विशेष प्रतिनिधी
मुंबई : Mumbai BEST Strike मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. बेस्टच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या 12 संघटनांनी गेल्या तीन दिवसांपासून सुरू ठेवलेला संप अखेर मागे घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यामुळे आजपासून बेस्ट बससेवा पुन्हा सुरळीत सुरू होणार आहे.Mumbai BEST Strike
कर्मचाऱ्यांना वेतनवाढीची घोषणा
बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले. नवीन वेतन करार होईपर्यंत कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना दरमहा 3 हजार रुपयांची, तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना 2 हजार रुपयांची हंगामी वेतनवाढ देण्यात येणार आहे. याशिवाय, कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ग्रॅच्युईटीची रक्कम चालू आर्थिक वर्षातच देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.Mumbai BEST Strike
तीन वर्षांत 5 हजार नवीन इलेक्ट्रिक बसेस
बेस्ट उपक्रम आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने मोठी योजना आखली आहे. बेस्टच्या स्वमालकीच्या बसांची संख्या कमी असल्यामुळे होणारा तोटा कमी करण्यासाठी पुढील तीन वर्षांत तब्बल 5 हजार नवीन इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच बेस्टच्या डेपो आणि इतर पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठीही विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
येत्या पाच वर्षांत बेस्टला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना अधिक सुविधा देण्यासाठी शासन योग्य ती सर्व पावले उचलेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
बेस्टला सक्षम करण्यासाठी समिती स्थापन
संपावर तोडगा काढल्यानंतर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, बेस्टची वाढती तूट लक्षात घेता तिचे सक्षमीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. बेस्टची सेवा पूर्वीप्रमाणेच दर्जेदार राहिली पाहिजे, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही या विषयावर चर्चा झाली असून बेस्टला सक्षम करण्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे.
“मुंबईकरांना वेठीस धरण्याचा हेतू नव्हता”
दरम्यान, संप मागे घेतल्यानंतर बेस्ट कृती समितीचे नेते सचिन अहिर यांनीही भूमिका स्पष्ट केली. “मुंबईकरांचे हाल व्हावेत हा आमचा उद्देश नव्हता. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सरकारसमोर मांडण्यासाठी आम्ही आंदोलन केले. बेस्ट वाचली पाहिजे आणि कर्मचाऱ्यांचे हक्कही मिळाले पाहिजेत, हीच आमची भूमिका होती. सरकारने आमच्या मागण्यांची दखल घेतल्याने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे,” असे अहिर म्हणाले.
या निर्णयामुळे गेल्या तीन दिवसांपासून बेस्ट संपामुळे त्रस्त असलेल्या लाखो मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला असून बससेवा पुन्हा पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App