विशेष प्रतिनिधी
मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या नव्याने सुरू झालेल्या सीबीआय तपासाच्या पार्श्वभूमीवर दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी गुरुवारी मुंबईतील सीबीआय कार्यालयात एक पेनड्राइव्ह सादर केला. या पेनड्राइव्हमध्ये दिशा यांच्या मृत्यूशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आलेला विविध पुरावा असल्याचे वकील ओझा यांनी सांगितले.
वकील निलेश ओझा हे दुपारी सुमारे २.०५ वाजता सीबीआय कार्यालयात पोहोचले. त्यांच्यासोबत सतीश सालियनही उपस्थित होते. सीबीआयकडे पुरावे सादर केल्यानंतर ओझा यांनी माध्यमांशी संवाद साधताना पेनड्राइव्हमध्ये विशेषतः घटना पाहिल्याचा दावा करणाऱ्या प्रत्यक्षदर्शीची व्हिडिओ साक्ष असल्याचे सांगितले.
ओझा यांच्या म्हणण्यानुसार, पेनड्राइव्हमध्ये घटनेचा कथित प्रत्यक्षदर्शी आणि पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर झालेल्या कथित प्रकाराशी संबंधित माहिती आहे. या प्रत्यक्षदर्शीची माहिती प्रकरणातील कथित बाबी स्पष्ट करण्यासाठी महत्त्वाची असल्याचा दावा त्यांनी केला. याशिवाय, आणखी एका प्रत्यक्षदर्शीची माहिती दस्तऐवज आणि पेनड्राइव्हच्या माध्यमातून सीबीआयला देण्यात आल्याचे ओझा यांनी सांगितले.
‘मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प महाविकास आघाडीने गुंडाळला’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप
या प्रकरणात काही उच्चप्रोफाइल व्यक्तींचा सहभाग असल्याचा दावा ओझा यांनी केला. तसेच, संबंधित व्यक्ती आता केवळ संशयित नसून एफआयआरमध्ये त्यांची नावे आरोपी म्हणून नमूद असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. त्यांच्या अटकेची मागणीही सीबीआयसमोर करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, कोणत्याही व्यक्तीला आरोपी म्हणून अंतिमतः जबाबदार धरण्यापूर्वी तपासातील पुराव्यांच्या आधारे कायदेशीर निष्कर्ष निघणे आवश्यक आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात तपासादरम्यान उपलब्ध होणाऱ्या सामग्रीच्या आधारे वाजवी संशय निर्माण करण्यास पुरेसा आधार असल्याचे तपास अधिकाऱ्याला वाटल्याशिवाय कोणालाही आरोपी मानू नये, असे स्पष्ट केले आहे.
दिशा सालियन यांचा जून २०२० मध्ये मालाड येथील एका गृहनिर्माण संकुलातील १४व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. मुंबई पोलिसांच्या तपासात या मृत्यूमध्ये घातपात नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता.
मात्र, दिशा यांच्या मृत्यूच्या परिस्थितीबाबत संशय व्यक्त करत त्यांचे वडील सतीश सालियन यांनी वकील निलेश ओझा यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने १३ सप्टेंबर रोजी एफआयआर दाखल करून तपास सुरू केला. हा एफआयआर सतीश सालियन यांच्या जबाबाच्या आधारे दाखल करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
आता सीबीआयकडे पेनड्राइव्हसह अन्य कथित पुरावे सादर करण्यात आल्याने तपासाची दिशा त्याआधारे पुढे जाण्याची शक्यता आहे. सादर करण्यात आलेल्या सामग्रीची सत्यता, त्यातील दाव्यांची पडताळणी आणि त्यांचा प्रकरणाशी असलेला संबंध तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App