साठा असलेल्या कारखान्यांना वाढलेल्या दराचा लाभ; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे भाष्य

विशेष प्रतिनिधी

बारामती : साखरेच्या दरात झालेल्या अचानक वाढीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून, या दरवाढीचा फायदा साखर कारखाने आणि पर्यायाने शेतकऱ्यांना होऊ शकतो, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले आहे. मात्र, सध्या अनेक कारखान्यांकडे साखरेचा साठा उपलब्ध नसल्याने प्रत्यक्ष फायदा कोणाला होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

इंदापूर येथे रविवारी (ता. 23) माध्यमांशी बोलताना भरणे यांनी साखरेच्या वाढलेल्या दरावर भाष्य केले. गेल्या काही दिवसांत साखरेच्या दरात झालेली वाढ अनपेक्षित असल्याचे सांगत, केंद्र सरकारपासून साखर उद्योगातील सर्व घटक या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.

ऑगस्ट महिन्यासाठी केंद्र सरकारने २२ लाख मेट्रिक टन साखरेचा कोटा जाहीर केला आहे. देशांतर्गत वापरासाठी साधारण २० ते २२ लाख टन साखरेची आवश्यकता असते. असे असताना साखरेच्या दरात अचानक आठ ते दहा रुपयांची वाढ कशी झाली, हा प्रश्न असल्याचे भरणे यांनी सांगितले.



दरम्यान, साखरेच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दहा लाख मेट्रिक टन कच्ची साखर आयात करण्यास परवानगी दिल्याचा उल्लेखही त्यांनी केला. साखर उद्योग सरकारसोबत असून, ग्राहक, शेतकरी आणि उद्योग या तिन्ही घटकांचा समतोल राखणारे धोरण आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ज्या साखर कारखान्यांकडे सध्या साखरेचा साठा उपलब्ध आहे, त्यांना वाढलेल्या बाजारभावाचा फायदा मिळू शकतो. कारखान्यांना मिळणाऱ्या या फायद्याचा काही प्रमाणात लाभ शेतकऱ्यांनाही होऊ शकतो, असे भरणे यांनी सांगितले. मात्र, अनेक कारखान्यांकडे सध्या साखरेचा साठा उपलब्ध नसल्याने परिस्थितीचे पुढील चित्र बाजारातील घडामोडींवर अवलंबून राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

साखर उद्योगासमोर दीर्घकालीन नियोजनाचे आव्हान असल्याचेही भरणे यांनी नमूद केले. ऊस उत्पादन, साखरेची रिकव्हरी, इथेनॉल निर्मिती, साखरेची निर्यात आणि आयात या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून पुढील पाच ते दहा वर्षांसाठी स्थिर धोरण आखणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, साखरेच्या किमान आधारभूत दराबाबत बोलताना एमएसपी ४३०० रुपये करण्याच्या मागणीशी आपण सहमत असल्याचे भरणे यांनी सांगितले. यासाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Sugar Price Surge Raises Concern; Bharane Says Farmers Could Benefit

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात