हे जेन झी ने दाखवून दिले आहे. त्यामुळे जनसामान्यांच्यात धाडस आलं आहे. या निवडणुकीत सुशिक्षित मतदार आहेत त्यांनी दाखवून द्यायचंय की आम्ही सुध्दा परिवर्तनाचे शिलेदार आहोत.
पुणे पदवीधरच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव म्हणाल्या, पुणे हा दिशादर्शक जिल्हा आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या संकल्पनेला आकार देणारा हा जिल्हा आहे. आज सर्वत्र जो जनआक्रोश दिसतोय त्याला वाचा फोडण्याची संधी या निवडणुकीच्या माध्यमातून आली आहे. आज शाहू, फुले, आंबेडकर यांची शिक्षणाची संस्कृती जोपासण्याची व पुढे नेण्याची गरज आहे. मी या निवडणुकीची तयारी मागील दीड दोन वर्षांपासून करत आहे. मी अचानक या निवडणुकीत उतरलेले नाही रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी शिक्षणाला कौशल्याची जोड देण्याची गरज आहे. शरद पवार यांनी भविष्याचा विचार करुन महिला व युवकांना मोठ्या प्रमाणात संधी दिली त्यामुळेच आज आम्ही आत्मविश्वासाने समाजात वावरत आहोत. यावेळी माजी खासदार अशोकराव मोहोळ जयंत आसगावकर, शिवाजीराव खांडेकर, ज्ञानेश्वर कानडे, डॉ. सुदर्शन घेर्ड, प्रशांत जगताप, अंकुश काकडे यांनी मनोगत व्यक्त केले. तर दीप्ती चौधरी यांनी प्रास्ताविक केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App