विनायक ढेरे
प्रख्यात बंगाली साहित्य शरतचंद्र चट्टोपाध्याय हे भारतीय जनमानसाला देवदास, पथेर दाबी, श्रीकांत आदी भुरळ घालणाऱ्या कादंबऱ्यांचे लोकप्रिय लेखक म्हणून परिचित. त्यांची लेखणी सर्वसंचारी!! सिल्व्हर स्क्रीन वरून सर्वदूर पसरलेली!! भारतीय जनमानसाला बंगालचे सर्व जातीय सामाजिक जीवन चहूबाजूंनी ज्यांनी उलगडून दाखवले, असे ते लेखक!! Partition Horrors Remembrance Day : sharadchndra chattopadhy had unique idea to avoid partition
पण शरद बाबू हे व्यक्तिमत्व फक्त “साहित्यिक” या मर्यादेत बसणारे नव्हते, तर ते लोकमान्य टिळकांचे आक्रमक अनुयायी आणि सशस्त्र क्रांतिकारकांशी संबंधित नेते होते. देशबंधू बाबू चित्तरंजन दास, बिपिन चंद्र पाल यांचे समकालीन होते, तर रामप्रसाद मुखर्जी आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे मित्र – मार्गदर्शक होते. महात्मा गांधी यांच्या विषयी त्यांना व्यक्तिगत आत्मियता होती, पण गांधींच्या तत्त्वज्ञानावर मात्र त्यांचा फारसा विश्वास नव्हता. हे ते गांधीजींना उघडपणे बोलून दाखवत असत. अर्थात गांधीजींना देखील त्यांचे मतभेदासह प्रेम स्वीकृत होते.
शरद बाबूंचा हा परिचय फारच थोड्या भारतीयांना आहे. किंबहुना तो बंगाल पुरता मर्यादित आहे. त्यातही शरद बाबूंची राजनेता म्हणून ही ओळख बंगाली कम्युनिस्ट राजवटीत हेतूपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक पुसण्यात आली. पण आज जेव्हा भारत “फाळणीच्या वेदना दिन” अर्थात “विभाजन विभिषिका दिवस” पाळतो आहे, तेव्हा मूळातच हा दिवस संपूर्ण भारताला पाळावा का लागला?? ही वेळ का आली??, याचा विचार करण्याचा आहे आणि किंबहुना या विचारातून पुढची मार्गक्रमणा कशी असावी?? याचा धांदोळा घेण्याचा आहे. असाच धांदोळा घेताना शरदचंद्र चट्टोपाध्याय या नावापाशी थांबावे लागते!!
टिळकांचे अनुयायी, सशस्त्र क्रांतिकारक
वर उल्लेख केल्याप्रमाणे शरद बाबू हे केवळ बंगाली साहित्यिक या मर्यादेत बसणारे नावच नव्हते. लोकमान्य टिळकांचे आक्रमक अनुयायी, बंगाली सशस्त्र क्रांतिकारकांना आश्रय देणारे किंबहुना अनेक क्रांतिकारकांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करणारे नेते, ही शरद बाबूंची एक महत्त्वाची कामगिरी आहे. ज्याकडे कायम दुर्लक्ष झाले. अनुशीलन समितीच्या क्रांतिकारकांपासून सुभाष चंद्र बोस यांच्यापर्यंत अनेकांशी शरद बाबूंचे मार्गदर्शक म्हणून संबंध आले होते. लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब टाकणाऱ्या बंगाली क्रांतिकारकांना शरद बाबूंनी आश्रय दिल्याच्या नोंदी ब्रिटिश गुप्तहेरांच्या डायऱ्यांमध्ये आढळतात. याचा उल्लेख मराठीतले सुप्रसिद्ध लेखक आणि आनंदी गोपाळचे कादंबरीकार श्री. ज. जोशी यांनी केला आहे. श्री. ज. जोशी यांचा शरद बापूंच्या साहित्यावर विशेष अभ्यास होता, ही बाब येथे अधोरेखित केली पाहिजे. त्यांनीच शरद बापूंचा राजकीय नेता म्हणून प्रवास उघडून दाखवला आहे.
