विशेष प्रतिनिधी
जयपूर : राजस्थानमधील करौली येथे हिंदू नववर्षानिमित्त काढण्यात आलेल्या बाईक रॅलीवर हटवारा मार्केटमध्ये एका विशिष्ट समुदायाने दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हल्लेखोरांनी डझनहून अधिक दुकाने आणि तीन दुचाकी पेटवून दिल्या आहेत. बिघडलेली परिस्थिती पाहता बाजारपेठ बंद ठेवून शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. Ethnic riots at Karauli in Rajasthan Stone throwing at a bike rally on the occasion of Hindu New Year
आतापर्यंत पोलिसांसह ४३ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. पुष्पेंद्र नावाच्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला जयपूरला रेफर करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या जखमींच्या शरीरावर चाकूने वार केल्याच्या खुणा आहेत. मात्र, डॉक्टर अद्याप काहीही सांगण्यास नकार देत आहेत.
जिल्हाधिकारी डॉ मोहनलाल यादव आणि पोलीस अधीक्षक, एसपी शैलेंद्र सिंग इंडोलिया घटनास्थळी उपस्थित असून बिघडलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. घटनास्थळासोबतच संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
येथे वातावरण बिघडताच नववर्षानिमित्त काढण्यात येणारी बाईक रॅली रद्द करण्यात आली आहे. पोलिसांवर दगडफेक झाल्याचीही माहिती समोर येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कलम १४४ लागू केले आहे. या जाळपोळीत आतापर्यंत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची चर्चा आहे. करौलीतील बिघडलेली परिस्थिती पाहता पोलीस महासंचालक, आयजी आणि आमदार लखन सिंह हेही जयपूरहून करौलीला रवाना झाले आहेत.
दुचाकी रॅलीवर झालेल्या दगडफेकीत रॅलीसोबत असलेले चार पोलीस जखमी झाले आहेत. यानंतर सुरू झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत ४३ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमी व्यक्तीला जयपूरला रेफर करण्यात आले आहे. दुसरीकडे रुग्णालयात पोहोचलेल्या काही जखमींच्या अंगावर वार केल्याच्या खुणा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
करौलीतील बिघडलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून ५० पोलीस अधिकारी आणि ६०० हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. एडीजी संजीब नरझारी, आयजी भरत मीना, डीआयजी राहुल प्रकाश आणि एसपी मृदुल कचवाह, आयजी भरतपूर प्रफुल्ल कुमार खमेसरा आणि आयजी कायदा आणि सुव्यवस्था भरत मीना घटनास्थळी उपस्थित आहेत आणि लवकरात लवकर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अतिरिक्त महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था हवा सिंग घुमरिया यांनीही लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
बाईक रॅलीवर समाजकंटकांकडून दगडफेक आणि जाळपोळ झाल्याची घटना पोलिसांच्या अदूरदर्शीपणा आणि निष्क्रियतेचा परिणाम असल्याचे विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड म्हणाले. ते म्हणाले की, रॅलीबाबत प्रशासनाला आधीच माहिती होती, मग समाजकंटकांना का जमू दिले? समाजकंटकांसमोर पोलिस असफल झाले. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App