विशेष प्रतिनिधी
मुंबई : विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी १८ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. वेतन करार, सातवा वेतन आयोग, महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी यांसह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता मुंबईतील ऑपेरा हाऊस येथील युनियन कार्यालयाबाहेर आंदोलनाला सुरुवात होणार आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
बेस्टच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेने आपल्या अर्थसंकल्पात बेस्टसाठी तातडीने आर्थिक तरतूद करावी, अशी प्रमुख मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. बेस्टच्या बससेवा आणि दैनंदिन कामकाजाचा खर्च भागवण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांचे २०१६-२०२१ आणि २०२१-२०२६ या कालावधीतील प्रलंबित वेतन करार तातडीने लागू करण्यात यावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर समान वेतनश्रेणी लागू करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
बेस्टच्या बससेवेत समान स्वरूपाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समान मोबदला देण्यात यावा, अशीही मागणी आहे. कंत्राटी पद्धतीवरील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर करण्याची मागणी संघटनेने केली आहे. २०१० आणि २०२४ मध्ये बेस्टच्या वीजपुरवठा विभागात समाविष्ट झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात तफावत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. ही वेतन विसंगती दूर करून ११ जून २०१९ रोजी झालेल्या सामंजस्य कराराची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी आणि इतर प्रलंबित आर्थिक देणी तातडीने अदा करावीत, अशीही मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. देय रक्कम मिळण्यास विलंब होत असल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. बेस्टच्या मालकीच्या बसची देखभाल, दुरुस्ती आणि दैनंदिन संचालनासाठी महापालिकेने पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच बेस्टची ऑपरेशनल तूट भरून काढण्यासाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतन, निवृत्तीवेतन, कंत्राटी रोजगार आणि बेस्टच्या आर्थिक परिस्थितीवरून गेल्या काही काळापासून कामगार संघटना आणि प्रशासनामध्ये मतभेद कायम आहेत. आता १८ ऑगस्टपासून प्रस्तावित बेमुदत संपामुळे मुंबईतील बससेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App