1905 बंगालची फाळणी रद्द
बंगाली नेत्यांना विशेषतः लोकमान्य टिळकांशी संलग्न असणाऱ्या अनेक नेत्यांना हिंदू मुसलमान प्रश्नावर फार मोठी चिंता वाटत होती. 1905 मध्ये लॉर्ड कर्झन याने पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल अशी फाळणी केल्यानंतर या काळजीत अधिकच भर पडली होती. परंतु, लोकमान्य टिळकांच्या आक्रमक नेतृत्वाखाली संपूर्ण देशातल्या आणि विशेषतः बंगाली जनतेने उठाव केल्यामुळे ही फाळणी लॉर्ड कर्झनला रद्द करावी लागली होती.
हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ उत्पन्न करणारे बीज
पण मूळातच ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत केलेल्या अशा फाळणीमुळे बंगाली हिंदू आणि मुसलमानांमध्ये तेढ उत्पन्न करणारे बीज इंग्रजांनी चलाखीने रोवले होते. याचविषयी बिपिन चंद्र पाल, देशबंधू चित्तरंजन दास यांना सातत्याने काळजी वाटत होती. त्यातही देशबंधू आणि स्वतः शरद बाबू हे मुळातले पूर्व बंगालचे रहिवासी होते. त्यामुळे त्यांना हिंदू मुस्लिम प्रश्नावर अधिक काळजी वाटणे स्वाभाविक होते. परंतु देशबंधू आणि शरद बाबू यांच्या हिंदू मुस्लिम प्रश्नावरच्या आकलनामध्ये मूलभूत अंतर होते.
हिंदू समाजासाठी ऐक्याचा संदेश
शरद बाबूंचे विचार हे अधिक आक्रमक आणि टिळकांच्या प्रॅक्टिकल राजकारणाच्या जवळचे होते. त्यांनी 1920 च्या दशकात देशबंधूंशी चर्चा करताना महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली होती. देशबंधूंनी त्यांना जेव्हा विचारले, की शरद बाबू तुमच्यासारख्या पूर्व बंगालमध्ये पाळेमुळे असणाऱ्या व्यक्तीला हिंदू मुस्लिम प्रश्नाची भीती वाटत नाही का?? त्यावेळी शरद बाबू उस्फूर्तपणे उद्गारले होते, की येत्या 15 – 20 वर्षात मुस्लिमांची संख्या बंगालमध्ये दुप्पट होईल, या भीतीने आपल्यासारख्या नेत्यांचा चेहरा पांढरा फटक पडतो, हे मला माहिती आहे. पण माझ्यासारख्या व्यक्तीला त्याची भीती वाटत नाही. कारण जर मूठभर इंग्रज लोक कोट्यावधी हिंदू लोकांना काबूत ठेवतात यावरून संख्येचे महत्त्व लक्षात येईल.
संपूर्ण हिंदुस्थानवर ते आपले वर्चस्व राखू शकतात आणि आपण संख्यात्मक पातळीवर कितीही असलो, तरी त्यांना फरक पडत नाही. तशीच मला देखील मुसलमानांची संख्या वाढण्याची भीती वाटत नाही. कारण बंगाली उच्चवर्णीय समाजाने अर्थात भद्रलोकांनी संपूर्ण हिंदू समाजा मधल्या अन्य जातींशी म्हणजे नामशूद्र मालो नट राजेवंशी पौध वगैरे जातींची सख्य जोडले की काम भागेल. स्त्रियांच्या बाबतीत जो निष्ठूरपणा समाज दाखवतो तो बंद व्हायला पाहिजे मग या देशातील मुसलमानांच्या या संख्येची भीती बाळगण्याचे कारण उरणार नाही. शरद बाबू यांच्या या वक्तव्याचा अर्थ उघड आहे, समस्त हिंदू समाजाला जोडून घेणे हाच हिंदू मुस्लिम प्रश्नावरचा एक महत्त्वाचा तोडगा आहे, असे त्यांना वाटत होते. शिवाय हिंदू समाजात स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन बदलला की त्यामध्ये फार फरक पडेल, असेही आपले मत असल्याचे शरद बाबूंनी ठासून सांगितले आहे. यातही अगदी 100 वर्षांनंतरही तथ्य आहे.
