विशेष प्रतिनिधी
मुंबई : “इंडिया” आघाडीच्या मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमधल्या तिसऱ्या बैठकीत आघाडीचा लोगो ठरला नाही. संयोजकही नेमला नाही. आघाडीच्या नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेपूर्वी सोनिया गांधी नवी दिल्लीला निघून गेल्या. आघाडीतल्या नेत्यांनी 4 समित्या नेमल्या. यापैकी समन्वय समितीत काँग्रेसचे संघटन सचिव के. सी. वेणूगोपाल यांच्या नेतृत्वाखालच्या समितीत शरद पवार आणि संजय राऊत यांची वर्णी लागली. पत्रकार परिषदेत निवडक नेत्यांची जोरदार भाषणे झाली. “इंडिया” आघाडीच्या तिसऱ्या बैठकीतून एवढीच फलश्रुती बाहेर आली. I.N.D.I.A. couldn’t decide logo and even convener of the alliance in its third meeting
आघाडीची पुढची बैठक तामिळनाडूत होणारा असून त्याचे ठिकाण आणि तारीख नंतर ठरविली जाणार आहे. आजच्या “इंडिया” आघाडीच्या बैठकीत लोगो ठरणे अपेक्षित होते. संयोजकाचे नावही जाहीर होणे अपेक्षित होते. पण यापैकी काहीच घडले नाही. त्या ऐवजी 13 सदस्यांची समन्वय समिती काही सदस्यांची जाहीरनामा समिती वगैरे एकूण 4 समित्या नेमल्याची फक्त घोषणा झाली. 13 जणांच्या मुख्य समन्वय समितीमध्ये काँग्रेसचे नेते के. सी. वेणूगोपाल यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार आणि संजय राऊत यांचा समावेश झाला.
वास्तविक वेणूगोपाल हे शरद पवार यांच्या पेक्षा ज्युनियर आहेत पण ते “इंडिया” आघाडीतल्या सर्वात मोठ्या पक्षाचे अर्थात काँग्रेसचे संघटन सचिव असल्याने त्यांचे राजकीय महत्त्व अधिक आहे. त्यामुळे वेणूगोपाल यांच्याकडे समन्वय समितीचे नेतृत्व देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली शरद पवारांना काम करावे लागणार आहे.
“इंडिया” आघाडीची बैठक संपताच स्वतः सोनिया गांधी नवी दिल्लीला निघून गेल्या. त्या संयुक्त पत्रकार परिषदेला हजर देखील राहिल्या नाहीत.
या पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी पत्रकारांना संबोधित केले. या सर्वांच्या संबोधनांमध्ये फक्त केंद्रातल्या मोदी सरकारवर शरसंधान होते. पण ते पत्रकार परिषदेतल्या निवेदनापेक्षा एखाद्या जाहीर प्रचार सभेतल्या भाषणासारखे होते. त्या पलीकडे कोणतीही मोठी घोषणा पत्रकार परिषदेत झालीच नाही. “इंडिया” आघाडीच्या तिसऱ्या बैठकीनंतरही 13 जणांच्या समन्वय समितीसह अन्य 3 समित्या स्थापन करण्याखेरीज कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही.
“इंडिया” आघाडीच्या लोगो साठी जे विशिष्ट प्रयत्न झाले, त्यातून 6 लोगो तयार झाले होते. त्यापैकी एका लोगो वर सर्वांची सहमती झाल्याचे बोलले गेले. पण प्रत्यक्षात अधिकृतरित्या लोगोचे अनावरण झाले नाही. उलट एकमत झालेल्या लोगो मध्ये काही करेक्शन करून मगच तो लोगो फायनल करण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आघाडीच्या संयोजकाच्या तर नावाबद्दल एकाही नेत्यांनी कोणतीही चर्चा केली नाही. त्यामुळे संयोजक नेमण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. आता 13 जणांची समन्वय समिती त्यांना सोपवलेले काम करून पुढच्या बैठकीचा अजेंडा सेट करणार आहे. पण त्यात “इंडिया” आघाडीचा लोगो फायनल होईल की नाही?? आणि संयोजक नेमला जाईल की नाही?? याविषयी कोणतीही स्पष्टता नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App