विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय वायू दलाला आवश्यक असलेली मालवाहू विमाने मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ४ ते १० टन पर्यंतचे वजन वाहून नेण्याची क्षमता असलेली एकूण ५६ मालवाहू विमाने घेण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला.यानिमित्ताने पहिल्यांदाच देशातील खाजगी कंपनी मालवाहू विमानांची निर्मिती करणार असून यामुळे ६ हजार पेक्षा जास्त रोजगार निर्मिती होईल असा अंदाज आहे.Tata’s first cargo aircraft maker, 56 cargo planes to join Indian Air Force
सध्या भारतीय वायू दलात असलेल्या, जुन्या तंत्रज्ञानाच्या मालवाहू विमानांची जागा ही आधुनिक मालवाहू विमाने घेतील. पॅराट्रुपर्स आणि सैन्य दलासाठी आवश्यक सामानाची वाहतूक करण्याकरता या मालवाहू विमानांचा उपयोग होणार आहे.
एअरबस कंपनीची एअरबस डिफेन्स अँड स्पेस आणि टाटाची टाटा अॅडव्हान्स सिस्टीम लिमिटेड हे संयुक्तरित्या भारतात मालवाहू विमानांची निर्मिती करणार आहेत. यासाठी दोन्ही कंपन्या आणि भारतीय वायू दल असा तिघांमध्ये करार होणार आहे. हा एकूण करार सुमारे अडीच अब्ज डॉलर्स एवढा असणार आहे.
करार झाल्यानंतर ४८ महिन्यांत एअरबस पहिली १६ विमाने थेट भारतीय वायू दलाकडे हस्तांतरित करणार आहे. उर्वरित ४० विमाने ही भारतात एअरबस आणि टाटा हे संयुक्तरित्या बनवणार आहेत.
१९६० दशकांतील तंत्रज्ञान असलेली मालवाहू विमाने एकेकाळी भारतीय वायू दलाचा कणा होती. मात्र जुने झालेले तंत्रज्ञान, वारंवार होणारे अपघात, देखभालीसाठी होणार खर्च लक्षात घेता ही विमाने सेवेतून बाद करण्याचा निर्णय २०१० च्या सुमारास घेण्यात आला.
या विमानांची जागा घेण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र विविध कारणांनी या प्रक्रियेला उशीर होत अखेर नव्या मालवाहू विमानाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
एअरबस कंपनीनचे तंत्रज्ञान असलेली सी -२९५ जातीची मालवाहू विमाने ही जगातील १५ देशांच्या वायू दलात २००१ पासून कार्यरत आहेत. १० टन पर्यतचे वजन एका दमात २००० किलोमीटर पर्यंत वाहून नेण्याची या मालवाहू विमानांची क्षमता आहे.
जगातील अत्याधुनिक अशा या मालवाहू विमानांच्या समावेशामुळे भारतीय वायू दलाच्या ताकदीत भर पडणार आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच देशातील खाजगी कंपनी मालवाहू विमानांची निर्मिती करणार असून यामुळे ६ हजार पेक्षा जास्त रोजगार निर्मिती होईल असा अंदाज आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App