एकजिनसी समाजाचे महत्त्व
शरद बाबूंचे 1920 च्या दशकातले हे परखड निरीक्षण फार मोठे भाष्य करणारे आहे. बंगालच्या हिंदू समाजा मधल्या जातीभेदावर तर हे परखड भाष्य आहेच, पण त्या पलिकडे जाऊन एखादा समाज जर एकजिनसी झाला, तर तो समाज कुठल्याही फुटीला घाबरत नाही, हेच शरद बाबूंच्या त्या वेळच्या वक्तव्यातून स्पष्ट होते!!
आक्रमक शरद बाबू हवे होते
देशबंधू चित्तरंजन दास यांचे निधन 1925 मध्ये झाले. शरद बाबूंचे निधन 1938 मध्ये झाले. त्यावेळी बंगालची फाळणी झाली नव्हती. किंबहुना 1920 च्या दशकानंतर 27 वर्षांनी भारत पाकिस्तानची फाळणी होऊन पूर्व बंगाल पाकिस्तानात समाविष्ट झाला. हा दुर्दैवी घटनाक्रम देशबंधू आणि शरद बाबू यांच्यासारख्या द्रष्ट्या नेत्यांच्या निधनानंतर घडला होता. याचा दुसरा अर्थ असा की त्यावेळच्या बंगाली समाजात शरद बाबू यांच्यासारखे जर आक्रमक नेतृत्व शिल्लक राहिले असते, तर कदाचित फाळणी सारख्या दुर्दैवी घटनाक्रमाला हिंदुस्थानला सामोरेही जावे लागले नसते.
फाळणीवर प्रॅक्टिकल सोल्युशन
1940 नंतरचा घटनाक्रम पाहिला तर स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, रायबहादूर मेहेरचंद खन्ना, डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे, बॅरिस्टर एन. सी. चटर्जी आदी हिंदुत्ववादी नेत्यांचा देशाच्या फाळणीला तीव्र विरोध केला होता. पण त्यावेळी त्यांना काँग्रेसच्या आणि मुस्लिम लीगच्या नेत्यांची साथ मिळाली नव्हती. 1940 च्या दशकामध्ये शरद बाबू यांच्यासारखे आक्रमक नेतृत्व बंगाली समाजाला लाभले असते आणि त्यात अखिल भारतीय पातळीवर सावरकर, डॉ. मुखर्जी आदी नेत्यांचा त्यांना भरवक्कम पाठिंबा मिळाला असता, तर हिंदुस्थानचे 1947 चे राजकीय मानचित्र कदाचित वेगळे दिसले असते. हा भाबडा आशावाद नाही किंवा भाबडे स्वप्नरंजनही नाही. वर उल्लेख केलेल्या सर्व नेत्यांच्या राजकीय जीवन चरित्राचा आधार घेऊन हे निश्चितपणे म्हणता येईल, की फाळणीच्या मुद्द्यावर या सर्व नेत्यांकडे “प्रॅक्टिकल ऍप्रोच होता आणि प्रॅक्टिकल सोल्युशन” देखील होते. दुर्दैव असे की ते त्याकाळी सत्ताधारी होऊ शकले नाहीत आणि शरद बाबू हयात नव्हते!!… अन्यथा…!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App