विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकच्या 11 व्या दिवशी भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. कुस्तीपटू विनाश फोगटने फायनलमध्ये धडक देत भारतीयांना खूप आनंदाची बातमी दिली. अंतिम फेरीत प्रवेश करुन विनेश फोगाट आता सुवर्णपदकासाठी लढत देत आहे. भारतीयांना आता विनेशकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. Vinesh Phogat in Paris Olympic
पण दुसरीकडे भारतात लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मंडीची भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत यांच्यात राजकीय लढत रंगली आहे. दोन्ही नेत्यांनी विनेशचे अभिनंदन करताना ते निर्भेळ अभिनंदन केले नाही, तर त्यामध्ये आपापले राजकारण साधून घेतले. चॅम्पियन मैदातूनच उत्तर देत असतात. ज्यांनी विनेश आणि तिच्या सहकारी कुस्तिगीरांचा संघर्ष खोटा ठरवला, त्या विनेशच्या यशाची गर्जना दिल्लीत ऐकू येत आहे, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले.
कंगनाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यात तिने म्हटलं आहे की, ‘भारताला पहिलं गोल्ड मिळेल यासाठी प्रार्थना करते. विनेश फोगाट हिने एके काळी आंदोलनात सहभाग नोंदवला होता. त्यावेळी तिने म्हटलं होतं की, ‘मोदी तेरी कब्र खुदेगी’. त्यानंतरही विनेग फोगाटला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्यांना बेस्ट ट्रेनिंग, कोच आणि सोयी मिळाल्या. हेच लोकशाही आणि उत्तम लीडर असल्याची पावती आहे.’ कंगनाच्या या इन्स्टापोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत तर सोशल मीडियावरही ही पोस्ट व्हायरल झाली.
पॅरिस ऑलिंपिक मध्ये मॅटवर कुस्ती खेळून विनेशने पदकापर्यंत पोहोचण्याची धमक दाखवली. पण भारतात त्यावरून राजकारण रंगले.
काय आहे प्रकरण?
29 वर्षांच्या विनेश फोगाटने मागील वर्षी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख बृजभूषण सिंह शरण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधातील आंदोलनाचे नेतृत्व करत अनेक दिवस कुस्तीपासूनही दूर होती. मात्र, आता विनेश फोगाटने ऑलिम्पिकमध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. विनेश पहिल्यांदा 50 किलोच्या वजनी गटासाठी खेळली आहे. यापूर्वी ती 53 किलो वजनी खेळली होती.
ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणारी विनेश फोगट ही भारतातील पहिली कुस्तीपटू ठरली आहे. त्यामुळं एकप्रकारे विनेशने इतिहास रचला आहे. मंगळवारी तिने महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाईल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमनचा 5-0 ने पराभव केला. आज विनेशचा फायनलचा सामना होणार आहे.
फोगटने क्वार्टर फायनल फेरीत उत्तम विजय मिळवला होता. तिने युक्रेनच्या ओस्काना लिवाचचा 7-5 असा पराभव केला. विनेशने प्री-क्वार्टर फायनलमध्ये विद्यमान चॅम्पियन जपानच्या सुसाई युईचा पराभव केला होता. विनेशने पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेची सेमीफायनल गाठली होती. याआधी 2016 आणि 2020 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिला क्वार्टर फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more