‘राहुल जी, लोकशाहीची चाड असेल तर आणीबाणीची माफी मागा..’ भाजप राष्ट्रीय सचिव विजया रहाटकरांनी दाखवला मुस्कटदाबींचा आरसा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली/औरंगाबाद : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी स्वतःला लोकशाहीवादी म्हणवून घेतात. उदारमतवादी असल्याची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना थोडी जरी लोकलज्जा असेल आणि लोकशाहीची खरोखरच चाड असेल तर त्यांनी आणीबाणीतील अत्याचारांबाबत जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकरांनी केलीय. त्यासाठी त्यांनी काँग्रेस सरकारांनी जनतेच्या केलेल्या मुस्कटदाबींचे अनेक दाखलेच आपल्या फेसबुक पोस्टवर दिले आहेत. नेहरूंवर टीका करणारया कवितेबद्दल गीतकार मजरूह सुलतानपुरींना केलेली अटक ते यूपीए सरकारने केलेली इंटरनेट सेन्साॅरशिपची वकिली अशी निवडक उदाहरणे त्यांनी दिलीत.  BJP National secretary Vijaya Rahatkar demanded apology from Rahul Gandhi over atrocities in Emergency

शुक्रवारी, २५ जूनरोजी इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीला ४६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त श्रीमती विजया रहाटकर यांनी विस्तृत पोस्ट फेसबुकवर टाकली आहे. त्यात त्यांनी लिहिलंय,  “२५ जून १९७५ रोजी लादलेल्या आणीबाणीला आज ४६ वर्षे होत आहेत.

जनतेच्या अधिकारांवर गदा आणणारया, लोकशाहीला कलंकित करणारया काळ्याकुट्ट आणीबाणीतील अत्याचारांचे स्मरण करण्याचा हा दिवस. पण जनतेची मुस्कटदाबी फक्त आणीबाणीतच झाली, असे नव्हे. पं. नेहरूंपासूनच मुक्त स्वातंत्र्यावर, भाषण स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे अनेक ‘पराक्रम’ केले होते. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे स्वतःला लोकशाहीवादी म्हणवून घेतात. पण त्यांच्याच काँग्रेस सरकारांनी लोकशाहीवर कसे आघात केले होते, याची कल्पना त्यांना नसावी. म्हणून त्यांच्या माहितीसाठी काही निवडक उदाहरण देते आहे… थोडी जर लोकलज्जा असेल आणि लोकशाहीची खरोखरच चाड असेल तर त्यांनी आणीबाणीतील अत्याचारांबाबत जनतेची माफी मागावी.”

श्रीमती रहाटकर यांनी काँग्रेस सरकारांनी जनतेच्या स्वातंत्र्यावर गदा आणलेल्या काही घटनांची जंत्रीच दिली आहे. ती पुढीलप्रमाणे :

  •  देशातील पहिली घटनादुरूस्ती कोणती होती, याची कल्पना आहे? भाषण स्वातंत्र्यावर निर्बंध आणण्याची आणि ती मांडली होती दस्तुरखुद्द पं. नेहरूंनी, जे स्वतःला थोर लोकशाहीवादी म्हणवत होते…
  •  प्रसिद्ध गीतकार मजरूह सुलतानपुरींना तब्बल एक वर्ष तुरुंगात डांबले होते नेहरू सरकारने. त्यांचा गुन्हा होता, नेहरूंवर टीका करणारी कविता केली हा..!
  •  नेहरू सरकारने चक्क काही पुस्तकांवरच बंदी आणली. त्यात मायकेल एडवर्ड यांचे ‘नेहरू : ए पॅलिटिकल बायोग्राफी’ आणि फ्रेंच इतिहासकार चार्ल्स बॅटेलहेम यांच्या ‘इंडिया इंडिपेडंट’ याचा समावेश होता. गुन्हा एकच.. नेहरूंवर टीका!
  •  ‘आँधी’ या चित्रपटावर बंदी आणली. कारण त्या चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेत्री सुचित्रा सेन यांनी साकारलेले मुख्य पात्र हे इंदिराजींवर आधारलेले होते.
  •  किशोरकुमार यांचा आवाज दाबला गेला. कारण आणीबाणीचे समर्थन करण्यासाठी युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यास त्यांनी नकार दिला होता. असेच देव आनंद व मनोज कुमार यांच्याबाबतीतही घडले. दोघांच्या चित्रपटांवर बंदी लादली गेली.
  •  ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटाचे निगेटिव्ह तत्कालीन केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री व आणीबाणीचे खलनायक विद्याचरण शुक्लांनी स्वतः चक्क जाळले होते. विशेष म्हणजे तेव्हा सर्वोच्च न्यायालयात चित्रपटावरील बंदीच्या खटल्याची सुनावणी चालू होती.
  •  विख्यात लेखक सलमान रश्दींनी लिहिलेल्या ‘सॅटेनिक व्हर्सेस’ या पुस्तकावर बंदी घालणारा भारत हा जगातील पहिला देश होता. मुस्लिम धर्ममार्तंडांच्या दबावाखाली राजीव गांधींनी हा निर्णय घेतला होता.
  •  याच राजीव गांधी यांनी भारतीय टपाल कार्यालय विधेयक मांडले होते. कोणतेही टपाल उघडून बघण्याचा अधिकार त्यांनी सरकारकडे घेतला होता. खासगीपणावर वार करणारे हे विधेयक सुदैवाने रद्दबातल ठरले, कारण तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांनी त्यावर सही करण्यास नकार दिला होता.
  •  प्रेषित महमंदासंदर्भात ‘चार्ली हेब्दो’मधील वादग्रस्त व्यंगचित्रांवर २०१२ मध्ये डाॅ. मनमोहनसिंह सरकारने बंदी घातली होती. यूटूबवरीलवरील एक इस्लामविरोधी डॉक्युमेंटरी हटविण्यास मनमोहनसिंह सरकारने यूट्यूबला बाध्य केले होते.
  •  सोशल मीडियासाठी मोदी सरकारने बनवलेल्या नियमावलीवर बोट ठेवणारया राहुल गांधी यांच्या यूपीए सरकारने तर इंटरनेट सेन्सॉरशिपची वकिली केली होती. गुगल, फेसबुकवरील मजकूराची छाननी करण्याचा आग्रह धरला होता. निमित्त झाले होते सोनिया गांधींसंदर्भात टाकलेल्या काही वादग्रस्त मजकुरांचे…
  •  मुक्त भाषण स्वातंत्र्यावर घाला घालणारे कलम ६६ हे माहिती तंत्रज्ञान कायद्यात घुसविले होते यूपीए सरकारनेच. पुढे ते सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविले.

BJP National secretary Vijaya Rahatkar demanded apology from Rahul Gandhi over atrocities in Emergency

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात