छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे रुपांतर प्रबळ मराठी साम्राज्यात करणारा रणधुरंधर बाजीराव पेशवा…

हिंदवी स्वराज्याचे पंतप्रधान अजिंक्य योद्धा श्रीमंत बाजीराव (राऊ) पेशवे यांची आज ३२१ वी जयंती. जगातील एकमेव अपराजित योद्धा आज मात्र दुर्लक्षित, उपेक्षित अवस्थेत आहे. याला मराठी माणसाचे औदासीन्य कारणीभूत आहे, असे खेदाने म्हणावे लागेल. आपला अभिमान आपण पायदळी तुडवतो आहोत… Tribute to greatest Indian cavalry general Bajirao Peshwa on his 321 birth anniversary


राजेंद्र भामरे
(निवृत्त सहायक पोलीस आयुक्त)

काही निवडक इतिहासप्रेमी सोडले तर १८ ऑगस्टला बाजीराव पेशव्यांची जयंती असतेे हे स्मरणात देखील नसेल.१८ ऑगस्ट १७०० ते २८ एप्रिल १७४० या अवघ्या ४० वर्षांच्या आयुष्यात या पेशव्याने दैदिप्यमान आणि गौरवशाली इतिहास घडवला. हा इतिहास आपण दुर्लक्षित केला नाही तर चिरंतन टिकणारा आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकीर्दीत पेशवेपदाला विशेष महत्व प्राप्त झाल.

दरबारातील मुत्सद्यांचा विरोध डावलून छत्रपती शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथांच्या मृत्युनंतर अवघ्या १९-२० वर्षांच्या बाजीरावांस पेशवे पदाची वस्त्रे दिली (इ.स. १७२०) . बाजीरावांनी हा विश्वास सार्थ ठरवून सह्यद्रीच्या चिंचोळ्या पट्टयात असलेल्या स्वराज्याचा विस्तार नर्मदा,चंबळ आणि यमुनेच्या पलीकडे करून सोडला. बाजीराव पेशव्यांनी मुघल, निजाम, सिद्दी यांचा पराभव करून स्वराज्य निष्कंटक तर केलेच शिवाय ते अधिक बलशाली केले. बाळाजी विश्वानाथांबरोबरच्या दिल्लीतील वास्तव्यात मुघल साम्राज्य कमकुवत झालेले असल्याचे बाजीरावांच्या लक्षात आलेले होते आणि एक जबर धक्का दिल्यास ते कोलमडून पडेल आणि त्याची जागा केवळ मराठेच घेऊ शकतात असा दृढ विश्वास बाजीरावांमध्ये होता.

२० वर्षांच्या कारकीर्दीत ४७ च्या वर जास्त लढाया बाजीरावांनी निर्णायक पणे लढल्या आणि जिंकल्या . माळवा – १७२३, धार – १७२४, पालखेड – १७२८, बुंदेलखंड – १७३०, दिल्ली – १७३७, भोपाळ इ. १७३८ या त्यातील काही प्रमुख लढाया. या सर्व लढायांनी महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणावर दुरगामी परिणाम घडवले. पालखेडची लढाई प्रसिद्ध असून ज्या पद्धतीने बाजीरावांनी बुऱ्हानपुरापासून गुजरातेपर्यंत निजामाला गुंगारा दिला आणि सरते शेवटी पालखेड या गावी निजामाच्या सन्याची रसद तोडून त्यास मुंगी शेवगावचा तह करण्यास भाग पडले तो एक युद्धनीतीशास्त्राचा अत्युच्च नमुना म्हणून गणला जातो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील ब्रिटनचा सरसेनापती फिल्ड मार्शल मोंटगोमेरीने देखील या लढाईचे वर्णन masterpiece of strategic warअसे केलेले आहे. अमेरिकेच्या युद्ध शास्त्राच्या अभ्यासक्रमात पालखेडच्या लढाईचा अभ्यास केला जातो.

बाजीरावांनी आपल्या आयुष्यात कर्मकांड, प्रथा यांना वाजवीपेक्षा जास्त महत्व दिले नाही. बाजीरावांसारखे पुरोगामी व्यक्तिमत्व इतिहासात शोधून सापडणार नाही. पुण्यातील सनातन्यांचा मस्तानीला विरोध नव्हता तर तो बाजीरावांच्या मस्तानीला ‘पत्नीचा’ दर्जा देण्याला होता.

‘‘मुळावर घाव घाला म्हणजे पाने आपोआप गळून पडतील’’, ‘‘रात्र ही झोपण्यासाठी आहे असे जे समजतात ते मूर्ख आहेत, रात्र ही शत्रूवर हल्ला करून त्याचा पराभव करण्यासाठी असते’’ असे सांगणारा हा जगातील एकमेव अपराजित योद्धा आज मात्र दुर्लक्षित, उपेक्षित अवस्थेत आहे. याला मराठी माणसाचे औदासीन्य कारणीभूत आहे, असे खेदाने म्हणावे लागेल. आपला अभिमान आपण पायदळी तुडवतो आहोत. बाजीराव म्हटलं की ‘‘तो ‘मस्तानी’वाला ना?’’ असे म्हणत इतिहासाचा घोर अपमान करणारे महाभाग आहेत. आजदेखील काल्पी, झाशी, सागर, रावेरखेडी येथे फिरताना तेथील रहिवासी बाजीरावांचा उल्लेख ‘बाजीराव साहेब’ ‘पेशवा (पेसुआ) सरकार’ असा करतात.

आज शनिवार वाड्याचे भग्न अवशेष उरले आहेत. बाजीरावांची रावेरखेडीची समाधी एकाकी आणि दुर्लक्षित अवस्थेत आहे. कोणताही राजकीय नेता तेथे गेलेला ऐकीवात नाही. नर्मदेवरील धरणाची उंची वाढवल्यास ही समाधी पाण्याखाली जाण्याची भीती आहे.

बाजीराव पेशव्यांनी तत्कालीन परिस्थितीचा विस्तृत आढावा घेऊन, सामरिक कौशल्य पणाला लावून मराठी माणसाला संपूर्ण हिंदुस्थानभर विशाल कार्यक्षेत्र निर्माण करून दिले आणि त्याला एक आत्मविश्वास, विजिगिषु वृत्ती दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे रुपांतर प्रबळ मराठी साम्राज्यात केले हे त्यांचे कार्य ऐतिहासिक महत्वाचे आहे.

जो गति ग्राह गजेंद्र की ।

सो गति भयी है आज ।

बाजी जात बुंदेल की ।

बाजी राखो लाज ।

हिंदवी स्वराज्याचे पंतप्रधान अजिंक्य योद्धा श्रीमंत बाजीराव (राऊ) पेशवे यांच्या ३२१ व्या जयंती निमित्त त्यांच्या पावनस्मृतिस विनम्र अभिवादन.

Tribute to greatest Indian cavalry general Bajirao Peshwa on his 321 birth anniversary

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात