वृत्तसंस्था
भोपाळ : काँग्रेसमध्ये अंतर्गत घमासान माजली असताना सकाळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सरकारी कार्यक्रमात स्तुती केली. राजस्थानच्या विकासात मदत मागितली, तर सायंकाळी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, राज्यसभेचे विद्यमान खासदार दिग्विजय सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची तारीफ केली. Modi’s praise from Gehlot in the morning; Shah’s compliment from Digvijay Singh in the evening
नर्मदा परिक्रमेवरच्या एका पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी आणि त्यांची पत्रकार पत्नी यांनी 2017 मध्ये नर्मदा परिक्रमा केली होती. त्यावेळी गुजरात मधल्या जंगल भागात ते रात्री उशिरा पोहोचले. तेव्हा वनक्षेत्राचे अधिकारी तेथे येऊन पोहोचले आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही व्यवस्था करायला सांगितले होते असे त्यांनी आपल्याला सांगितले होते, अशी आठवण दिग्विजयसिंग यांनी सांगितली.
त्याच यात्रेदरम्यान अनेक ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते देखील त्यांना भेटत होते. त्यांच्या निवासाची व्यवस्था करत होते. त्यावेळी दिग्विजयसिंग यांनी त्यांना विचारले देखील की हे सगळे संघाचे स्वयंसेवक का करतात?, तर स्वयंसेवकांनी त्यांना सांगितले की त्यांना तसे आदेश आले आहेत. दिग्विजय सिंग म्हणाले, की हे मी एवढ्यासाठी सांगतो आहे की राजकारण वेगळे आणि एखाद्याच्या धार्मिक भावना वेगळ्या. या दोन्हींची गल्लत कोणी करता कामा नये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा मी कट्टर टीकाकार राहिलो आहे. तरी देखील त्यांनी माझ्या धार्मिक यात्रेत मला मदत केली, हे मला आवर्जून सांगायला पाहिजे. मी अमित शहांना अजून भेटलेलो नाही. पण वेगळ्या पद्धतीने मी त्यांचे आभार मानले आहेत, याची आठवणही दिग्विजयसिंग यांनी करून दिली.
आजच्या दिवसभरातील ही दुसरी घटना आहे. सकाळी राजस्थानच्या विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन सहभागी झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी त्यांच्याकडे राजस्थानच्या विकासाचा प्रकल्पांसाठी मदत मागितली. ती त्यांनी ताबडतोब देऊ केली. गेहलोत त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असे मोदी म्हणाले. काँग्रेस आणि भाजप यांच्यातून विस्तव जात नसताना दोन वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी भाजपच्या दोन सर्वोच्च नेत्यांचे गुणगान करणे याकडे सध्याची काँग्रेस हायकमांड कोणत्या दृष्टीने बघते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App