विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाची आज आगमन मिरवणूक होती. भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत काही वेळापूर्वी अपघात घडलेला आहे. ही घटना मंडपापासून ५०-६० मीटर अंतरावर घडली असून यात तिघे जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
मुंबईतील भुलेश्वर येथे गणेशोत्सवाच्या तयारीदरम्यान एक अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. भुलेश्वरचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तब्बल 22 फूट उंच बाप्पाची भव्य मूर्ती भायखळा येथून भुलेश्वरला आणत असताना अचानक तोल जाऊन कोसळली. या भयंकर दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, अन्य तीन जण जखमी झाले आहेत. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महाकाय मूर्ती रस्त्यात एका बाजूला कलंडल्याने हा मोठा अनर्थ घडला.
भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीतील अपघातात तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. या अपघातात मंडळाचे अध्यक्ष, एक लहान मुलगी आणि आणखी एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती मिळतेय. या घटनेनंतर घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस दल आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान दाखल झाले आहेत आणि त्यांच्याकडून अपघाताच्या ठिकाणी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. दरम्यान, यंदा गणेशोत्सव 14 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान आहे. 14 सप्टेंबरला गणरायाचं आगमन होईल तर 25 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला निरोप दिला जाईल.
प्राथमिक तपासानुसार, घटनास्थळी रस्त्यावर कोणतेही खड्डे आढळून आलेले नाहीत, त्यामुळे केवळ मूर्तीचा तोल गेल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. विशेष म्हणजे, ही मूर्ती मंडपाच्या अगदी जवळ, म्हणजे अवघ्या 50 ते 60 मीटर अंतरावर आली असतानाच अचानक कोसळली. उत्सवाच्या आनंदी वातावरणात घडलेल्या या आकस्मिक घटनेमुळे भुलेश्वर परिसरात आणि गणेशभक्तांमध्ये मोठी शोककळा पसरली असून, सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App