ममता बॅनर्जींचे 8 मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षांच्या 22 नेत्यांना पत्र, 15 जूनला दिल्लीत बैठक Presidential election: Mamata’s proposal for unity after Sonia Gandhi; Opponents discuss Mallikarjun Kharge’s first name
प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून अनेक नावे चर्चेत आल्यानंतर विरोधकांचे पहिले नाव राष्ट्रपतीपदाच्या चर्चेत पुढे आले आहे, ते काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार खर्गे यांनी दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपती निवडणुकीसाठी सोनिया गांधी यांनी विरोधकांच्या ऐक्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देखील विरोधकांच्या एकजुटीसाठी पुढे आल्या आहेत. पण त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठींवर भर न ठेवता प्रत्यक्ष बैठकच बोलवली आहे.
ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांच्या 22 नेत्यांना आणि विरोधी पक्षांच्या 8 मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून 15 जून रोजी होणाऱ्या संयुक्त बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये ही बैठक होणार आहे.
ममता बॅनर्जी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना पत्र लिहिले आहे. तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह आणखी 22 नेत्यांना ममता यांनी पत्र लिहले असून, येत्या 15 जूनला दिल्लीत बैठकीला येण्याचे निमंत्रण दिले आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उमेदवारीची चर्चा
ममता बॅनर्जी आणि DMK, CPI, CPI(M) आणि आम आदमी पार्टीच्या नेत्यांशी चर्चा केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षांचा एकच समान उमेदवार म्हणून चर्चेत आले. स्वतः खर्गे यांनी ममता बॅनर्जी यांच्याशी या मुद्द्यावर फोनवरून चर्चा केली आहे.
18 जुलैला मतदान
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 18 जुलैला मतदान होणार आहे, तर निकाल 21 जुलैला लागणार आहे.
मोदी, पटनायक, रेड्डी चर्चा
एनडीए बहुमताच्या अगदी जवळ आहे. त्यासाठी बिजू जनता दलाचे नेते ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि वायएसआर काँग्रेसचे नेते आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री त्री जगनमोहन रेड्डी यांच्या पाठिंब्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन पटनायक आणि जगन मोहन रेड्डी यांचीही भेट घेतली आहे. मात्र, उमेदवाराचे नाव समोर आल्यानंतरच पाठिंब्याबाबत निर्णय घेण्याचे दोघांनी सांगितले आहे. गेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएची कामगिरी चांगलीच होती. रामनाथ कोविंद यांना 65.35% मते मिळाली. यावेळीही त्याची पुनरावृत्ती करण्याचा एनडीएचा प्रयत्न आहे.
ममता बॅनर्जी यांचे या नेत्यांना पत्र
1. अरविंद केजरीवाल (मुख्यमंत्री, दिल्ली)
2. पिनाराई विजयन (मुख्यमंत्री, केरळ)
3. नवीन पटनायक (मुख्यमंत्री, ओडिशा)
4. कलवकुंतला चंद्रशेखर राव (मुख्यमंत्री, तेलंगणा)
5. थिरू एमके स्टॅलिन (मुख्यमंत्री, तामिळनाडू)
6. उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र)
7. हेमंत सोरेन (मुख्यमंत्री, झारखंड)
8. भगवंत सिंग मान (मुख्यमंत्री, पंजाब)
9. सोनिया गांधी (अध्यक्ष, काँग्रेस)
10. लालू प्रसाद यादव (अध्यक्ष, राजद)
11. डी. राजा (सरचिटणीस, सीपीआय)
12. सीताराम येचुरी (महासचिव, सीपीआयएम)
13. अखिलेश यादव (अध्यक्ष, समाजवादी पक्ष)
14. शरद पवार (अध्यक्ष, राष्ट्रवादी)
15. जयंत चौधरी (राष्ट्रीय अध्यक्ष, RLD)
16. एचडी कुमारस्वामी (कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री)
17. एचडी देवेगौडा (खासदार, भारताचे माजी पंतप्रधान)
18. फारुख अब्दुल्ला (अध्यक्ष, JKNC)
19. मेहबूबा मुफ्ती (अध्यक्ष, पीडीपी)
20. एस. सुखबीर सिंग बादल (अध्यक्ष, शिरोमणी अकाली दल)
21. पवन चामलिंग (अध्यक्ष, सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट)
22. के. एम. कादर मोहिद्दीन (अध्यक्ष, IUML)
ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांचे 8 मुख्यमंत्री आणि यांच्यासह 22 नेत्यांना पत्र पाठविले असले तरी प्रत्यक्षात दिल्लीतल्या बैठकीत 15 जून रोजी नेमके कोण उपस्थित राहणार?यावर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांच्या ऐक्याचे भवितव्य अवलंबून आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App