एका युगाचा अंत झाला!!, नरसिंह राव शिष्य डॉ. मनमोहन सिंग कालवश झाले. ते राज्यसभेतून निवृत्त झाले, त्यावेळी सोनिया गांधी आणि राहुलने नव्हे, तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्र लिहून केली कृतज्ञता व्यक्त केली होती!! Manmohan Singh
माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी भारताच्या सार्वजनिक राजकीय जीवनात आणलेले अर्थमंत्री भारतीय आर्थिक सुधारण्याचे कार्यवाहक आणि भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग राज्यसभेतून आधीच निवृत्त झाले होते. काल त्यांनी जगातून एक्जिट घेतली. ते वयाबरहुकूम राजकारणातून निवृत्त झालेच होते, पण 3 एप्रिल 2024 रोजी ते अधिकृत रित्या राज्यसभेतून निवृत्त झाले. त्यामुळे मनमोहन सिंग यांची 5 दशकांची राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थाने संपुष्टात आली होती.
पण मनमोहन सिंग लक्षात राहिले, ते भारतीय आर्थिक सुधारणांचे कार्यवाहक म्हणून!! या मागची सगळी प्रेरणा पी. व्ही. नरसिंह राव यांची होती. देशाच्या अर्थव्यवस्थेतले सगळे राजकीय अडथळे दूर करण्याचे काम नरसिंह राव यांनीच केले होते. कारण मनमोहन सिंग यांना जे कठोर निर्णय घ्यावे लागले, ते कठोर निर्णय घेणे त्यांना एकट्याला शक्य नव्हते. त्याचे राजकीय परिणाम भोगण्याची त्यांची क्षमता नव्हती किंवा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ती घडण नव्हती. कारण ते राजकारणी नव्हते, तर निष्णात अर्थतज्ज्ञ आणि प्रशासक होते.
पण मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री बनवताना नरसिंह राव यांनी त्यांचा राजकीय आत्मविश्वास वाढविला. आर्थिक सुधारणा धोरण राबवताना त्यांच्यावर होणारे सगळे राजकीय वार आपल्या अंगावर झेलले आणि मनमोहन सिंग यांना आर्थिक पातळीवर कठोर निर्णय घेण्याची संपूर्ण मोकळीक आणि राजकीय स्वातंत्र्य दिले होते. त्या पायावरच आजच्या भारताच्या बळकट अर्थव्यवस्थेचा डोलारा उभा आहे. यात नरसिंह राव आणि मनमोहन सिंग या अत्यंत बुद्धिमान नेत्यांचा सिंहाचा वाटा आहे.
– एक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर
मनमोहन सिंग कारकिर्दीच्या दुसऱ्या टप्प्यात देशाचे पंतप्रधान बनले, पण मनमोहन सिंग यांना नरसिंह राव यांनी देशाचे अर्थमंत्री बनविणे आणि सोनिया गांधींनी त्यांना देशाचे पंतप्रधान करणे यामध्ये प्रचंड गुणात्मक तफावत होती. मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री म्हणून नरसिंह राव यांनी जेवढी मोकळीक आणि स्वातंत्र्य दिले, त्याचा मागमूसही त्यांच्या पंतप्रधान काळाच्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत शिल्लक उरला नव्हता. मनमोहन सिंग 5 वर्षे अर्थमंत्री आणि 10 वर्षे पंतप्रधान होते, पण त्यांचे 5 वर्षांचे अर्थमंत्री पद हे जास्त देदीप्यमान होते. देशाच्या अर्थ आणि राजकीय व्यवस्थेवर सर्वाधिक दूरगामी आणि खोलवर परिणाम करणारे होते. त्या उलट त्यांचे पंतप्रधान पद हे दुर्दैवाने “एक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर” सारखे होते. याचे राजकीय कारण संपूर्णपणे वेगळे, पण बौद्धिक कारण मात्र ज्या पद्धतीने नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांची “बौद्धिक वेव्हलेंग्थ’ जुळली, तशी मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांची कधीच जुळू शकली नाही. उलट राहुल गांधींसारख्या नेत्यांकडून ऑर्डिनन्स फाडण्याची अपमानास्पद घटना त्यांना पंतप्रधान पदावर असताना सहन करावी लागली.
डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान म्हणून वैयक्तिक पातळीवर कुठल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाला कधी सामोरे जावे लागले नाही, पण आपल्या मंत्रिमंडळातल्या भ्रष्ट मंत्र्यांवर नियंत्रण राखणे हे त्यांना सोनिया गांधींच्या काँग्रेसच्या राजकीय व्यवस्थेने करू दिले नाही. उलट सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखालची “नॅशनल ॲडव्हाइसरी कौन्सिल” ही घटनाबाह्य परिषद मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळाची “पॉलिटिकल बॉस” म्हणावी इतपत प्रभावी बनून वावरली होती. यात मनमोहन सिंग यांची वैयक्तिक मर्यादा केवळ दाखवायची किंवा टोचायची म्हणून नव्हे, पण राजकीय वस्तुस्थिती मात्र दुर्दैवी असली तरी जळजळीत होती हे नाकारून चालणार नाही!!
त्याउलट डॉ. मनमोहन सिंग यांचे देशातल्या सर्वपक्षीय बुद्धिमान नेत्यांची उत्तम संबंध राहिले. अगदी अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या उजव्या नेत्यांपासून ते ज्योती बसू यांच्यासारख्या पूर्ण डाव्या नेत्यांपर्यंत मनमोहन सिंग यांचे संबंध विशिष्ट बौद्धिक दर्जा राखूनच राहिले. 1991 चे आर्थिक सुधारणांचे पहिले बजेट मांडताना त्यांनी ज्या कर सवलती दिल्या, त्यावेळी त्यांचा उल्लेख करताना त्यांनी मोटारींवरची कर सवलत ही सूचना “WB” कडून आली आहे, असा उल्लेख केला. त्यावेळी लोकसभेत हजर असलेल्या अनेकांना हा “World Bank” चा दबाव असल्याचे वाटले, पण मनमोहन सिंग यांनी ताबडतोब खुलासा केला, हे “WB” म्हणजे “World Bank” नव्हे, तर West Bengal आहे!! त्यावेळी पश्चिम बंगालमध्ये ज्योती बसू मुख्यमंत्री होते आणि त्यांची कम्युनिस्ट पार्टीची राजवट होती. त्यांच्या सरकारने मोटारींवरच्या कर सवलतीची सूचना केली होती आणि ती अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांनी स्वीकारली होती.
इतकेच नाहीतर आजच्या भारतातला सर्वात वादग्रस्त राजकीय मुद्दा म्हणजे राहुल गांधींनी केलेल्या सावरकरांच्या अपमानाचा… पण डॉ. मनमोहन सिंग यांनी एका पत्रकार परिषदेत सावरकर मुद्द्यावर काँग्रेसच्या दृष्टिकोनातून अतिशय सटीक भाष्य केले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांना काँग्रेस “देशभक्त” जरूर मानते. इंदिरा गांधींनी सावरकरांवर टपाल तिकीट प्रकाशित केले होते, पण काँग्रेस सावरकरांच्या हिंदुत्व मुद्द्याशी सहमत नाही, असे मनमोहन सिंग त्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते. सावरकर मुद्द्यावर गंभीर राजकीय मतभेद कुठे व्यक्त करायचे, याचा हा राजकीय वस्तूपाठ त्यांनी घालून दिला होता. सावरकरांच्या हिंदुत्व मुद्द्याला विरोध करताना त्यांची देशभक्ती किंवा त्यांनी भोगलेला तुरुंगवास, त्यांचे योगदान नाकारायचे काहीच कारण नाही, हेच मनमोहन सिंग यांनी इंदिरा गांधींचा हवाला देऊन अप्रत्यक्षपणे राहुल गांधींना सूचित केले होते. पण राहुल गांधींनी मनमोहन सिंग किंवा त्यांची आजी इंदिरा गांधी यांचे अजिबात ऐकले नाही. हा नजीकचा इतिहास आणि वर्तमान आहे.
History will always remember Dr Manmohan Singh Ji for his dignified demeanour, commitment to public service, profound wisdom and humility. He leaves behind a legacy of economic reforms, political stability, and dedication to uplifting the lives of every Indian. His tenure first… pic.twitter.com/lN67uGMs6U — ANI (@ANI) December 26, 2024
History will always remember Dr Manmohan Singh Ji for his dignified demeanour, commitment to public service, profound wisdom and humility. He leaves behind a legacy of economic reforms, political stability, and dedication to uplifting the lives of every Indian. His tenure first… pic.twitter.com/lN67uGMs6U
— ANI (@ANI) December 26, 2024
डॉ. मनमोहन सिंग यांचे राजकीय दृष्ट्या काही प्रमाणात सोनिया गांधींशी पटले. कारण तसे पटवून घेणे दोन्ही नेत्यांना अपरिहार्य होते, पण राहुल गांधींच्या बाबतीत मात्र बिलकुलच तसे नव्हते. राहुल गांधींनी मनमोहन सिंग सरकारचा एक ऑर्डिनन्स भर पत्रकार परिषदेत फाडला, हा त्यांच्या सरकारचा अपमान होता. तो त्यांना सहन करावा लागला. त्यावर त्यांना काही बोलता आले नाही ही मनमोहन सिंग यांची राजकीय शोकांतिका होती.
पण मनमोहन सिंग यांची कारकीर्द ही शोकांतिकेत संपली नाही. आपले राजकीय कर्तव्य पूर्ण केल्यानंतरच संपली. 370 कलमावर राज्यसभेत मतदानाच्या वेळी मनमोहन सिंग आवर्जून हजर राहिले. वास्तविक त्यावेळी त्यांची तब्येत बरी नव्हती. मतदानाचा निकाल काय लागणार हे त्यांना निश्चित माहिती होते, तरी देखील त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली नाही. याचा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात आवर्जून केला होता.
मनमोहन सिंग यांची राजकीय कारकीर्द दैदिप्यमानच राहिली. पण मनमोहन सिंग यांची कारकीर्द संपताना सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी नव्हे, तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एक भावपूर्ण पत्र लिहून त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली होती. ही बाब देखील विशेषत्वाने अधोरेखित केली पाहिजे!!
वास्तविक राजकीय अपरिहार्यतेपोटी का होईना, पण सोनिया गांधींनी मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी नेमले, याचे खरे कारण त्यांना प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान पदावर बसवायचे नव्हते. प्रणव मुखर्जी डोईजड होण्याची भीती सोनिया गांधींना वाटत होती. मनमोहन सिंग यांच्या बाबतीत ती भीती नव्हती. कारण ते राजकारणी नव्हते.
मनमोहन सिंग यांनी 10 वर्षे इमाने इतबारे आपला इतमाम राखून पंतप्रधानपद सांभाळले. पण तरी सोनिया गांधींनी त्यांना निवृत्तीनंतर पत्र लिहिल्याचे दिसत नाही. राहुल गांधींनी त्यांना तसे पत्र लिहिणे हे संभवतच नव्हते, पण म्हणून मनमोहन सिंग यांची कारकीर्द ही झाकोळलेली ठरत नाही. ती उज्ज्वलच होती. कारण ते नरसिंह राव यांचे शिष्य होते आणि भारतीय आर्थिक सुधारणांचे कार्यवाहक होते!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App