विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर शुक्रवारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. १८ वर्षीय मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच्या आई-वडिलांचाही डोंगरावरून पडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. Chhatrapati Sambhajinagar
मिळालेल्या माहितीनुसार, देवळाई-सातारा परिसरातील कुणाल मुरलीधर चांदवडे हा १८ वर्षीय तरुण सकाळी खवड्या डोंगरावर गेला होता. तो टोकावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे आई-वडील घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवानही तातडीने दाखल झाले.
सर्वजण कुणालला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी त्याला सुरक्षितपणे मागे आणण्याचे प्रयत्न सुरू होते. याचदरम्यान वडील मुरलीधर चांदवडे यांनी मुलाला वाचवण्यासाठी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघांचाही तोल गेला आणि ते डोंगरावरून खाली पडले.
या दुर्घटनेत कुणाल आणि त्याचे वडील मुरलीधर यांचा मृत्यू झाला. ही घटना पाहून आई संगीता चांदवडे यांनाही मोठा धक्का बसला आणि त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेत कुणाल मुरलीधर चांदवडे, मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. कुणालने असे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
एका मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात संपूर्ण कुटुंबावरच काळाने घाला घातल्याने या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App