दिलासा…तब्बल ४३१ जिल्ह्यांत नाही एकही रूग्ण! फोकस ७५ जिल्हे व १५ हाॅटस्पाॅटवरच..!! तरीही लागतील किमान तीन आठवडे!!!


कार्तिक कारंडे

नवी दिल्ली : १४ एप्रिलला संपत असलेला २१ दिवसांचा राष्ट्रीय लाॅकडाऊनचा कालावधी वाढणार की नाही, याबाबत प्रचंड उत्सुकता आणि अस्वस्थताही असताना एक महत्वाची आकडेवारी समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ७३६ पैकी तब्बल ४३१ जिल्हांमध्येही चीनी व्हायरसचा एकही रूग्ण अद्याप नाही. ८० टक्के रूग्ण १९ राज्यांतील ७५ जिल्ह्यांमध्येच असून त्यातही १५ जिल्हे हे खरया अर्थाने ‘हाॅट स्पाॅट’ मानता येतील. लाॅकडाऊन चालू ठेवले तरी या व्हायरसला रोखण्यासाठी किमान तीन आठवडे तरी लागतीलच, असा अंदाजही वर्तविला आहे.

१४ एप्रिलला लाॅकडाऊनचा घोषित कालावधी संपत आहे. आता पुढे काय करावयाचे, हे ठरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवार, दि. ११ एप्रिलरोजी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत. यापूर्वी त्यांनी सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलाविली होती आणि लाॅकडाऊन कालावधी वाढविण्याचे संकेत दिले होते. तसेच ओडिशा आणि पंजाब या दोन राज्यांनी तर ३१ एप्रिलपर्यंत लाॅकड़ाऊन वाढविण्याची घोषणा शुक्रवार, दि. १० रोजीच केलेली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनी व्हायरसचा प्रादूर्भाव ७३६ प्रशासकीय जिल्ह्यांपैकी फक्त ७५ जिल्ह्यांत आणि त्यातही पंधरा जिल्ह्यांमध्येच केंद्रीत झाला आहे. जर ४३१ जिल्हे जर व्हायरसमुक्त असतील, तर तेथील लाॅकडाऊन वाढविले जाणार का, या प्रश्नांवर त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. “पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतच अंतिम निर्णय घेतला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

स्वयंपूर्णतेच्या दिशेने…

व्यक्तिगत सुरक्षा उपकरणे (पीपीई), एन-९५ मास्क आदींच्या पुरवठ्याबाबत विचारला असता सूत्र म्हणाले, “या अत्यावश्यक सुविधांचा पुरवठा आता सुरळीत झाला आहे. १५ एप्रिलपर्यंत १० लाख ‘पीपीई’ येतील आणि सव्वा कोटी ‘पीपीईं’ची खरेदी आदेश (पर्सेच ऑर्डर) दिलेली आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे, ही चीनी व्हायरसची आपत्ती आपल्यासाठी इष्टापत्तीच ठरते आहे. ‘पीपीई’, व्हेंटिलेटर्स, ‘एन-९५’ मास्क आदींबाबत आपण स्वयंपूर्ण नव्हतो. आता मात्र, स्वदेशी उत्पादनाला चांगलीच चालना मिळाली आहे. विशाखापट्टणम, लुधियाना आणि राजकोट ही तीन शहरे या उत्पादनांची केंद्रे (हब) म्हणून वेगाने विकसित होत आहेत. जवळपास ४० कंपन्यांनी त्याचे उत्पादन चालू केलेले आहे.”

वैद्यकीय तयारी जय्यत…

चीनी व्हायरसाचा विस्फोट झाला तरी देशाची आरोग्य व्यवस्था सक्षम असल्याचे सूत्रांनी सांगितले. पाचशे खास रूग्णालये, दोन लाखांहून अधिक बेड्स, पन्नास हजारांहून अधिक आयसीयू बेड्स, २० हजार व्हेंटिलेटर्स (४० हजार व्हेंटिलेटर्सची खरेदी ऑर्डर) आपल्याकडे तयार आहेत. चाचण्यांची संख्याही वेगाने वाढतेय. शुक्रवारी दिवसभरांत सोळा हजारांहून अधिक चाचण्या झाल्या. आतापर्यंतच्या चाचण्यांची संख्या दीड लाखांच्या आसपास आहे. आता तर प्रतिदिन एक लाख चाचण्या करण्याची क्षमता विकसित करण्यात येत आहे. रॅपिड टेस्टिंगसाठी आठ खासगी कंपन्यांना परवानगी दिलेली आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात