विशेष प्रतिनिधी
मुंबई : दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी ५ हजार रुपये देण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्याच्या अनेक भागांत सध्या दुष्काळसदृश परिस्थिती आहे. खरिपाचे झालेले नुकसान आणि जवळ आलेली दिवाळी यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ५ हजार रुपये जमा करण्याची घोषणा केली आहे. दिवाळीच्या सणापूर्वीच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे. Maharashtra Government
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या निर्णयाची माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात असलेल्या दुष्काळी परिस्थितीबाबत तुम्हा सर्वांना कल्पना आहे. या दुष्काळी परिस्थितीत पहिल्यांदा आपण २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता. त्यानंतर काही तालुक्यांतून तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर ट्रिगर १ आणि ट्रिगर २ चा आढावा घेऊन राज्यातील एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. आधीच्या २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या संख्येत आणखी ४० तालुक्यांची भर पडली आहे. त्यामुळे दुष्काळात होरपळत असलेल्या बहुतांश महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दुष्काळात देण्यात येणाऱ्या १२ सवलती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज्याच्या मंत्रिमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रसेवेचा गौरव करणारा ठराव एकमताने मंजूर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठरावाची माहिती देताना सांगितले की, मोदींनी सलग २५ वर्षे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून काम करताना ‘प्रधानसेवक’ हीच भूमिका जपली. ‘संविधान हाच आपला धर्मग्रंथ’ मानून त्यांनी देशात ‘अंत्योदय’ आणि ‘गुड गव्हर्नन्स’चे नवे मॉडेल प्रस्थापित केले. ३७० कलम हटवणे, राम मंदिर निर्मिती, आणि सर्जिकल स्ट्राईक यांसारखे ऐतिहासिक निर्णय त्यांच्याच नेतृत्वात झाले.
फडणवीस यांनी आपल्या माहितीतून मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरही भर दिला. अलीकडेच मराठी भाषेला मिळालेला ‘अभिजात दर्जा’, नौदलाच्या ध्वजावर विराजमान झालेली शिवरायांची राजमुद्रा आणि १२ गडकिल्ल्यांना जागतिक वारसा मिळवून देण्यासाठी झालेले प्रयत्न, हा महाराष्ट्राचा मोठा सन्मान असल्याचे ते म्हणाले.
याशिवाय, संरक्षण कॉरिडॉर, छत्रपती संभाजीनगरमधील ‘ऑरिक सिटी’ आणि स्टार्टअप क्षेत्रातील राज्याची घोडदौड यामागे पंतप्रधान मोदींचे भक्कम पाठबळ असल्याचेही या अभिनंदनाच्या ठरावातून स्पष्ट करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिल येथील स्मारकासाठी मिळालेली जागा आणि सामाजिक समतेचे विचार रुजवण्यासाठी घेतलेले पुढाकार या सर्वांचा या ठरावात विशेष कृतज्ञतापूर्वक उल्लेख करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App