नाशिक : देशाला आर्थिक संकटातून वाचविणारे क्रांतिकारक बजेट सादर केले, या घटनेला 24 जुलै 2024 रोजी 33 वर्षे पूर्ण झाली. हे बजेट तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही नरसिंह राव यांच्या सरकारने सादर केले होते. त्यावेळचे केंद्रीय अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी तयार केलेले हे बजेट त्यांनी लोकसभेत मांडले, त्याला 33 वर्षे पूर्ण झाली, याची आठवण काँग्रेस पक्षाने आपल्या एक्स अर्थात ट्विटर हँडलवर काढली आणि राव + मनमोहन या जोडगोळी विषयी कृतज्ञता व्यक्त केली. पण अशी कृतज्ञता व्यक्त करायला सोनिया गांधी + राहुल गांधी यांच्या काँग्रेसला तब्बल 33 वर्षे लागली ही दारूण वस्तुस्थिती या निमित्ताने समोर आली होती.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कारकिर्दीचा पहिला अर्थसंकल्प मांडला. तो अर्थसंकल्प देशातल्या जनतेच्या विरोधातला आहे. राज्यांचे अधिकार संपविणारा आहे, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी लोकसभेत आणि लोकसभेत बाहेर केली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने डॉ. मनमोहन सिंग यांनी सादर केलेल्या आर्थिक सुधारणा अर्थसंकल्पाची आठवण एक्स हँडलवर काढली.
1990 मध्ये भारताची अर्थव्यवस्था कोसळली होती. देश कर्जाच्या जाळ्यात अडकला होता. भारताचे सोने गहाण टाकण्याची वेळ आली होती. परकीय गंगाजळी जवळ जवळ संपुष्टात आली होती. देशाचा दैनंदिन कारभार चालवायचा कसा??, हा प्रश्न सरकार समोर उभा राहिला होता. पण राव + मनमोहन जोडीने देशाच्या अर्थव्यवस्थेला सुधारणांचा “बूस्टर डोस” दिला. खुली अर्थव्यवस्था खुल्या मनाने स्वीकारली. त्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांचा दबावही स्वीकारला. खाजगीकरण आणि निर्गुंतवणुकीकरणाला चालना दिली. त्याचा परिणाम सकारात्मक झाला. देश आर्थिक संकटातून बाहेर आला. देशाला नवे खुले आर्थिक आणि औद्योगिक धोरण मिळाले. याचे सगळे श्रेय नरसिंह राव आणि मनमोहनसिंग यांना जाते.
पण आत्तापर्यंत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसने कधीच नरसिंह राव आणि मनमोहन सिंग या जोडगोळीला आर्थिक सुधारणांचे श्रेय तेवढे दिलखुलासपणे दिले नव्हते. किंबहुना नरसिंह राव यांचे नाव घेण्याचे टाळण्याकडेच सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या प्रभावाखालच्या काँग्रेसचा प्रयत्न असायचा. परंतु काँग्रेस आता सलग 10 वर्षे सत्तेबाहेर आहे आणि पुढची 5 वर्षे सत्तेबाहेर राहणार आहे. त्याचबरोबर मोदी सरकारच्या वेगवेगळ्या अर्थसंकल्पांना डिवचण्याची संधी घ्यायची असेल, तर नरसिंह राव + मनमोहन सिंग यांनी देशाला आर्थिक संकटातून कसे वाचविले आणि ते काँग्रेसचे नेते किती मोठे होते हे सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. या गरजेतूनच काँग्रेसने तब्बल 33 वर्षानंतर 1991 च्या आर्थिक सुधारणा अर्थसंकल्पाची आठवण काढली. मनमोहन सिंग यांनी तो अर्थसंकल्प राजीव गांधींना समर्पित केला होता.
नरसिंह राव आणि मनमोहन सिंग या जोडीला भारताच्या आर्थिक सुधारणांचे अध्वर्यू मानले जाते. जागतिक पातळीवरच्या अर्थतज्ज्ञांनी आणि विद्वानांनी त्यांना या विषयावर कधीच अधिमान्यता दिली आहे. परंतु, काँग्रेसचेच नेते मोकळेपणाने याची कबुली देत नव्हते. पण आता मात्र परिस्थिती पूर्ण पालटली असल्याने काँग्रेसच्या नेत्यांना नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनी केलेल्या आर्थिक सुधारणांची आठवण झाली.
मोदी सरकारने नरसिंह राव यांना गेल्याच वर्षी “भारतरत्न” किताब देऊन सन्मानित केले. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली मनमोहन सिंग यांनी मांडलेल्या आर्थिक सुधारणा अर्थसंकल्पाचे एक प्रकारे भाजपनेच कौतुक केले, असे चित्र निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसने 33 वर्षांनंतर का होई ना, पण नरसिंह सरकारच्या अर्थमंत्र्यांनी म्हणजेच मनमोहन सिंग यांनी मांडलेल्या 1991 च्या आर्थिक सुधारणा अर्थसंकल्पाची आठवण काढली, किंबहुना ती आठवण काढावी लागली, याला सोनिया + राहुल काँग्रेसच्या दृष्टीने आणि देशाच्या दृष्टीने विशेष महत्त्व होते!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App