राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एक दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर होते. तेथे त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षबांधणी संदर्भात राज्यातील नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली. मधल्या वेळेत बंगलोरच्या हॉटेलमध्ये त्यांना काँग्रेसचे वरिष्ठ नेते डी. के. शिवकुमार हे भेटून गेले. Sharad Pawar’s visit to Karnataka; But for the strength of the NCP
– पवार अधून मधून येणार
कर्नाटकात 2023 मध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्यासाठी भाजप आणि काँग्रेस यांनी जोरदार तयारी देखील चालवली आहे. या पार्श्वभूमीवर पवारांनी पूर्ण वर्षभर आधीच कर्नाटकात राजकीय पाऊल टाकणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बांधणी करण्यासाठी येथे आलो आहे. अधून मधून येथे येत राहीन. माझे सहकारीही पक्ष वाढविण्यासाठी इथे येतील, असे ते म्हणाले आहेत…!! याचा राजकीयदृष्ट्या नेमका अर्थ काय आहे…??, याचा धांडोळा घ्यायचा असेल तर उत्तर प्रदेश आणि गोवा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा विचार करावा लागेल. त्याआधी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा विचार करावा लागेल.
– उत्तर प्रदेश – गोव्यात फिरकलेही नाहीत
यापैकी उत्तर प्रदेश आणि गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आपले उमेदवार उभे केले होते. परंतु जेवढे उमेदवार उभे केले होते, त्यापेक्षा दुप्पट – तिप्पट स्टार प्रचारकांची यादी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केली होती. या यादीमध्ये अर्थातच स्वतः शरद पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, अजित पवार अशी दिग्गज मंडळी होती. परंतु प्रफुल्ल पटेल वगळता बाकी कोणीही या राज्यांकडे फिरकले सुद्धा नव्हते. आता अशा स्थितीत कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका अजून वर्षभर लांब असताना आणि तिथे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी द्विपक्षीय लढत असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार तिथे नेमके काय करणार…??, हा खरा प्रश्न आहे. किंबहुना या प्रश्नातच पवारांच्या राजकीय खेळीची खरी मेख दडलेली असू शकते…!!
भाजप – काँग्रेसची समसमान ताकद
कर्नाटक हे असे राज्य आहे, जेथे काँग्रेस आणि भाजप यांची एका अर्थाने समसमान राजकीय ताकद आहे. कर्नाटक राज्यातला तिसरा महत्त्वाचा पक्ष म्हणजे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा धर्मनिरपेक्ष जनता दल. ते स्वतः या पक्षाचे मुख्यमंत्री होते. त्यांचे चिरंजीव एच. डी. कुमारस्वामी हे देखील मुख्यमंत्री होते. परंतु, त्या पक्षाचे अस्तित्व दक्षिण कर्नाटकातल्या दोन तीन जिल्ह्यांमध्ये वगळता फारसे कुठे प्रभावी नाही.
अशा स्थितीत कर्नाटकात भाजप आणि काँग्रेस हे तुल्यबळ पक्ष असताना तेथे राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कोणती भूमिका बजावेल…?? आपला पक्ष बळकट करून तरी किती करेल?? एका वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार कर्नाटकात कितपत बळ देऊ शकतील…?? हे प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.
– काँग्रेसशी बार्गेनिंग
परंतु, शरद पवारांची राजकीय खेळी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळकटी पेक्षा वेगळी तर नाही ना…?? असा संशय कोणाला आला असेल तर तो गैर मानता येणार नाही. कारण पवार जर काँग्रेसशी आघाडी करून निवडणूक लढवणार असतील तर काँग्रेसला आपले बळ थोडे घटवून राष्ट्रवादीला जागांचे बळ द्यावे लागेल आणि काँग्रेसने आघाडी केली नाही तर पवार स्वतंत्रपणे काही विशिष्ट पट्ट्यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार उभे करून काँग्रेसच्या विजयामध्ये राजकीय आडकाठी तयार करू शकतील…!! मग हीच तर पवारांची मुख्य खेळी नाही ना…??, अशी शंका राजकीय वर्तुळातून व्यक्त होताना दिसते आहे.
– काँग्रेसला फाऊल
जे शरद पवार उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या निवडणुकीत उमेदवार उभे करतात पण त्यांच्या प्रचारासाठी फिरकतही नाहीत, ते शरद पवार कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीला अजून वर्षभर अवकाश असताना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी राज्यात पोचतात… इतकेच नाही तर आपण नियमितपणे राज्यात येत राहू, असे सांगतात याचा नेमका राजकीय अर्थ काय काढायचा…?? आणि तो जर पवार काँग्रेसला “फाऊल” करण्यासाठी येथे येत आहेत, असा कोणी काढला तर तो कितपत गैर अथवा अयोग्य मानता येईल…?? या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देऊ शकेल.
– ममता – पवार एकसारखी खेळी
बाकी पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्या इच्छेनुसार विरोधी पक्षांची बैठक बोलवणे, केंद्रातील मोदी सरकारला पर्याय निर्माण करणे, वगैरे नेहमीच्या बाता मारल्या आहेत. पण ममता बॅनर्जी जशा बंगाल, आसाम, गोवा हरियाणा या प्रांतात जाऊन भाजपवर तोंडी तोफा डागून प्रत्यक्षात काँग्रेस फोडून आल्या तशी तर पवारांची कर्नाटकात “खेळी” नाही ना…??, अशी शंकाही व्यक्त होत आहे.
– पवारांचा प्रभाव उमेदवार पाडण्यासाठी
कारण कर्नाटकातल्या कन्नड भाषिक भागाचे सोडा, पण मराठी भाषिक भागांमध्ये पवारांचा काही प्रभाव आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि पवारांच्या प्रभाव हा कायम निवडून आणण्यापेक्षा उमेदवार पाडण्यासाठी होत असतो हा राजकीय इतिहास आणि वर्तमान आहे. त्यामुळेच पवार कर्नाटकात राष्ट्रवादीच्या बळकटीसाठी जात आहेत असे उघड सांगताना याचा अर्थ ते काँग्रेस कमकुवत करण्यासाठी जात आहेत…, अशी शंका जर कोणी घेतली तर ती अनुभवदृष्ट्या गैर मानता येणार नाही किंबहुना हीच शंका कर्नाटकातील काँग्रेसच्या भवितव्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची आहे…!!
– आधी मोदी भेट, नंतर शिवकुमार भेट
पवारांनी मोदींची दिल्लीत भेट घेतली आहे… बंगलोरात आज डी. के. शिवकुमार त्यांना भेटून गेले आहेत… या गोष्टी बऱ्याच “बोलक्या” आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App