राहुल गांधी : सततच्या चेहरा बदलाने प्रतिमा निर्माण होणार तरी कशी??


विशेष प्रतिनिधी

काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या देशभरात राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्यांनी स्वतः आणि काँग्रेस पक्षाने जे राजकीय प्रयत्न केले त्याचे हे फळ आहे. How does the constant face change create an image?

मध्यंतरी केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि राज्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष यांच्या एकमेकांशी असलेल्या टकरीत काँग्रेस पक्षाची अवस्था नेमकी काय होणार??, याची चिंता भेडसावत होती. पण राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला दक्षिणेतील राज्यांमध्ये मिळालेल्या प्रतिसाद पाहता काँग्रेसची राजकीय आशा केवळ जिवंत राहिली असे नव्हे, तर तिला नवे धुमारेही फुटू शकतात, याची खात्री काँग्रेसच्या नेतृत्वाला वाटू लागली आहे. त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. भारत छोडो यात्रा जसजशी पुढे सरकते आहे, तसतसा या आत्मविश्वासात भर पडते आहे.

त्यातूनच राहुल गांधींनी कालच्या एक नोव्हेंबर 2022 च्या हैदराबादच्या सभेत एकाच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्या आधीच्या यात्रेत केरळ आणि तामिळनाडू मध्ये त्यांनी प्रादेशिक पक्षांवरचा हल्लाबोल किमान थेट तरी टाळला होता. पण तेलंगण मध्ये मात्र त्यांनी पवित्रा बदलला आणि काँग्रेसची मूळ स्ट्रॅटेजी बाहेर काढली. काँग्रेसला एकाच वेळी भाजप आणि प्रादेशिक पक्ष यांच्याशी टक्कर घ्यावी लागणार आहे, हे वास्तव स्वीकारून पक्ष संघटना बळकट करावी लागणार आहे. हे वास्तव राहुल गांधींनी स्वीकारले आहे आणि ते त्यांच्या भारत जोडो यात्रेत प्रतिबिंबितही होत आहे.

 लिबरल्सना लागलेला शोध

याखेरीज एक महत्त्वाचा पैलू म्हणजे अनेक लिबरल्स राहुल गांधींच्या मध्ये नवे नेतृत्व शोधत आहेत. मग ते स्वराज चळवळीचे नेते माजी पत्रकार योगेंद्र यादव असोत, की अभिनेत्री पूजा भट्ट. हे यात्रेत उघडपणे सामील झाले आहेत. दक्षिणेतले काही अभिनेते आणि अभिनेत्री देखील यात्रेत सामील झाले. त्यांना राहुल गांधींच्या नेतृत्वाविषयी नवी आशा निर्माण झाली आहे.

राहुल गांधी दाढी आणि फॅशन

पण या सगळ्या सकारात्मक बाबींमध्ये खुद्द राहुल गांधींच्या व्यक्तिमत्वाल्या बदलातून यावर एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, ते म्हणजे राहुल गांधी सातत्याने आपला चेहरा बदलत आहेत. हा चेहरामोहरा राजकीय नाही, तर प्रत्यक्ष ते कधी दाढी वाढवतात, तर कधी ते साफचट दाढी करतात, कधी ते जीन्स आणि झब्यामध्ये किंवा झब्बा आणि पायजम्या मध्ये वावरतात, तर कधी जीन्स टी-शर्ट मध्ये वावरतात. भारत जोडो यात्रेत त्यांनी आपला पोशाख टी-शर्ट आणि जीन्स असा ठेवला आहे.

पोशाख बदलणे आणि त्यामध्ये ट्रेंडी असणे हे फॅशन आयकॉनचे लक्षण आहे. राजकीय नेत्यांच्या बाबतीत फारसे तसे नाही. उलट ते जे परिधान करतात, त्याची फॅशन होते आणि तो पोशाख ट्रेंड होतो. खुद्द राहुल गांधींनी सुद्धा त्यांच्या राजकारण प्रवेशाच्या वेळी जीन्स वर झब्बा ही फॅशन पॉप्युलर केली होती.

दरम्यानच्या काळात काँग्रेसची सत्ता गेली. आणि साधारण गेल्या 8 वर्षांचा अनुभव लक्षात घेता राहुल गांधींनी सतत आपल्या चेहऱ्यामध्ये आणि फॅशनमध्ये बदल केला आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे कधी ते दाढी राखतात, तर कधी साफचट दाढी करतात. कधी ते जीन्स झब्बा वापरतात, तर कधी टी-शर्ट जीन्स वापरतात. यामुळे खरंच प्रश्न पडतो की राहुल गांधींची एक गंभीर राजकीय नेता म्हणून प्रतिमा कशी निर्माण होऊ शकेल??

मोदींची फॅशन आणि प्रतिमा निर्मिती

वर उल्लेख केल्याप्रमाणे गेल्या 8 वर्षांमध्ये त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहिले, तर त्यांनी आपल्या पोशाखात किंवा आपल्या अपिअरन्समध्ये कितपत बदल केला आहे?? या प्रश्नाचे उत्तर बऱ्यापैकी नकारात्मक आहे. मोदींनी पंतप्रधान बनल्यापासून फुल कुडता अफवा हाफ कुडता, त्यावर जॅकेट आणि सुरुवार हा पोशाख फारसा बदललेला नाही. क्वचित प्रसंगी ते जोधपुरी सूट परदेशात घालतात. पण मोदींनी जॅकेट पुन्हा एवढे पॉप्युलर केले की ते “नेहरू जॅकेट”चे “मोदी जॅकेट” झाले… म्हणजे एकीकडे मोदी यांच्यासारखे स्वतःची प्रतिमा जपून फॅशन करणारे नेते, तर दुसरीकडे राहुल गांधी हे सतत चेहरा बदलत राहणारे नेते… असा सामना दिसतो आहे. आणि म्हणूनच वर उपस्थित केलेला प्रश्न की सतत चेहरा बदलाने राहुल गांधी यांची देशव्यापी प्रतिमा निर्माण होणार तरी कशी?? हा मूलभूत मुद्दा आहे.

प्रतिमा निर्मितीचे महत्त्व

राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेसाठी घेतलेले कष्ट, त्याला काँग्रेसजनांनी दिलेली साथ आणि एकूणच भारत जोडो यात्रेला मिळालेला प्रतिसाद या सर्व बाबी सकारात्मक आहेत. काँग्रेससाठी यातून गुड न्यूज येऊ शकते. पण राहुल गांधींच्या मात्र सतत चेहरा बदलाने त्यांच्या प्रतिमा निर्माणाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा फार महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे.

Constant change in outlook and outfits is major hurdle in image building of Rahul Gandhi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात