राजकीय व्यंगचित्रे म्हटले की भारतीयांच्या आणि मराठी माणसांच्या डोळ्यासमोर पहिल्यांदा नावे येतात, ती आर. के. लक्ष्मण आणि बाळासाहेब ठाकरे यांची… या दोघांनीही आपल्याला हसविले आणि अंतर्मुख केले.Political cartoons that awakened Indians during freedom movement
पण भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात देखील अशी अनेक व्यंगचित्रे गाजली आणि त्यांनी समाजमनावर परिणाम करून दाखवला होता. किंबहुना देशाच्या राजकीय आणि सामाजिक चळवळ पुढे नेण्यात या व्यंगचित्रांनी जनजागृतीचे फार मोठे काम केले होते. ब्रिटनचे पंतप्रधान विस्टन चर्चिल यांची कार्टून बायोग्राफी प्रसिद्ध आहे, तशीच महात्मा गांधी यांच्या जीवनावर निघालेल्या कार्टून्सचे एक मालिका पुस्तक महात्मा गांधी दर्शन प्रतिष्ठानने प्रसिद्ध केले आहे. ते सध्या इंटरनेटवर उपलब्ध आहे. https://www.gandhiheritageportal.org/cartoons-on-mahatma-gandhi या लिंक वर ती पाहता येतात.
हिंदू पंच अर्थात पंच आजोबा
पण महात्मा गांधींची जशी व्यंगचित्रे गाजली तशी त्याआधी लोकमान्य टिळकांच्या काळात “हिंदू पंच” अर्थात पंच आजोबा यांची देखील व्यंगचित्रे गाजली होती. ब्रिटिशांच्या “द पंच” या नियतकालिकाच्या धर्तीवर महाराष्ट्रातल्या काशिनाथ विष्णू फडके या अवलिया व्यक्तीने “हिंदू पंच” नावाने साप्ताहिक काढले होते. आणि त्यामध्ये ते राजकीय सुधारणा आणि सामाजिक सुधारणा यावर आधारित व्यंगचित्रे काढून प्रसिद्ध करत असत. त्या काळातल्या अनेक राजकीय पुढार्यांची, ब्रिटिश गव्हर्नर यांची खिल्ली “हिंदू पंच” मध्ये उडविलेली आपल्याला आढळते.
लॉर्ड कर्झनचे व्यंगचित्र
लॉर्ड कर्झन 1904-5 च्या सुमारास भारताचे गव्हर्नर जनरल होते. त्यांना गणेशाच्या रूपात दाखवून भारतीय गुलाम समाज त्यांची पूजा करतो आहे, असे व्यंगचित्र त्याकाळी समाज मनाला टोचून गेले होते. इतकेच नाही तर लोकमान्य टिळक ब्रिटिशांना धमकावत असल्याचे व्यंगचित्र त्याकाळी ब्रिटिशांनी बॅन केले होते.
शंवाकिंची कामगिरी
टिळकांच्या निधनानंतर आणि गांधींच्या उदयानंतर व्यंगचित्रकलेत भारतीय व्यंगचित्रकार अग्रभागी येऊ लागले होते. त्यामधले एक महत्त्वाचे मराठी नाव म्हणजे शंकरराव किर्लोस्कर. त्यांनी आपल्या किर्लोस्कर मासिकाद्वारे तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर टीका करणारी व्यंगचित्रे प्रसिद्ध केली होती. सावरकरांचे सामाजिक सुधारणे विषयीचे बहुसंख्य लेख यास किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर मासिकात प्रसिद्ध केले होते.
