विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार हे स्वागताध्यक्ष म्हणून दिल्ली मराठी साहित्य संमेलनाचा मोठा गाजावाजा झाला. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या कालच्या पुरस्कार सोहळ्यामुळे त्यात राजकीय वादाची भर पडली, पण एवढे सगळे घडत असताना प्रत्यक्षात दिल्लीच्या मराठी साहित्य संमेलनात साहित्य विषयक कार्यक्रमांचा बोजवारा उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण साहित्य संमेलन अवघ्या १० दिवसांवर आले असताना त्याची तपशीलवार कार्यक्रम पत्रिकाच संयोजकांनी अद्याप जाहीर केलेली नाही.Delhi Marathi sahitya sammelan igonres literary programs
दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियम मध्ये 21 ते 23 फेब्रुवारी असे तीन दिवस अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार आहे. प्रख्यात संशोधक तारा भवाळकर त्याचा अध्यक्षस्थानी असणार आहेत. अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि पुण्याची सरहद संस्था त्यांनी संयुक्तपणे हे 98 वे साहित्य संमेलन भरविले आहे. यापूर्वी दिल्लीत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली 1954 मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी त्या संमेलनाला भेट दिली होती. त्यानंतर तब्बल 71 वर्षांनी दिल्लीत मराठी साहित्य संमेलन होत आहे. संयोजकांनी नेहमीप्रमाणे शरद पवार यांची यात महत्त्वाची भूमिका ठेवली आहे. त्यांना साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष केले आहे. त्यामुळे दिल्लीतल्या साहित्य संमेलनाला विशेष महत्त्व मिळेल असा संयोजकांचा होरा आहे.
परंतु, प्रत्यक्षात संयोजकांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची साहित्य विषयक सविस्तर कार्यक्रम पत्रिका अद्याप जाहीरच केलेली नाही. त्यामुळे साहित्य संमेलनात नेमके कोणत्या विषयांवर परिसंवाद, चर्चासत्रे, मुलाखती होणार??, त्यामध्ये कोणते साहित्यिक सहभागी होणार??, कवी संमेलन आणि अन्य कुठले कार्यक्रम होणार??, याविषयी मराठी साहित्य रसिक पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संमेलनाला उपस्थित राहणार आणि समारोपाला उपमुख्यमंत्री अजित पवार येणार एवढाच तपशील संयोजकांनी जाहीर केला आहे. संमेलनाला येणारे नेते, अभिनेते आणि अन्य सेलिब्रिटी आणि यांच्या वेळा आणि तारखा निश्चित होत नसल्यामुळे तपशीलवार कार्यक्रम पत्रिका जाहीर करायला वेळ लागत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पवारांच्या मालकीचे वृत्तपत्र असलेल्या सकाळने ही बातमी दिली आहे. त्यामुळे शरद पवार स्वागताध्यक्ष असलेल्या दिल्ली साहित्य संमेलनात साहित्य विषयक कार्यक्रमांचा बोजवारा उडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App