विशेष प्रतिनिधी
मुंबई : Rohit Pawar राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आता बॅनर वॉरच्या माध्यमातून चव्हाट्यावर आली आहे. रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथे आयोजित एका कार्यक्रमात लावण्यात आलेल्या बॅनरवरून पक्षाचे दिवंगत अध्यक्ष अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे फोटो वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या बॅनरवर केवळ खासदार सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबाचेच वर्चस्व दिसून आल्याने, रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर बोचरा वार केला आहे.Rohit Pawar
रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारक्षेत्रातील इंदापूर येथे माणगाव तालुक्यातील नवनर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या मुख्य बॅनरवर खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांचे मोठे फोटो होते. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे या बॅनरवर पक्षाचे सर्वोच्च नेते अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो कोठेही दिसले नाहीत. रायगड हा तटकरेंचा बालेकिल्ला मानला जात असला, तरी पक्षश्रेष्ठींनाच डावलल्याने कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.Rohit Pawar
बटाईदाराने सातबारा स्वतःच्या नावावर करण्याचा प्रकार
या प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. सुनील तटकरे हे पक्ष ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा पुनरूच्चार रोहित पवारांनी पुन्हा एकदा केला. रोहित पवार म्हणाले, “मालकाला अलगद बाजूला सारून जेव्हा बटाईदारच जमिनीचा सातबारा स्वतःच्या नावावर करतो, याचे हे जिवंत उदाहरण आहे. जे आम्ही वारंवार बोलतोय…” अशा शब्दांत रोहित पवारांनी सुनील तटकरेंना टोला लगावला. सुनील तटकरे हे मागील अनेक दिवसांपासून रोहित पवारांच्या निशाण्यावर आहेत.
https://x.com/RRPSpeaks/status/2038271649452290446?s=20
अमोल मिटकरी यांचीही टीका
दरम्यान, राष्ट्रवादीचे दुसरे आक्रमक नेते आमदार अमोल मिटकरी यांनीही या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी नाव न घेता तटकरेंना लक्ष्य करताना म्हटले की, “ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे, त्यांचाच फोटो हटवणे सामान्य कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही. पक्षाच्या दैवतांना डावलून स्वतः देव बनण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, महाराष्ट्र हे खपवून घेणार नाही,” असा इशाराही अमोल मिटकरी यांनी दिला.
पक्षांतर्गत वर्चस्ववादाची चर्चा
सुनील तटकरे यांनी पक्षावर आपली पकड मजबूत करण्यासाठी ही खेळी केल्याची चर्चा राजकीय गोटात रंगली आहे. विलिनीकरण आणि पक्षाच्या नेतृत्वावरून आधीच वाद सुरू असताना, आता बॅनरवरून फोटो गायब झाल्याने अजित पवार समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या वादावर आता स्वतः सुनील तटकरे किंवा अजित पवार काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App