विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाचा येत्या पंधरवड्यात विस्तार अपेक्षित असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात नेमकी कोणाची नावे आहेत, याची ठोस माहिती बाहेर येत नाही. त्यामुळे याबाबत राजकीय तर्क वितर्कांना उधाण आले असून महाराष्ट्रातून ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि हिना गावित यांची नावे केंद्रीय मंत्रिपदासाठी आघाडीवर असल्याचे समजते. Narayan rane and hina gawit on the forefront in modi cabinet expansion
नारायण राणे यांना मंत्रिमंडळात स्थान दिले तर महाराष्ट्रातली विशेषतः कोकणातली राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे. तिथे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना चाप लावला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.
शिवाय नारायण राणे हे राज्यातला मराठा समाजातील मोठे नेते आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ते अधिकारवाणीने बोलतात. त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या निवडणुकांची गणितेही नारायण राणेंना बळ दिल्याने बदलू शकतात. कारण भाजपसाठी या महापालिका निवडणूका महत्त्वाच्या आहेत. राणे यांनी बराच काळ शिवसेनेचे मुंबई महापालिकेतले राजकारण हाताळले आहे. त्यांना मुंबईच्या राजकारणातले खाच-खळगे माहिती आहेत. त्यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचाही अनुभव आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला शह देण्यासाठी राणेंचा उपयोग होऊ शकतो. निरोप आल्यावर केंद्रात जाऊ, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे.
चांगली कामगिरी नसलेल्या मंत्र्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो. अनेक नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते. यात हिना गावित यांचेही नाव चर्चेत आहे. त्यांचा लोकसभेतला परफॉर्मन्स चांगला मानला जातो. आदिवासी उच्च शिक्षित चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. उत्तर महाराष्ट्रातल्या मतदारसंघांवर त्यांचा प्रभाव पडू शकतो. याशिवाय ज्योतिरादित्य सिंधिया, सर्वानंद सोनवाल, त्रिवेंद्र सिंह रावत, अनुप्रिया पटेल, सुशील मोदी, रिटा बहुगुणा जोशी, जफर इस्लाम आणि उत्तर प्रदेशचे सत्यदेव पचौरी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते, अशी राजधानीमध्ये चर्चा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App