मोदी विरुद्ध दीदी… काँग्रेस मुक्त भारताच्या दिशेने निघालेली सुसाट गाडी…!!

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. परवाच त्यांनी काँग्रेस फोडून दोन नेत्यांना आपल्या तृणमूल काँग्रेस मध्ये सामील करून घेतले. कीर्ती आझाद यांच्याकडे दिल्लीचे जबाबदारी सोपवली, तर अशोक तंवर यांच्याकडे हरियाणाची. हे दोन्ही काँग्रेसचे नेते आता तृणमूल काँग्रेस आपापल्या राज्यांमध्ये बळकट करण्याच्या कामाला लागतील.काल ममता दीदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पश्चिम बंगालच्या विविध मागण्या मांडल्या. त्रिपुरा हिंसाचाराच्या आणि बीएसएफला कथित स्वरूपात जादा अधिकार दिल्याच्या तक्रारी करून घेतल्या. दरम्यानच्या काळात त्या भाजपचे अंतर्गत बंडखोर नेते सुब्रमण्यम स्वामी यांना भेटल्या.Modi v/s Mamata fight leading towards Congress free India

ममता दीदी दिल्लीत असताना तिकडे मेघालयात काँग्रेस फुटली आहे. काँग्रेसचे १२ आमदार तृणमूल काँग्रेसचे सामील झाले आहेत.पण या पलिकडची सर्वात महत्त्वाची घोषणा ममता दीदींनी दिल्लीत कालच करून टाकली आहे. ती म्हणजे येत्या 30 नोव्हेंबरला त्या मुंबईत येऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या दोन बड्या नेत्यांना भेटणार आहेत. ममता दीदींच्या राजकीय महत्त्वाकांक्षेच्या दृष्टीने या भेटी महत्त्वाच्या ठरणार आहेत.पण यातली आणखीन एक राजकीय मेख एक वेगळीच आहे, ती म्हणजे आपल्या मुंबई दौऱ्यात त्या कोणत्याही काँग्रेस नेत्याला भेटणार नाहीत. म्हणजे निदान कालच्या घोषणेत तरी त्यांनी तसे स्पष्ट केलेले नाही. आपल्या पहिल्या दिल्ली दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर मात्र त्यांचा काँग्रेस नेत्यांशी संबंध फक्त काँग्रेस पक्ष फोडण्यापुरता मर्यादित राहिलेला दिसतो आहे.

आसाम, मणिपूर, त्रिपुरा, गोवा, हरियाणा या राज्यांमध्ये त्यांनी काँग्रेस फोडून त्या पक्षाचे नेते तृणमूल काँग्रेस मध्ये सामील करून घेतले आहेत आणि नंतर त्यांनी आपला मोहरा महाराष्ट्राकडे वळविला आहे. येथे त्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना भेटणार आहेत याचा अर्थ त्या काँग्रेस नेत्यांना भेटणार नाहीत. पण त्या पलिकडचा अर्थ असा घ्यायचा का? की ममता बॅनर्जी या महाराष्ट्रात कोणा काँग्रेस नेत्याला तृणमूल काँग्रेसच्या गळाला लावायला येणार आहेत?, प्रश्न महाराष्ट्र काँग्रेसच्या दृष्टीने गंभीर आहे.

वास्तविक पाहता काँग्रेसला नामोहरम करण्याचे महाराष्ट्रापुरते काम शरद पवारांनी केले आहे. परंतु सध्या ते महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख शिल्पकार असल्याने काँग्रेस फोडण्याच्या दृष्टीने त्यांना मर्यादा आहेत. म्हणजे निदान उघडपणे तरी त्यांना काँग्रेस फोडता येणार नाही. मग काँग्रेस नेत्यांसाठी ते तृणमूल काँग्रेसची वाट मोकळी करून देणार आहेत का?, हा एक प्रकारे शरद पवारांच्या दृष्टीने राजकारणातला वेगळा कात्रजचा घाट आहे का? तो घाट ते काँग्रेसला दाखवणार आहेत का? या प्रश्नाची चर्चा 30 नोव्हेंबरपर्यंत राजकीय वर्तुळात होत राहील.

या पलिकडे जाऊनही ममता बॅनर्जी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा अर्थ लावता येऊ शकतो. तो म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा देऊन काही वर्षे उलटून गेली आहेत. भाजपने तो प्रयत्न करूनही बघितला आहे. मर्यादित अर्थाने ते यशस्वी झाले आहेत. मग त्यापुढची मर्यादा ममता बॅनर्जी या आपल्या राजकीय कृतीतून ओलांडून दाखवणार आहेत का…?? म्हणजे एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काँग्रेस मुक्त भारताचे प्रयत्न ममता बॅनर्जी या काँग्रेस पक्षाचे नेते फोडून त्यांना तृणमूल काँग्रेस मध्ये सामील करून पूर्ण करणार आहेत का…??

2024 ची लोकसभेची लढत मोदी विरुद्ध दीदी अशी होणार असेल तर दीदींची तृणमूळ काँग्रेस ही मूळ काँग्रेसपेक्षा प्रभावी ठरली पाहिजे. मग त्यासाठी काँग्रेस फोडण्याचा हाच मार्ग शिल्लक आहे का? आणि तसे केल्यास मोदींशी टक्कर जरूर घेता येईल आपला राजकीय प्रभाव मोदींच्या तोडीस तोडही निर्माण करता येईल पण त्यासाठी मोदींचे “काँग्रेसमुक्त भारत” हे स्वप्न पूर्ण करावे लागेल…!!

ममता दीदींची ही तयारी आहे का? त्या तयारीला शरद पवार हातभार लावणार आहेत का? या प्रश्नांची सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळात भविष्यकाळात सुरू राहणार आहे. एकूण मोदी विरुद्ध दीदी या राजकीय लढाईची गाडी काँग्रेस मुक्त भारताच्यादिशेने सुसाट सुटण्याची चिन्हे दिसत आहेत.

एकतर मोदींना त्याशिवाय चैन पडणार नाही आणि दीदींना आपले वरचे राजकीय वर्चस्व निर्माण करण्यासाठी काँग्रेस पक्ष फोडण्याशिवाय पर्याय नाही…!! म्हणजेच मोदी विरुद्ध दीदी लढतीची पर्यावसान काँग्रेस मुक्त भारतात होण्याखेरीज दुसरा पर्याय नाही.तृणमूल काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर तर स्पष्टच लिहिले आहे, “तृणमूल काँग्रेसचा परिवार वाढतो आहे…!!”… आणि हीच खरी काँग्रेसमुक्त भारताच्या दिशेने सुसाट सुटलेली गाडी आहे…!!

Modi v/s Mamata fight leading towards Congress free India

महत्त्वाच्या बातम्या