विशेष प्रतिनिधी
धाराशिव : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामागे कोणताही वैयक्तिक स्वार्थ, पदाचा हव्यास किंवा चौकशी संस्थांची भीती नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी आपल्या भूमिकेचे सविस्तर स्पष्टीकरण दिले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करूनही केवळ सत्तेच्या अभावामुळे पराभव पत्करावा लागला. अनेक विकासकामे रखडली होती. अगदी ट्रान्सफॉर्मर बसवण्यासारखी सामान्य लोकांची कामेही होत नव्हती. त्यामुळे जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे ओमराजेंनी सांगितले.
‘पैसा, पद किंवा दबावामुळे निर्णय नाही’
ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, हा निर्णय कोणत्याही पैशाच्या किंवा पदाच्या मोहापोटी घेतलेला नाही. “अटी-शर्ती घालून काम करणारा मी कार्यकर्ता नाही,” असे ते म्हणाले.
पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील निकालाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, गेली 20 वर्षे हा खटला सुरू होता. मात्र नुकत्याच आलेल्या निकालामुळे कुटुंबाला पुन्हा एकदा दुःख सहन करावे लागले. या संदर्भात एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा झाली असून आम्ही कोणतीही मेहरबानी मागत नाही, तर न्यायाची अपेक्षा करत आहोत, असे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकरणात सीबीआय उच्च न्यायालयात अपील दाखल करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
‘माझा व्यवसाय नाही, संरक्षणाची गरज नाही’
पक्षांतराच्या निर्णयावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना ओमराजे म्हणाले की, “माझा असा कोणताही व्यवसाय नाही ज्याला संरक्षणाची गरज आहे. माझ्यावर ईडी, सीबीआय किंवा इतर कोणत्याही यंत्रणेची कारवाई झालेली नाही. त्यामुळे दबावाखाली हा निर्णय घेतल्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”
राजकारणातील वाईट प्रवृत्तींविरोधात लढत राहणार असल्याचे सांगत त्यांनी सत्तेच्या माध्यमातून प्रलंबित विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला.
कृष्णा-मराठवाडा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार
सत्तेत गेल्यानंतर कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प तसेच विविध बॅरेजची अनेक वर्षांपासून रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष काम करून दाखवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘मातोश्रींबद्दल एकही वाईट शब्द नको’
पक्षांतराची घोषणा करतानाच ओमराजेंनी ठाकरे कुटुंबाबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली. “आदरणीय उद्धवजी, आदित्यजी आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्नेह आणि आशीर्वाद मला कायम लाभला आहे. माझ्या किंवा माझ्या कार्यकर्त्यांच्या तोंडून ‘मातोश्री’बद्दल एकही वाईट शब्द निघता कामा नये, अशी मी सर्वांना ताकीद दिली आहे,” असे त्यांनी सांगितले.
आपल्या निर्णयाचे समर्थन भाषणातून नव्हे, तर कामातून आणि जनतेसाठी केलेल्या प्रयत्नांतून सिद्ध करून दाखवू, असेही ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदारांच्या कथित बंडानंतर ओमराजे निंबाळकर यांचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांनी शिंदे गटात जाण्याची भूमिका स्पष्ट केल्याने राज्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः धाराशिव आणि मराठवाड्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीवर या निर्णयाचे दूरगामी परिणाम होऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App