Azadi Ka Amrit Mahostav : स्वतंत्र भारताला अर्थमंत्री आणि कायदे पंडित शिक्षणमंत्री देणारे लोकमान्य टिळक!!


भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या विषयी सर्वसामान्यांना शेंगांची गोष्ट, मंडलेचा तुरुंगवास आणि फारतर गीतारहस्य या पलिकडे फारशी माहिती नसते. आणि अलिकडच्या काळात तर लोकमान्य टिळकांचा उल्लेख हा प्रामुख्याने सामाजिक वादाच्या पार्श्वभूमीवर केला जातो. Lokmanya Tilak inspired C. D. Deshmukh and Justice M C. Chagla for their endeavours

लोकमान्यांची उद्यमशीलता

पण लोकमान्य यांचे व्यक्तिमत्व या सर्वांच्या पलिकडचे भारतव्यापी होते. किंबहुना शतपैलू होते. यापैकी त्यांचा एक अज्ञात पैलू म्हणजे उद्यमशीलतेचा. लोकमान्यांचे राजकीय पूर्वसूरी दादाभाई नवरोजी आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी हिंदुस्थानच्या दारिद्र्याची अचूक मीमांसा केली होती. भारत उद्यमशीलतेत मागे पडला आणि तेथे पराभूत झाला, हा त्यांच्या मीमांसेचा महत्त्वाचा धागा होता. यातून लोकमान्य टिळकांच्या पिढीने धडा घेऊन उद्योगधंद्यांची मुहूर्तमेढ रोवण्याचा प्रयत्न केला.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात लोकमान्यांनी औद्योगिक प्रदर्शन भरवायला सुरुवात केली होती. पहिल्या औद्योगिक प्रदर्शनात न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांनी सहभाग घेतला होता. लोकमान्यांचे परराष्ट्र मंत्री म्हणून गाजलेले नाटककार कृष्णाजी प्रभाकर उर्फ काकासाहेब खाडिलकर यांनी लोकमान्य यांच्या मदतीने नेपाळमध्ये शस्त्रास्त्रांचा कारखाना काढला होता, तर स्वतः लोकमान्यांनी लातूरमध्ये जिनिंग मिल काढली होती. हा झाला लोकमान्य यांचा औद्योगिक पैलू!!



लंडन मधल्या दोन मौलिक भेटी

पण लोकमान्य केवळ हिंदुस्थानातच कार्यरत राहणारे व्यक्तिमत्व नव्हते. चिरोल खटल्याच्या निमित्ताने 1918 चा उत्तरार्ध आणि 1919 ची सुरुवात अशा 13 महिन्यांमध्ये इंग्लंडमध्ये महिने त्यांचे वास्तव्य होते. तेव्हा तिथल्या औद्योगिक प्रगतीची पाहणी आणि त्यातून हिंदुस्थानाला घेता येण्यासारखे लाभ याचाही विचार त्यांनी केला होता आणि त्या पलिकडे जाऊन लोकमान्यांनी आपल्या इंग्लंड दौऱ्यात दोन अशा तरुणांना आयुष्यभरासाठी प्रेरणा दिली की ज्यामुळे हिंदुस्थानला स्वतंत्र भारताला अर्थमंत्री आणि कायदे पंडित शिक्षणमंत्री मिळू शकले. सी. डी. देशमुख आणि न्यायमूर्ती मोहम्मद करीम छागला ही त्यांची नावे!!

सी. डी. देशमुख यांची भेट

सी. डी. देशमुख यांनी आपल्या इंग्लंड मधल्या वास्तव्यात लोकमान्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे मार्गदर्शन घेतले होते. त्यावेळी तरुण असणाऱ्या देशमुखांना शिक्षण सोडून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उतरण्याची इच्छा होती. परंतु लोकमान्यांनी त्यांना त्यापासून परावृत्त केले. देशमुखांची व्युत्पन्न बुद्धिमत्ता पाहून लोकमान्यांनी त्यांना आयसीएस अजिबात सोडू नये, असा सल्ला दिला.

