भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधींचे पाऊल जसजसे पुढे पडत आहे, तसतसे भारत जोडायचे राहू द्या, न्याय मिळायचे बाजूलाच ठेवून द्या, उलट त्यांच्याच पुढाकाराने झालेली विरोधकांची INDI आघाडी फुटत आहे आणि एकेकाळी संपूर्ण देशभर 300 ते 400 जागांचा खेळ करणाऱ्या काँग्रेसवर 10 – 11 जागांचा साप – मुंगसाचा खेळ करायची वेळ आली आहे!!Regional parties playing snake – mongoose game with Congress
उत्तर प्रदेशात INDI आघाडी टिकवताना समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी काँग्रेसला लोकसभेच्या 80 पैकी फक्त 11 जागा देऊ केल्या आहेत, तर बिहारमध्ये नितीश कुमार – लालूप्रसाद यादव यांच्या टक्करीत मधल्या मध्ये काँग्रेसचे 10 आमदार फुटून भाजपच्या संपर्कात आले आहेत.
उत्तर प्रदेश आणि बिहार मधले काँग्रेसच्या खासदार – आमदारांचे हे आकडे बघितल्यानंतर देशाच्या राजकीय इतिहासात काँग्रेसची किती दारुण अवस्था झाली आहे, हे दिसून येते!!*
एकेकाळी काँग्रेस उत्तर प्रदेश आणि बिहार सह संपूर्ण देशात 300 ते 400 जागांवर राजकीय खेळ करत असायची. सलग 5 निवडणुकांमध्ये काँग्रेसने 2/3 पेक्षा जास्त बहुमत मिळवण्याचा पराक्रम देखील केला होता. त्यावेळी त्याच्या जवळपास पोहोचण्याची क्षमता तर सोडाच, साधा विचार देखील त्यावेळचे समाजवादी अथवा जनसंघी करू शकत नव्हते. दक्षिणेतले प्रादेशिक पक्ष आपापल्याच राज्यातच फक्त “दादा” म्हणून उभे राहात होते. पण राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला आव्हान देण्याची कुठल्याच प्रादेशिक दादाची क्षमता नव्हती. पण आता तो इतिहास काँग्रेस मुख्यालयाच्या दप्तरातल्या बाडामध्ये धुळखात पडून आहे आणि काँग्रेसला इतरांच्या अटी शर्तीवर 10 – 11 जागा घेऊन समाधान मानावे लागत आहे.
INDI आघाडीत उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचीच दादागिरी सुरू आहे. त्यांनी आधी राष्ट्रीय लोकदलाला 7 जागा देऊन त्यांना मोकळे केले आणि त्या पाठोपाठ काँग्रेसला 11 जागा देऊन टाकल्या आणि उरलेल्या म्हणजे 62 जागांवर समाजवादी पार्टीच्या सायकल चिन्हावर जागा लढवण्याची तजवीज अखिलेश यादव यांनी करून घेतली. उत्तर प्रदेशातल्या 80 जागांपैकी 62 ही संख्या 4/5 पेक्षा जास्त आहे. याला म्हणतात प्रादेशिकांची दादागिरी!!
पण ही दादागिरी काँग्रेसला सहन करावी लागत आहे, कारण अखिलेश यादव यांच्याकडून 11 जागा स्वीकारल्या नाहीत, तर काँग्रेस उत्तर प्रदेशात सर्वत्र उमेदवार उभे जरूर करू शकेल पण त्यातून डिपॉझिट जप्त होण्याशिवाय दुसरा कोणताच राजकीय हेतू साध्य होणार नाही.
INDI आघाडीतून आधीच ममता बॅनर्जी, भगवंत मान म्हणजेच अरविंद केजरीवाल आणि नितीश कुमार बाहेर पडले आहेत. त्यामुळे पश्चिम बंगाल, पंजाब, दिल्ली आणि बिहार मधली INDI आघाडी संपुष्टात आली आहे. त्यामुळे राहता राहिली उत्तर प्रदेशातील आणि महाराष्ट्रातील INDI आघाडी. या दोन मोठ्या राज्यांमध्ये समाजवादी पार्टी आणि शिवसेना किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी हे दोन मित्र पक्ष काँग्रेसने गमावले, तर काँग्रेसच्या हातात “राजकीय घंटानादाशिवाय” दुसरे काहीच हाती राहणार नाही.
त्यामुळे उत्तर प्रदेशात 11, महाराष्ट्रात 10 – 12, अशाच जागा काँग्रेसने वाटून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणूनच काँग्रेसने कितीही मानहानी झाली, तरी उत्तर प्रदेशातील INDI आघाडी आपल्या वाट्याला आलेल्या 11 जागा घेऊन टिकवली आहे. याचेच रिपीटेशन महाराष्ट्राबरोबरच तामिळनाडूत होणार आहे. तिथेही द्रविड मुन्नेत्र कळघम बरोबर आघाडी टिकवताना काँग्रेसला लोकसभेच्या 39 जागांपैकी सिंगल डिजिट जागांवर लढायची वेळ येणार आहे.
हा प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसशी चालवलेला साप मुंगसाचा खरा खेळ आहे. मुंगसाच्या गळ्यातल्या “दोरीवरचा हात” मात्र पूर्णपणे वेगळा आहे. त्या हाताचा काँग्रेसच्या हाताच्या पंजाशी काहीही संबंध नाही!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App