विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हिंदू समाजातील विघटित अवस्था, त्याचे वेगवेगळे सामाजिक आणि राजकीय दुष्परिणाम लक्षात घेऊन विश्व हिंदू परिषदेने ( Vishwa Hindu Parishad )मागासवर्गीयांपर्यंत पोहोचण्यासाठी संपूर्ण देशभरात छोटी मोठी तब्बल 9000 ब्लॉक मध्ये धर्मसभा आणि संमेलने आयोजित केली आहेत.
नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला महाराष्ट्र आणि अन्य काही हिंदी भाषिक राज्यात मोठा फटका बसला होता. 2019 च्या तुलनेत अनेक राज्यात भाजपाच्या जागांची संख्या घटली. 2019 मध्ये स्वबळावर सत्ता मिळवण्याऱ्या भाजपाला यंदा बहुमताचा आकडाही पार करता आला नाही. या निडणुकीत दलित मतदार भाजपापासून दुरावल्याने भाजपावर ही परिस्थिती ओढवल्याची चर्चाही मोठ्या प्रमाणात झाली. दरम्यान, या दलित मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आता संघ परिवार मैदानात उतरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
ही चर्चा सुरु होण्यामागे मुख्य कारण म्हणजे, विश्व हिंदू परिषदेने मागासवर्गीयांपर्यंत पोहोचण्यासाठी धर्म संम्मेलने आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते तसेच काही संत हे देशभरातल्या हजारो गावांमधील दलित वस्तांमध्ये जाऊन प्रबोधन करणार आहेत. याशिवाय ते दलितांच्या घरी जाऊन भोजन करणार आहेत.
यासंदर्भात विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार म्हणाले, आम्ही धर्म संम्मेलनाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. धार्मिक जागरुकता पसरवणे हा यामागचा उद्देश आहे. दिवाळीच्या 15 दिवस आधी या कार्यक्रमांना सुरुवात होईल. याअंतर्गत काही संत दलित वस्त्यांमधून पदयात्रा काढणार आहेत, तसेच या वस्त्यांमध्ये अनेक कार्यक्रमही आयोजित केले जातील. अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही वेळोवेळी आयोजित करत असतो, समाजात जागरुकता निर्माण करणे हा आमचा उद्देश आहे.
धर्म संम्मेलनापूर्वी विश्व हिंदू परिषद श्रीकृष्ण जन्मभूमी आंदोलानाचा 60 वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. याअंतर्गतही दलित बांधवांपर्यंत पोहोचण्याचा विश्व हिंदू परिषदेचा प्रयत्न आहे. हा कार्यक्रम २४ ऑगस्ट रोजी सुरू होणार असल्याची माहिती आहे.
महत्त्वाचे म्हणजे अशा प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करणं संघ परिवाराचा हिंदूंना एकत्र आणण्याच्या दीर्घकालीन योजनांचा भाग असला तरी लोकसभा निडवणुकीच्या निकालानंतर या कार्यक्रमांना राजकीय महत्त्वही प्राप्त झाले आहे. यंदाच्या लोकसभा निडवणुकीत भाजपाला हिंदी भाषिक राज्यात मोठा फटका बसला होता. 2019 मध्ये स्वबळावर बहुमत मिळालेल्या भाजपाला यंदा बहुमतासाठी 32 जागा कमी मिळाल्या. भाजपाला सर्वाधिक फटका हा उत्तर प्रदेशात बसला. उत्तर प्रदेशात भाजपाला केवळ 33 जागांवर विजय मिळवता आला. भाजपाच्या या परिस्थिताला भाजपा नेत्यांची काही विधानं जबाबदार होती. भाजपाला 400 पेक्षा जास्त जागा मिळाल्या, तर भारत हिंदू राष्ट्र होऊन संविधान बदलण्यात येईल, असे संकेत त्यांच्या विधानातून निर्माण झाले. ज्याचा फायदा इंडी आघाडीला झाला.
मात्र, या सगळ्याचा सामाजिक पातळीवर देखील दुष्परिणाम झाला. हिंदू समाज जातीपातींमध्ये अधिक विभाजन करण्याचा प्रयत्न झाला. ते विभाजन थांबून हिंदू समाजात समरसता निर्माण करण्याच्या दृष्टीने धर्मसंमेलने घेण्याचा निर्णय विश्व हिंदू परिषदेने घेतला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App