नाशिक : कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या घराणेशाहीचा “न्याय”!!, हेच राजकीय सत्य छगन भुजबळ यांच्या आजच्या वक्तव्यातून समोर आले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर राजेंद्र जैन यांची वर्णी लागली. राजकारण साधून घेतले. त्यातून छगन भुजबळ यांचा पत्ता कापला गेला. त्यानंतर प्रफुल्ल पटेल हे “नाराज” झालेल्या छगन भुजबळांच्या भेटीला पोहोचले. यादरम्यान बरेच मोठे राजकारण घडले. छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर जाण्यासाठी राष्ट्रवादीवर अट लादली. समीरला मंत्री करा. मी राज्यसभेवर जातो, असे ते म्हणाले. पण छगन भुजबळांची ती इच्छा पूर्ण झाली नाही. भाजपने त्यात अटकाव केल्याचे बोलले गेले.
– भुजबळ कबड्डी प्लेयर
पण छगन भुजबळ यांनी भाजपने अटकाव केल्याचा इन्कार केला. त्या उलट त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावरच अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. आपण बुद्धिबळाचे खेळाडू नाही आपण कबड्डी प्लेयर आहोत, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
भुजबळांना हवा घराणेशाहीणा “न्याय”
पण छगन भुजबळांनी त्या पलीकडे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या घराणेशाहीचाच “न्याय” मागितला. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचे पुत्र खासदार आहेत. मकरंद पाटील मंत्री आहेत. त्यांचे भाऊ खासदार आहेत. सुनील तटकरे खासदार आहेत. त्यांच्या मुलाला आमदारकी मिळाली आहे. तोच न्याय मला मिळावा, अशी माझी मागणी आहे, असे छगन भुजबळ म्हणाले. बाकी भाजपकडे प्रपोजल पाठवायला वेळ लागला असावा त्यामुळे भाजपने मला नकार दिला. त्यामध्ये तथ्य नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार ज्यावेळी होईल त्यावेळी समीरला मंत्री करायचा विचार करू असे भाजपचे नेते म्हणाले असल्याचे मला समजले, अशी पुस्तीही छगन भुजबळ यांनी जोडली.
– राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला केले पिंजऱ्यात उभे,
भुजबळांनी आपल्या या वक्तव्यातून भाजपने नकार दिल्याचे “नॅरेटिव्ह” खोडून काढले. पण त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला देखील खोड्यात टाकले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व म्हणजेच सुनेत्रा पवार जर स्वतः घराणेशाही करत असतील आणि इतरांच्याही घराणेशाहीला प्रोत्साहन देत असतील, तर आपल्यालाही घराणेशाही लादायला प्रोत्साहन द्यावे, हेच म्हणणे छगन भुजबळ यांनी थेटपणे मांडले. त्यात त्यांनी कुठला आडपडदा ठेवला नाही. छगन भुजबळांनी एकीकडे भाजपच्या नेतृत्वाला न दुखवता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला पिंजऱ्यात उभे केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व इतरांना घराणेशाहीचा न्याय देते, पण आपल्याला तो देत नाही, हे त्यांनी जाहीरपणे दाखवून दिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App