सनातन्यांवर आणि काँग्रेसवर टीका
शंकरराव किर्लोस्कर हे अनेकदा ब्रिटिशांच्या कायद्याचा मुलाहिजा बाळगत नसत. हे त्यांच्या 1930 च्या दशकातल्या व्यंगचित्रांच्या आधारे आपल्याला म्हणता येऊ शकते. शंकरराव किर्लोस्कर सुधारणावादी होते. त्यामुळे त्यांनी तत्कालीन समाजाच्या सनातनी आणि जातीयवादी वर्तणुकीवर सडकून टीका केल्याचे आढळते. इतकेच काय पण 1937 मध्ये विविध प्रांतांमध्ये काँग्रेसची सरकारे आली ती सरकारे कशी भांडवलदार धार्जिणी आणि शेतकरी विरोधी होती यावर सडकून टीका करणारी व्यंगचित्रे देखील शंकरराव किर्लोस्कर यांनी काढली आणि किर्लोस्कर मध्ये प्रसिद्ध केली होती.
सुभाषबाबू व्यंगचित्रांचे हिरो आणि अँटी हिरो
1940 च्या दशकात नेताजी सुभाष चंद्र बोस हे लोकप्रियतेच्या शिखरावर होते. ते ब्रिटिश मगरीची शिकार करत आहेत, असे शंकरराव किर्लोस्कर यांचे व्यंगचित्र त्यावेळी अतिशय गाजले होते. इतकेच नव्हे तर सुभाषबाबूंना साथ द्या. महात्मा गांधी पंडित नेहरू यांच्यासारखे त्यांच्यापासून दूर जाऊ नका असा संदेश देखील परखडपणे त्यांनी या व्यंगचित्रातून दिला होता.
कम्युनिस्टांची व्यंगचित्रकला
व्यंगचित्रकलेत कम्युनिस्ट देखील खूप आघाडीवर होते ते नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या राष्ट्रवादी चळवळीचे कट्टर विरोधक होते त्यामुळे सुभाष बाबूंच्या प्रत्येक मोहिमांवर त्यांनी साम्राज्यवादी म्हणून सडकून टीका करणारी व्यंगचित्रे त्यांच्या पीपल या नियतकालिकातून काढली होती. सुभाष बाबू हे जपानी साम्राज्यवादाच्या हातातले बाहुले खेळणे आहेत, असे दाखविण्यात त्यावेळचे कम्युनिस्ट व्यंगचित्रकार आणि संपादक स्वातंत्र्यपूर्व काळात आघाडीवर होते. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे लाडके व्यंगचित्रकार शंकर हे फार त्यानंतरचे. पण त्याआधी प्रामुख्याने व्यंगचित्र गाजत असत, ती नेताजी सुभाष चंद्र बोस, महात्मा गांधी, मोहम्मद अली जिना यांच्यावरची. मोहम्मद अली जिना हे वाटाघाटींच्या टेबलवर यायला तयार नसत. त्यामुळे भिंतीतून त्यांचा हात ओढून काढण्यासाठी चक्रवर्ती राजगोपालाचारी, लोकनायक बापूजी अणे, ब्रिटिश व्हॉइसरॉय लॉर्ड लिनलिथगो हे निकराचे प्रयत्न करत असल्याचे व्यंगचित्रही त्यावेळी गाजले होते. इतकेच काय पण महात्मा गांधी हे हिंस्र वाघाला त्याच्या दोन पंजांमध्ये बसून उपोषणाचे महत्त्व समजून सांगत आहेत, असे ब्रिटिशांच्या चालकत्वाखाली असलेल्या स्टेट्समनमध्ये व्यंगचित्रही प्रचंड गाजले होते.
व्यंगचित्र कलेची कहाणी अफाट
व्यंगचित्र कलेची ही कहाणी एखाद दुसऱ्या एपिसोड मध्ये सांगून संपणारी नाही. ती खूप रंजक आणि तपशीलवार सांगण्यासारखी आहे. परदेशात अनेकांनी या विषयावर डॉक्टरेट मिळवल्या आहेत. सध्या इंटरनेटवर 1904 सालचे व्यंगचित्र पुस्तक, महात्मा गांधींच्या व्यंगचित्रांचे पुस्तक दोन्ही उपलब्ध आहेत. इच्छुक अभ्यासक ते archive.org वर आवर्जून पाहू शकतात.भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अज्ञात पैलू
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App