नाशिक : अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर रोहित पवार ज्या पद्धतीने पत्रकार परिषद घेत आहेत किंवा त्यांना त्या पत्रकार परिषदा घ्यायला लावले जात आहे, ते पाहता रोहित पवारांचा “राहुल गांधी” आणि “संजय राऊत” करून सुप्रिया सुळे नामानिराळ्या झाल्यात आणि शरद पवार सुद्धा “सुरक्षित” राहिलेत, हेच राजकीय चित्र आज समोर आले. Rohit Pawar
अजित पवारांच्या अकाली एक्झिटला तेरा दिवस उलटून गेल्यानंतर रोहित पवारांनी ज्या पद्धतीने पत्रकार परिषदांचा धडाका लावला, त्यातून सुरुवातीला रोहित पवार हे सत्तेपासून वंचित राहिल्यामुळे तसे करत आहेत, असे वाटत होते. पण त्यापलीकडे जाऊन रोहित पवारांनी ज्या पद्धतीने पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन केली आणि सलग तीन पत्रकार परिषदा घेतल्या, त्यावरून रोहित पवार आता ते म्हणत असले तरी “पवार” उरले नसून त्यांचा “राहुल गांधी” झालाय, हे मात्र स्पष्ट झाले. कारण राहुल गांधींनी सुद्धा असेच पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करून vote chori विरुद्ध एल्गार पुकारला होता, पण त्याचा कुठलाही फायदा काँग्रेसला महाराष्ट्रातल्या किंवा अगदी देशातल्या निवडणुकांमध्ये झाला नव्हता. रोहित पवारांच्या पण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनची तशीच वासलात लागल्यास आश्चर्य वाटायला नको.
– विषयातले गांभीर्य घालविले
कारण शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार यांना तशा पत्रकार परिषदा घ्यायला लावून आणि पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करायला लावून स्वतः मात्र राजकीय दृष्ट्या “सुरक्षित” राहिलेत. रोहित पवारांनी आज केलेल्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये त्यांनी तेलगू देशम पार्टीला संशयाच्या ओढले. भाजपवर शरसंधान साधले. डीजीसीए वर शंका उपस्थित केली. आपले पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन म्हणजेच कायद्याच्या कक्षेत बसू शकणारे पुरावे आहेत, असा भास निर्माण केला, पण हे सगळे करताना रोहित पवारांनी राहुल गांधी आणि संजय राऊत यांना फॉलो केल्याने अजित पवारांच्या अपघातातले गांभीर्य त्यांनी स्वतःच्या हाताने घालविले किंवा त्यांना घालवायला लावण्यात आले.
रोहित पवार आक्रमक, तर सुप्रिया सुळे संयमी
रोहित पवार यांनी आज ज्या तावातावाने पत्रकार परिषद घेतली, तेवढ्या तावातवाने सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद बिलकुल घेतली नाही. रोहित पवार आज यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये बोलले, त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या पत्रकार परिषदांमध्ये कमालीचा फरक होता. रोहित पवार अत्यंत आक्रमक होते, तर सुप्रिया सुळे अतिशय composed होत्या. माझे आजोबा खूप मोठे आहेत. माझा काका खूप मोठा होता आणि मी “रोहित पवार” आहे, असे रोहित पवार म्हणाले, तर माझा दादाच आता गेलाय, तर त्याच्याबरोबर झालेले बोलणे आता सांगून उपयोग काय??, जे काही ठरले होते, ते त्याच्याच बरोबर गेले. आता आपण पुढचे पाहिले पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. रोहित पवारांनी जेवढा आक्रमकपणा पत्रकार परिषदेत दाखविला, तेवढीच सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत संयमी भूमिका घेतली, त्याच वेळी सुप्रिया सुळे यांनी एक वेगळीच “मेख” पत्रकार परिषदेत मारून ठेवली. शरद पवार आता राज्यसभेत जाणार की नाही याचा निर्णय येत्या आठवडाभरात होईल, असे सांगून सुप्रिया सुळे यांनी शरद पवार राजकीय दृष्ट्या “सुरक्षित” आहेत हेच सूचकपणे दाखवून दिले. कारण शरद पवार महाविकास आघाडीच्या 46 मतांवर राज्यसभेत जातील, अशी चिन्हे दिसत आहेत.
– शरद पवारांचे राजकारण
या सगळ्याचा राजकीय अर्थ असाच की रोहित पवारांचा “राहुल गांधी” आणि “संजय राऊत” करून सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे दोघेही मात्र “सुरक्षित” राहिलेत.
शरद पवारांचे राजकारण आत्तापर्यंत असेच राहिले. जी काही सत्ता असेल, ती पवार कुटुंबीयांनी भोगायची आणि चुका केल्या तर त्या इतरांवर ढकलायच्या हे त्यांचे कायमचे “खेळ” राहिलेत. शरद पवारांनी राजकीय आयुष्यात कधी पराभवाचे तोंड बघितले नाही. याला अपवाद फक्त भारतीय क्रिकेट नियमक मंडळातल्या निवडणुकीचा होता बीसीसीआयच्या निवडणुकीत त्यांना जगमोहन दालमिया यांच्याकडून एका मताने पराभव पत्करावा लागला होता, पण याखेरीस पवारांना कुठल्याच निवडणुकीत कधी पराभव पत्करावा लागला नाही. सुप्रिया सुळे यांना सुद्धा आत्तापर्यंत तरी पराभवाचे तोंड पाहावे लागले नाही. त्याउलट अजित पवार वगळले, तर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना मात्र पराभवाचे तोंड पाहावे लागले. रोहित पवार कर्जत जामखेड मधून कसेबसे निवडून आले. अजित पवार तिथे भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचाराला गेले नाहीत म्हणून रोहित पवार निवडून येऊ शकले, हे खुद्द अजित पवारांनीच यशवंतराव चव्हाण समाधीपाशी रोहित पवारांना ऐकवले होते. रोहित पवार कर्जत जामखेड मधून विधानसभेवर निवडून आले, तरी त्यांना नगरपरिषद निवडणुकीत आपल्या पॅनलचा पराभव पाहावा लागला. नगरपरिषद निवडणूक त्यांना जिंकता आली नाही. ती राम शिंदे यांनी जिंकली.
– रोहित पवारांना सत्तेचा तुकडा मिळणे अवघड
आता सुद्धा रोहित पवार ज्या पद्धतीने पत्रकार परिषदेचा तडाखा लावलाय, ते पाहता त्यांचे राजकीय भवितव्य संजय राऊत आणि राहुल गांधींच्या अपयशाच्या मार्गाने गेल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यांना सत्तेच्या वाट्यातला तुकडा मिळायची शक्यता नाही. पण त्या उलट संयमी भूमिका घेऊन किंवा स्वतःच्या सोयीचे राजकारण साधून शरद पवार आणि सुप्रिया सुळे मात्र “सुरक्षित” राहिलेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App