विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना संकटाचा सामना करताना लॉकडाऊनचा अत्यंत सकारात्मक परिणाम झाला. योग्य वेळी लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे देशातील जवळपास १.२ लाख ते २.१ लाख लोकांचे जीव वाचले, असा सांख्यिकी अभ्यास निष्कर्ष काढण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयाने वेगवेगळ्या संख्याशास्त्रीय मॉडेलवर आधारित अभ्यासाचे निष्कर्ष आज जाहीर केले.
बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या मॉडेलनुसार लॉकडाऊन जाहीर केला नसता तर देशातील करोना रुग्णांची संख्या ३६ ते ७० लाखांवर गेली असती अशी माहिती सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव प्रवीण श्रीवास्तव यांनी दिली. संबंधित आकडेवारीतून लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंग या किती प्रभावी उपाययोजना ठरल्या हे दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने लॉकडाऊन किती प्रभावी ठरला हे दर्शविण्यासाठी दोन अंदाज मांडले आहेत. त्यानुसार, लॉकडाऊनमुळे ३६ ते ७० लाख लोक करोनाची लागण होण्यापासून बचावले आहेत. तर १.२ लाख ते २.१ लाख लोकांचे जीव वाचले आहेत. तसेच पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियानुसार (PHFI) ७८ हजार लोकांचे जीव वाचले आहेत. तर MK&SR यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, २३ लाख लोकांचा करोनापासून बचाव झाला असून ६८ हजार लोकांचा जीव वाचला आहे.
सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, या शास्त्रीय अभ्यासासाठी जे मॉडेल स्वीकारले आहे त्यानुसार केंद्र सरकारने योग्य वेळी लॉकडाऊन जाहीर केल्याने आणि सुरवातीचे दिवस त्यांची प्रत्यक्ष प्रभावी अंमलबजावणी झाल्याने १४ ते २९ लाख लोकांना करोना संसर्गापासून दूर ठेवण्यात यश मिळवता आले. ३७ ते ७८ हजार लोकांचा जीव वाचू शकला आहे, अशी माहिती प्रवीण श्रीवास्तव यांनी दिली आहे.
एम्पॉवर्ड ग्रुपचे चेअरमन व्ही. के. पॉल यांनी या विषयी तपशीलवार माहिती दिली आहे. ते म्हणाले, “लॉकडाउनमुळे आपण तीन गोष्टी साध्य करू शकलो. मृतांची संख्या, करोना रुग्णांची संख्या तर करोनाचा प्रसार करणाऱ्यांची संख्या यांना प्रभावीरित्या कमी करण्यात व कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यात लॉकडाउनमुळे यश मिळवू शकलो.” भारतात सध्या करोनाचे १ लाख १८ हजार ४४७ रुग्ण असून ३५८३ जणांचा मृत्यू झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App