राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला फटका बसला. भाजपचे 3 उमेदवार विजयी झाले. आनंदाचे पेढे खाऊन झाले. पण या दोन्ही पक्षांमध्ये जेवढे नैराश्य अथवा आनंद नाही तेवढी निराशा अथवा आनंद मराठी प्रसार माध्यमांमध्ये कालपासून दाटून आला आहे. महाविकास आघाडीच्या पक्षपाती प्रसार माध्यमांनी चडफडत, धडपडत, खडखडत देवेंद्र फडणवीस यांच्या यशाचे विश्लेषण केले आहे, तर भाजपच्या बाजूने असणाऱ्या तुरळक माध्यमांनी आता “चाणक्यगिरीची” व्याख्याच बदलून महाराष्ट्रात “नवे चाणक्य” उगवल्याची जाहीर घोषणाही करून टाकली आहे!! जणू काही हे “चाणक्य” बारामतीतून शिफ्ट होऊन मुंबईच्या “सागर” बंगल्यात किंवा नागपूरातल्या घरात कायमचे सेटल व्हायला आले आहेत!!Each Election is different and so is the election strategy
महाविकास आघाडीत बेबनाव
मराठी प्रसार माध्यमांची महाविकास आघाडीच्या बाजूची निराशेची उतावळी अथवा भाजपच्या बाजूचा अतिउत्साह राज्यसभा निवडणुकीच्या वास्तव विश्लेषणासाठी गैरलागू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नियोजन पूर्वक राज्यसभेची निवडणूक जिंकली हे जितके सत्य आहे, तितकेच शिवसेनेच्या बाजूने काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे नेते मनापासून उतरले नव्हते ही देखील तितकीच प्रखर वस्तुस्थिती आहे!! पराभव झाला तर तो शिवसेनेचा झाला. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचा झाला. ज्या त्या पक्षाने ज्याचे त्याचे बघावे, अशीच मनोवृत्ती राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेतृत्वांनी दाखवून टाकली आहे. ही त्यांची जुनी सवय आहे. संसदीय राजकारणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नव्याने ओळख होत असेल, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते याप्रकारच्या जोड तोडीच्या संसदीय राजकारणात खानदेशी लोणच्यासारखे मुरलेले आहेत. हे “राजकीय मुरवण” त्यांनी 2022 च्या राज्यसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना दाखवून दिले इतकेच!!
संजय राऊत यांना बसवण्याचा प्लॅन
मुख्यमंत्र्यांच्या आग्रहानुसार मतांचा समान कोटा त्यांनी वरवर ठरवला. परंतु प्रत्यक्षात राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आपापले उमेदवार “सेफ” करून ठेवले, हे त्यांना मिळालेल्या अनुक्रमे (प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी 43) आणि (इम्रान प्रतापगढी, काँग्रेस 44) मतांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. संजय राऊत यांच्या जीवावर बेतले होते, ते बोटावर निभावले. त्यांना कोट्यातली काठावरची 41 मते मिळाली म्हणून ते निवडून येऊ शकले अन्यथा राऊतांचे संजय घरी घालवण्याचा पक्का प्लॅन होता!! त्यामध्ये भाजपच्या बरोबरीने महाविकास आघाडीचे घटक पक्षांचे नेतेही होते हे आता उघड झाले आहे!! असो.
राज्यसभा निवडणुकीत “असा” निकाल लागला म्हणून विधान परिषद निवडणुकीत “तसाच” निकाल लागेल हे मानणे राजकीय भाबडेपणाचे लक्षण ठरेल.
प्रत्येक निवडणूक वेगळी तिची स्ट्रॅटेजी वेगळी. “एका जत्रेने देव म्हातारा होत नाही”, अशी मराठीत म्हण आहे किंबहुना जसा “एका जत्रेने देव म्हातारा होत नाही तसाच तो तरणाही होत नाही”!!, ही खरी म्हणजे म्हण पाहिजे.
विधान परिषदेसाठी स्वतंत्र स्ट्रॅटेजी
त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेली शिवसेना निराशेचे अंग झटकून कामाला लागली, तर भाजपला हवा असेल “तसाच” निकाल लागेल याची खात्री नाही. त्यासाठी भाजपला राज्यसभेपेक्षा वेगळी स्वतंत्र स्ट्रॅटेजी आखावी लागेल, ही वस्तुस्थिती आहे. महाविकास आघाडी देखील स्वतंत्रपणे स्ट्रॅटेजी आखून आपल्या मतांची नियोजनपूर्वक बेगमी करणार असेल, अपक्षांना राज्यसभा निवडणुकीनंतर केलेली दमबाजी आटोक्यात आणून त्यांना विश्वासात घेणार असेल तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा राज्यसभा निवडणुकीत पराभव झाला तसा होईलच याची खात्री भाजपचे नेतेही देऊ शकणार नाहीत.
नुसते चाणक्यगिरीचे लेबल निरुपयोगी
राज्यसभेच्या निवडणुकीतील यशामुळे भाजपने त्यांचा विशेषतः देवेंद्र फडणवीस यांचा आत्मविश्वास दुणावला आहे हे खरेच. त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत राजकीय कर्तृत्व दाखवले हे ही तितकेच खरे. परंतु, म्हणून लगेच “चाणक्य” हे बारामतीतून शिफ्ट होऊन नागपूरच्या घरी किंवा मुंबईच्या “सागर” बंगल्यात सेटल व्हायला गेले असा होत नाही!! प्रत्येक नेत्याचा आपापला राजकीय वकूब, राजकीय क्षमता आहे. त्यानुसार ते काम करतात. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील बारामतीच्या “चाणक्या”चा जो गवागवा चालवला होता, त्याचा फुगा राज्यसभा निवडणुकीत फुटला आहे. दिल्लीच्या राजकारणात तर बारामतीची “चाणक्यगिरी” चालतही नाही. तिथे राजकारणातून बाहेर फेकल्या गेलेल्या विरोधकांची एकजूट करण्याचे काम याच्या या “चाणक्यांकडे” असते!!
भाजपची मतांची गरज 6 × 27 = 162
पण मूळ मुद्दा या चाणक्यगिरीचाही नाही. तो मुद्दा आहे, विधान परिषद निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला गुप्त मतदानाच्या आधारे किमान 27 मते मिळवून देण्याचा. जेवढे उमेदवार उभे त्याला गुणिले 27 या गणिताचा. हे गणित जो पक्ष जुळवून आणेल, त्याचे तेवढे उमेदवार निवडून येतील. भाजपने आपल्या ताकदीपेक्षा पेक्षा 2 उमेदवार जास्त उभे केले आहेत. त्यांना 6 × 27 = 162 मतांची बेगमी करायची आहे. राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अपक्षांची 10 मते भाजप मॅनेज करू शकला. विधान परिषदेसाठी 162 मतांची बेगमी करणे हे मोठे आव्हान आहे. ते कसे पेलले जाते हे पाहणे चाणक्यगिरीचे लेबल लावण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे ठरणार आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App