परवेज मुशर्रफ : पाकिस्तानी लष्करशहा, भारतासाठी कारगिलचा मास्टर माईंड ते आग्रा समझोत्यातील अडथळा!!


विशेष प्रतिनिधी

परवेज मुशर्रफ यांच्या निधनाने भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधातील एक महत्त्वाचा कालखंड इतिहास जमा झाला आहे. परवेज मुशर्रफ पाकिस्तान साठी यशस्वी लष्कर प्रमुख, एक राष्ट्राध्यक्ष आणि नंतर एक देशद्रोही असेल, पण भारतासाठी मात्र परवेज मुशर्रफ कारगिल घुसखोरीचा मास्टर माईंड आणि आग्रा समझोत्यातील अडथळाच ठरला होते. हेच ते परवेज मुशर्रफ होते, ज्यांनी अटल बिहारी वाजपेयी – नवाज शरीफ यांच्यातील समझोताच्या सर्व शक्यता आणि प्रयत्न अपयशी ठरविले होते. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील संबंधांमध्ये चिरस्थायी शांतता निर्माण होण्याची शक्यता पुसून टाकली होती. याच परवेज मुशर्रफ यांनी नवाज शरीफ यांची सत्ता पाकिस्तानात लष्करी बंड घडवून उलथवून टाकली होती. Parvez Musharraf : kargil Mastermind and obstruction in agra summit

… आणि जेव्हा स्वतः पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष म्हणून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर अडचणीत आले, त्यावेळी याच मुशर्रफ यांनी वाजपेयींसमोर मैत्रीचा हात पुढे केला होता. वाजपेयी आणि नवाज शरीफ यांच्यातील समझोता फलदरूप होऊ नये म्हणून याच परवेज मुशर्रफ यांनी कारगिल मधील घुसखोरी घडवून आणली. पाकव्याप्त काश्मीर मधल्या बकरवालांना हाताशी धरून त्यांनी कारगिलची घुसखोरी घडवली होती. त्यामुळे भारताला एक छोटे युद्ध लढावे लागले. पाकिस्तानला पराभूत करावे लागले. पण या पराभवातून धडा शिकून पाकिस्तान शांततेच्या मार्गावर निघालेला परवेज मुशर्रफना सहन झाले नव्हते.

परवेज मुशर्रफ यांनी नवाज शरीफ यांची राजवट लष्करी उठाव करून उलथवून टाकली, तेव्हा सुरवातीला त्यांनी स्वतःला चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफ पाकिस्तान जाहीर केले आणि नंतर पाकिस्तानची राजकीय सत्ता काबीज करून स्वतःला राष्ट्राध्यक्ष घोषित केले होते. आपण लोकशाहीवादी असल्याचा आव त्यांनी त्यावेळी आणला होता.

पण आंतरराष्ट्रीय पातळीवर परवेज मुशर्रफ यांना कायम लष्करशहा असेच संबोधले गेले. लोकशाही अधिमान्यता असलेली राजवट परवेज मुशर्रफ पाकिस्तानात आठ वर्षात आणू शकले नाहीत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या राजवटीची अधिमान्यता वाढावी यासाठीच मुशर्रफ यांनी अटल बिहारी वाजपेयींसमोर मैत्रीचा प्रस्ताव ठेवला होता. भारताच्या बॅकडोअर डिप्लोमसीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दाखवले आणि त्यातून वाजपेयी – मुशर्रफ आग्रा समीट घडली. मुशर्रफ दोन दिवस आग्रा समीट साठी भारतात जरूर आले. मुत्सद्देगिरीच्या पातळीवर सलग दोन दिवस मोठमोठ्या चर्चा झाल्या. आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष या आग्रा समीटकडे लागून राहिले होते. पण आग्रा समीट अपयशी ठरली. भारत – पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये कोणत्याही करारावर स्वाक्षऱ्या झाल्या नाहीत.

आग्रा समझोता होणार आणि भारत पाकिस्तान यांच्यात चिरस्थायी शांतता नांदणार अशी अपेक्षा असतानाच भारताचे त्यावेळचे उपपंतप्रधान आणि गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी परवेज मुशर्रफ यांच्यासमोर गुन्हेगार प्रत्यार्पण कराराचा प्रस्ताव ठेवला आणि इथेच मुशर्रफ यांच्या मधला लष्करशहा सावध झाला. पाकिस्तान बरोबर भारताचा गुन्हेगार प्रत्यार्पण पण करार झाला असता तर मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टर माईंड आणि आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिमला पाकिस्तानला भारताला सोपवावे लागले असते. त्याची फार मोठी किंमत पाकिस्तानला मोजावी लागली असती. त्यामुळे दाऊद इब्राहिम पाकिस्तानात नाहीच, असा दावा करून मुशर्रफ यांनी लालकृष्ण अडवाणींचा प्रस्ताव फेटाळला आणि तिथेच आग्रा समीट गुंडाळली गेला. त्यानंतर आग्रा समीट अयशस्वी का झाली?, याच्या चर्चा त्या वेळच्या प्रसार माध्यमांनी भरपूर केल्या. भारताचे रिसर्च अँड अनॅलिसिसचे माजी प्रमुख दुलत यांनी लालकृष्ण अडवाणींना त्यासाठी दोषी ठरवले. पण आग्रा समझोता होऊ शकली नसल्याची वस्तुस्थिती वेगळीच होती. आडवाणींनी गुन्हेगार प्रत्यार्पण कराराचा ठेवलेला प्रस्ताव हे त्याचे अत्यंत महत्त्वाचे कारण होते.

सुरुवातीला नवाज शरीफ यांनी केलेले प्रयत्न ज्या पद्धतीने परवेज मुशर्रफ यांनी उधळून लावले होते आणि नंतर तेच प्रयत्न त्यांनी स्वतः केले होते. पण त्या प्रयत्नांना स्वतःच्याच कर्तृत्वाने हरताळ फासून मुशर्रफ यांनी आपले नाव कारगिलचा मास्टर माईंड आणि आग्रा समझोत्यातील अडथळा या स्वरूपात इतिहासात नमूद केले आहे. परवेज मुशर्रफ यांच्या निधनानंतर पाकिस्तानात त्यांच्याविषयी काय बोलले जायचे ते बोलले जावो, पण त्यांच्या निधनाने भारतासाठी मात्र मित्राचे रूप दाखविणारा एक शत्रू आता नाहीसा झाला आहे.

Parvez Musharraf : kargil Mastermind and obstruction in agra summit

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात