खुद्द जय शाह यांनी एका क्रिकेट वेबसाईटला ही माहिती दिली.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केलची ( Morne Morkel )टीम इंडियाचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून मॉर्नी मॉर्केल पदभार स्वीकारणार आहे.
खुद्द जय शाह यांनी एका क्रिकेट वेबसाईटला ही माहिती दिली. याशिवाय टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही यापूर्वी बीसीसीआयला गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी मॉर्केलच्या नावाचा विचार करण्याची विनंती केली होती.
आयपीएल दरम्यान गंभीर आणि मॉर्केलमध्ये चांगले संबंध होते. खरंतर दोघेही लखनऊ सुपर जायंट्सचा भाग होते आणि एकत्र खेळत होते. अशा स्थितीत गंभीरने बीसीसीआयला मॉर्केलला गोलंदाजी प्रशिक्षक बनविण्याचा विचार करण्याची विनंती केली होती.
मॉर्नी मॉर्केलला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रशिक्षकपदाचा अनुभव आहे. याआधी त्यांनी पाकिस्तान संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते. आता तो टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका निभावणार आहे.
मॉर्नी मॉर्केलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
जर आपण मॉर्नी मॉर्केलच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी 86 कसोटी सामने खेळले आहेत आणि या कालावधीत त्याने 309 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 117 एकदिवसीय सामन्यांमध्ये 188 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याने 44 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 47 विकेट घेतल्या आहेत. आता त्याच्या कोचिंगमध्ये टीम इंडिया कशी कामगिरी करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App