हिंदुस्थानला लवकरच स्वातंत्र्य मिळणार आहे. त्यामुळे आपल्यासारखे उच्चविद्याविभूषित अधिकारी हिंदुस्थानला राज्यशकट चालवण्यासाठी लागतीलच. त्यामुळे शिक्षणाचा मार्ग सोडू नये, असा सल्ला लोकमान्यांनी देशमुखांना दिला आणि लोकमान्यांसारख्या महापुरुषाचा सल्ला म्हणून त्यांनी तो मान्य केला. त्यातूनच पुढे सी. डी. देशमुख हे अव्वल क्रमांकाने आयसीएस झाले. नंतर भारताच्या अर्थमंत्री पदापर्यंत पोहोचले. हा स्पष्ट उल्लेख स्वतः देशमुखांनी आपले आत्मचरित्र “माय कोर्स ऑफ लाईफ” मध्ये आवर्जून केला आहे.

मोहम्मद करीम छागला यांची भेट

जी गोष्ट सी. डी. देशमुख यांची, तीच गोष्ट न्यायमूर्ती मोहम्मद करीम छागला यांची. छागलांनी लोकमान्यांना प्रत्यक्ष दोनदा पाहिले होते. एक त्यांच्या राजद्रोहाच्या 1908 च्या खटल्याच्या वेळी आणि नंतर 1918 साली लंडनमध्ये. छागला आपल्या शाळकरी वयात लोकमान्यांचा खटला ऐकण्यासाठी स्वदेशी पोशाख करून मुंबईच्या न्यायालयात उपस्थित राहात असत. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना हे लोकमान्यांचे वकील होते. ते कसा युक्तिवाद करतात?? लोकमान्यांशी कशी सल्लामसलत करतात??, हे छागला यांनी त्यावेळी जवळून पाहिल्याची नोंद आपल्या “रोजेस इन डिसेंबर” आत्मचरित्रात केली आहे.

लोकमान्य यांच्या इंग्लंड दौऱ्यात छागला हे देखील त्यांना त्यांचे त्यावेळचे निवासस्थान “6 टोल्बट रोड” येथे भेटून आले होते. लोकमान्यांनी त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन केले होते. या प्रेरणेतूनच त्यांनी कायदे पंडित होण्याचा आणि नंतर शिक्षण क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचा उल्लेख केला आहे. छागला हे नंतर न्यायमूर्ती तर झालेच, परंतु नंतर त्यांनी केंद्रात शिक्षण मंत्रीपदही भूषवले होते. हेच ते न्यायमूर्ती छागल आहेत, ज्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असताना लोकमान्यांची अनोखी स्मृती जपली आहे. न्यायालयाच्या ज्या दालनात लोकमान्यांविरुद्ध राजद्रोहाचा खटला चालला, त्या दालना बाहेर लोकमान्यांच्या ऐतिहासिक प्रसिद्ध उद्गारांचा संगमरवरी नाम फलक छागला यांनीच तेथे लावून घेतला आहे. आजही तो या न्यायालयाचे भूषण ठरला आहे.

लोकमान्यांच्या सहवासात जीवनाला दिशा

लोकमान्यांसारख्या महापुरुषाच्या एक – दोन भेटींच्या सहवासातच सी. डी. देशमुख आणि न्यायमूर्ती छागला यांना आपल्या जीवनाची दिशा सापडली होती आणि त्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख त्यांनी आपापल्या आत्मचरित्रांमध्ये करून ठेवून भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्वोच्च धुरिणाच्या जीवनातला वेगळा पैलू समस्त भारतीयांना दाखवून दिला आहे!!

Lokmanya Tilak inspired C. D. Deshmukh and Justice M C. Chagla for their endeavours

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात