वृत्तसंस्था
टोकियो : जपानमध्ये ( Japan ) तांदळाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून जपानमधील अनेक सुपरमार्केटमध्ये तांदूळ संपला आहे. जून 1999 नंतर पहिल्यांदाच जपानमध्ये तांदळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. जपान टाइम्सच्या मते, ज्या सुपरमार्केटमध्ये तांदूळ उपलब्ध आहे, तेथे लोकांना कमी प्रमाणात तांदूळ खरेदी करण्याचे आवाहन केले जात आहे.
वास्तविक, जपानमधील सरकारने भूकंप आणि वादळाच्या धोक्याबाबत इशारा दिला होता. तेव्हापासून लोकांनी घाबरून तांदूळ खरेदी करून घरात साठवून ठेवण्यास सुरुवात केली असून त्यामुळे बाजारात तांदळाचा तुटवडा निर्माण झाला आहे.
जपानमध्ये मे ते नोव्हेंबर या महिन्यांला टायफून सीझन म्हणतात. या काळात सुमारे 20 वादळे येतात. यामुळे अतिवृष्टी, भूस्खलन आणि पूर येतो. वादळाच्या हंगामातही ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक वादळे येतात. यावर्षी 19 ते 21 वादळ येण्याची शक्यता आहे. जपान सरकारने या वादळांचा इशारा दिला होता, त्यानंतर लोक घाबरून घरांमध्ये तांदूळ साठवून ठेवत आहेत.
सप्टेंबरमध्ये नवीन पीक आल्यानंतर परिस्थिती सुधारू शकते
तांदळाच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर जपान सरकारने मंगळवारी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले. कृषी मंत्री तेताशी साकामोटो म्हणाले की, देशात काही ठिकाणी तांदळाच्या साठ्याची कमतरता आहे, परंतु आम्ही लवकरच त्यावर मात करू. सध्या तांदळाचा पुरेसा साठा आहे. भाताचे पीक वर्षातून एकदाच घेतले जाते. नवीन भाताची काढणी सप्टेंबरमध्ये सुरू होईल, त्यानंतर बाजारात नवीन पीक आल्याने परिस्थिती सुधारेल.
दीर्घ सुट्ट्या आणि विक्रमी परदेशी पर्यटक यामुळे तांदळाचा तुटवडा
13 ऑगस्टपासून जपानमध्ये ओबोन महोत्सव सुरू होत आहे. ओबोन उत्सवादरम्यान लोक त्यांच्या पूर्वजांना आदरांजली वाहतात. त्यांच्या स्मरणार्थ उत्सव साजरे केले जातात. या सणानिमित्त लोक दीर्घ सुट्टीवर आहेत. त्यामुळे तांदळाची मागणी वाढली आहे. यासोबतच यंदा जपानमध्ये विक्रमी संख्येने विदेशी पर्यटक आले आहेत. त्यामुळे भाताचीही टंचाई निर्माण झाली आहे. जपान नॅशनल टुरिझम ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार या वर्षी जूनपर्यंत 31 लाखांहून अधिक परदेशी पर्यटक जपानमध्ये आले आहेत. यूएस कृषी विभागाच्या विदेशी कृषी सेवा अहवालानुसार, 2023-24 मध्ये जपानमध्ये तांदळाचे एकूण उत्पादन 7.3 दशलक्ष टन होते, तर तांदळाचा वापर 8.1 दशलक्ष टन होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more