एसटी कर्मचाऱ्यांसाठी नवी सोशल मीडिया आचारसंहिता; ड्युटीदरम्यान व्हिडिओ, रील्स आणि लाईव्ह स्ट्रीमिंगवर बंदी

विशेष प्रतिनिधी 

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) आपल्या कर्मचारीवर्गासाठी सोशल मीडिया वापराबाबत नवी वर्तन आचारसंहिता लागू केली आहे. या नव्या नियमांनुसार, कर्तव्यावर असताना किंवा एसटीच्या गणवेशात रील्स, शॉर्ट्स, व्हिडिओ किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग करून महामंडळाची प्रतिमा मलिन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

महामंडळाने जारी केलेल्या आदेशानुसार, चालक, वाहक तसेच इतर कर्मचारी यांना आगार, बसस्थानक, कार्यालय किंवा एसटी बसमध्ये गणवेशात सोशल मीडियासाठी व्हिडिओ तयार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच एसटीची गोपनीय माहिती, अंतर्गत कागदपत्रे, छायाचित्रे किंवा व्हिडिओ कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर परवानगीशिवाय प्रसिद्ध करता येणार नाहीत.

महामंडळाच्या सकारात्मक उपक्रमांबाबत व्हिडिओ किंवा इतर प्रचारात्मक सामग्री तयार करायची असल्यास संबंधित सक्षम अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.



नियम मोडल्यास कडक कारवाई

नव्या आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्याला प्रथम ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात येईल. त्यानंतरही नियमांचे उल्लंघन सुरू राहिल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाईल, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

सोशल मीडियावर पूर्ण बंदी नाही

महामंडळाने सोशल मीडियावरील वापरावर संपूर्ण बंदी घातलेली नाही. उलट, अधिकृत माहिती, प्रवासी सुविधा, लोककल्याणकारी योजना, स्वच्छता अभियान, रस्ते सुरक्षा मोहिमा आणि महामंडळाचे विविध सकारात्मक उपक्रम यांचा प्रसार करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे.

याशिवाय, सोशल मीडियावर प्रभावी उपस्थिती असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना (इन्फ्लुएन्सर्स) अटी व शर्तींच्या अधीन राहून जनजागृती आणि जनहिताच्या मोहिमांचा प्रसार करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार असल्याचेही महामंडळाने स्पष्ट केले आहे.

महामंडळाच्या प्रतिमेचे संरक्षण, गोपनीय माहितीची सुरक्षितता आणि सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने ही नवी आचारसंहिता लागू करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

New rules for ST employees; ban on making videos while on duty!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात