राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याआधी COEPमध्ये राजकीय राडा; दोन विद्यार्थिनींना डांबून धमकावल्याचा काँग्रेसचा गंभीर आरोप

विशेष प्रतिनिधी

पुणे: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या काही तास आधी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संबंधित वादाला शुक्रवारी रात्री राजकीय वळण मिळाले. काँग्रेस-एनएसयूआय आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते वसतिगृह परिसरात आमनेसामने आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी आणि शाब्दिक चकमक झाली. दोन्ही बाजूंकडून गंभीर आरोप करण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

या वादाच्या केंद्रस्थानी सीओईपीच्या दोन विद्यार्थिनी आहेत. त्यांनी यापूर्वी शिष्यवृत्ती, शैक्षणिक खर्च आणि शुल्काशी संबंधित प्रश्न माध्यमांसमोर मांडले होते.
‘विद्यार्थिनींना डांबून धमकावले’काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार रात्री सीओईपी वसतिगृह परिसरात पोहोचले. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी दोन विद्यार्थिनींना डांबून ठेवत धमकावले आणि मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, संबंधित विद्यार्थिनींनी आपल्या अडचणी माध्यमांसमोर मांडल्यानंतर त्यांच्यावर आधीच्या वक्तव्यापेक्षा वेगळी भूमिका मांडण्यासाठी दबाव आणण्यात आला.एका विद्यार्थिनीच्या भावाने युवक काँग्रेसशी संपर्क साधल्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते परिसरात पोहोचल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.



राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात अडथळा आणण्यासाठी हा प्रकार घडविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

वडेट्टीवार यांनी पोलिसांवर लाठीमार केल्याचाही आरोप केला. विद्यार्थिनींना कथित मारहाण करणारे आणि लाठीमारासाठी जबाबदार पोलिसांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस नेते सतेज पाटील आणि विश्वजित कदम हेही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते आणि काही विद्यार्थी धरणे आंदोलनाला बसले.
अभाविपचा काँग्रेस-एनएसयूआयवर पलटवार अभाविपने काँग्रेसचे आरोप फेटाळून लावत उलट काँग्रेस आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांवर हल्ल्याचा आरोप केला.
अभाविपचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी यांनी दावा केला की, काँग्रेस आणि एनएसयूआयचे सुमारे १०० ते १५० कार्यकर्ते सीओईपी परिसरात घुसले आणि विद्यार्थ्यांवर हल्ला केला.

विद्यार्थिनींना मारहाण करण्यात आली, तसेच त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांवर दबाव आणला जात असल्याचाही दावा कुलकर्णी यांनी केला. विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्यास अभाविपकडून प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दोन्ही बाजूंकडून करण्यात आलेल्या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.दरम्यान, या प्रकरणातील एका विद्यार्थिनीने स्वतःचा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर वादाला आणखी नवे वळण मिळाले.

द्वितीय वर्ष संगणक अभियांत्रिकी शाखेतील या विद्यार्थिनीने यापूर्वी माध्यमांशी बोलताना जादा शुल्क आकारले जात असल्याचे म्हटले होते. मात्र, नंतरच्या व्हिडिओत तिने आधीची प्रतिक्रिया दबावाच्या परिस्थितीत दिल्याचा दावा केला.आपण प्रत्यक्षात भरलेले शुल्क आधी सांगितलेल्या रकमेपेक्षा कमी असल्याचे सांगत तिने महाविद्यालयाची माफी मागितली.

काँग्रेसने मात्र हा व्हिडिओही विद्यार्थिनीवर दबाव आणून तयार करून घेतल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे विद्यार्थिनीच्या दोन वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे नेमके काय घडले, याबाबत संभ्रम आणखी वाढला आहे.महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यम विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही राजकीय किंवा इतर दबावाशिवाय आपले प्रश्न मांडता आले पाहिजेत, असे सांगितले.

त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष पोलिस चौकशी करण्याची मागणी केली. संघर्षात काँग्रेसचा एक कार्यकर्ता जखमी झाला असून त्याच्यावर संचेती रुग्णालयात उपचार सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला समर्थन देणाऱ्या विद्यार्थिनींवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला. कार्यक्रमात जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला कडक सुरक्षा राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम शनिवारी, २२ ऑगस्ट रोजी शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस मैदानावर दुपारी ४.३० ते रात्री ९.३० या वेळेत होणार आहे.

पुणे पोलिसांनी कार्यक्रमाला विविध अटी आणि शर्तींसह परवानगी दिली आहे. कार्यक्रमस्थळी आक्षेपार्ह फलक, छायाचित्रे किंवा अन्य साहित्य लावण्यास मनाई करण्यात आली असून, धार्मिक भावना दुखावतील किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी वक्तव्ये अथवा कृत्ये टाळण्याच्या सूचना आयोजकांना देण्यात आल्या आहेत.

कार्यक्रमात शिक्षण, विद्यार्थिनींची सुरक्षितता, शुल्क, शिष्यवृत्ती, रोजगार आणि करिअरच्या संधी यांसह विविध विद्यार्थी प्रश्नांवर राहुल गांधी संवाद साधणार आहेत.
मात्र, कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला सीओईपीमध्ये झालेल्या संघर्षामुळे राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याभोवती आता राजकीय तणाव आणि कडक सुरक्षा व्यवस्थेचे सावट निर्माण झाले आहे.

Political clash at COEP ahead of Rahul Gandhi’s Pune visit

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात