विशेष प्रतिनिधी
मुंबई : वाढती महागाई आणि विविध आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना जाहीर होणाऱ्या दिवाळी भेटीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी भेट म्हणून २० हजार रुपये देण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना निवेदन देण्यात आले आहे. Pratap Sarnaik
मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाच्या मुख्यालयात प्रताप सरनाईक आले असताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत निवेदन सादर केले. एसटी कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीनिमित्त आर्थिक स्वरूपात भेट दिली जाते. मात्र, यंदा महागाई वाढल्याने या रकमेत वाढ करणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे. इतर आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांनाही सन्मानजनक दिवाळी भेट मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दिवाळीपूर्वी वेतन आणि भेटीची रक्कम देण्याची मागणी
यंदा ६ नोव्हेंबर २०२६ पासून दिवाळी सणाला सुरुवात होत असल्याने, सणापूर्वीच ऑक्टोबर महिन्याचे वेतन आणि दिवाळी भेटीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे. सणाच्या काळात कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी वेळेत पैसे देण्याची गरज असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
निधी न मिळाल्यास ‘खारा दिवाळी फराळ’ पाठवणार
एसटी महामंडळाला आवश्यक निधी ४ नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध न झाल्यास ‘खारा दिवाळी फराळ’ पाठवून निषेध नोंदविण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी यापूर्वी दिला आहे.
महामंडळाला सवलत मूल्याची थकबाकी, दैनंदिन खर्चासाठी अतिरिक्त निधी आणि कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीसाठी आवश्यक रक्कम मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ही रक्कम ३ नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध न झाल्यास ४ नोव्हेंबर रोजी निषेध आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
एसटी महामंडळासमोर आर्थिक अडचणी
एसटी महामंडळाचा संचित तोटा वाढत असून अपेक्षित प्रवासी उत्पन्न मिळत नसल्याचे श्रीरंग बरगे यांनी म्हटले होते. त्यातच कर्मचाऱ्यांची देणी, भविष्य निर्वाह निधी (पीएफ), ग्रॅच्युइटी आणि इतर देयकांची थकबाकी वाढत असल्याने महामंडळाच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर ताण येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आता एसटी कर्मचाऱ्यांना २० हजार रुपयांची दिवाळी भेट देण्याच्या मागणीवर राज्य सरकार आणि महामंडळ काय निर्णय घेणार, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App