सोनिया गांधींनी आपले राजकीय चातुर्य वापरत “यूपीए” नाव टाकून देत विरोधकांच्या आघाडीला नवे I.N.D.I.A नाव घेतले. त्याच्या एकापाठोपाठ एक तीन बैठका घेतल्या. निदान यातून तरी विरोधकांच्या आघाडीला राजकीय बूस्टर डोस मिळेल, अशी अपेक्षा त्यांची होती. पण तसे काहीच घडताना दिसत नाही. त्या उलट I.N.D.I.A आघाडीचे घटक पक्ष नसते मुद्दे उकरून त्याचे आयते मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती देत आहेत. Criticism of sanatan dharma and boycott of 14 anchors proved political mess in I.N.D.I.A
I.N.D.I.A आघाडीतील घटक पक्षांची 11 राज्ये आणि तिथले स्थानिक मुद्दे सोडून द्या, पण देशपातळीवर आघाडीतल्या घटक पक्षांनी आपल्या राजकीय मूर्खपणातून जे दोन मुद्दे मोदींच्या हाती सोपविले, त्याकडे तरी निदान आघाडीतल्या अतिवरिष्ठ नेत्यांनी नीट लक्ष दिले असते, तर बरे झाले असते, असे म्हणायची वेळ आघाडीतल्याच नेत्यांनी आणली आहे. सनातन धर्मावरची टीका आणि 14 अँकर्सवर बहिष्कार हे ते दोन मुद्दे होत.
वास्तविक 2024 च्या निवडणुका जवळ आलेल्या असताना आणि मोदी स्वतःचा हिंदुत्ववादी अजेंडा राबवत असले तरी तशी भाषा न वापरता उलट, “सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास” अशी सर्वसमावेशी भाषा वापरत असताना I.N.D.I.A आघाडीचे नेते कारण नसताना सनातन धर्माच्या पाठीशी हात धुवून मागे लागले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांचे चिरंजीव उदयनिधी यांनी सनातन धर्मावर अनावश्यक आणि अनाठायी टीका केली. सनातन धर्माला त्यांनी डेंगी, मलेरिया, कोरोना अशी वाट्टेल तशी नावे ठेवली.
वास्तविक सनातन धर्म काय किंवा अन्य कोणताही धर्म काय त्याची बौद्धिक चिकित्सा करताना त्यावर अनाठायी टीका करण्याची गरजच नव्हती. कारण त्यातून सनातन धर्माच्या चिकित्सेचा उद्देश तर साध्य झाला नाहीच, उलट तो मुद्दा I.N.D.I.A आघाडीच्या नेत्यांवरच बुमरँग झाला. जी 20 परिषद यशस्वी झाल्यानंतर मोदींनी मध्य प्रदेशात जी पहिली सभा घेतली, त्यात मोदींनी सनातन धर्माचा मुद्दा अचूक उचलला आणि I.N.D.I.A आघाडीला बॅकफूटवर ढकलले.
तसेही तामिळनाडूत सनातन धर्मावरच्या टीकेचे जोरदार प्रतिसाद पडसाद म्हटल्यामुळे स्टालिन यांना माघार घ्यावी लागली होतीच. पण त्यात मोदींनी I.N.D.I.A आघाडीला ठोकून काढल्यानंतर आघाडीतल्या सगळ्याच नेत्यांना बॅकफूटवर जावे लागले. ज्या मूळ मुद्द्याची खरं म्हणजे बिलकुलच गरज नव्हती, ती सनातन धर्मावरची टीका I.N.D.I.A आघाडीच्याच अंगावर आली!!
जे सनातन धर्मावरच्या अनाठायी टीकेचे, तेच 14 अँकर्सवरच्या बहिष्कारचे. वास्तविक हा बहिष्कार नसून हे चर्चेतून पलायन आहे. ज्या कार्यक्रमांना प्रवक्त्यांना जायचे नाही किंवा पाठवायचे नाही, हे खरं म्हणजे बिनबोभाट करता आले असते. हा प्रयोग काँग्रेसने काही वर्षांपूर्वी केला होता. साधारण महिनाभर काँग्रेसने आपल्या प्रवक्त्यांना टीव्ही डिबेट मधून दूर केले होते. त्याची काही विशिष्ट कारणे सांगितली होती आणि त्या कारणांचा काँग्रेसवर कोणताही दुष्परिणाम झाला नव्हता.
पण त्या उलट 14 अँकर्स वर बहिष्कार घालताना त्याचा डंगोरा पिटण्यात आला. त्यामुळे माध्यमांसह मोदींच्या हाती दुसरा आयता मुद्दा आला. पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद घेत नाही म्हणून हेच विरोधक त्यांच्यावर टीका करतात आणि तेच विरोधक आता 14 अँकर्सच्या कार्यक्रमांवर बहिष्कार घालतात ही मोठी विसंगती आहे.
आणखी एक विसंगती त्यापलीकडची आहे. ज्या अविष्कार स्वातंत्र्याच्या नावाने I.N.D.I.A आघाडीतल्या नेत्यांनी आणि लिबरल जमातीने आविष्कार ढोल पिटले होते, त्याच आघाडीतल्या नेत्यांनी अथवा प्रवक्त्यांनी 14 अँकर्सच्या कार्यक्रमांवर बहिष्कार घालणे हे चर्चेला भिऊन पळून जाण्यासारखे आहे. वास्तविक या प्रत्येक अँकरच्या कार्यक्रमांमध्ये जाऊन त्यांचा परिणामकारक प्रतिवाद करता येऊ शकतो. ते फारसे अवघड नाही किंवा एक उत्तम “पॉलिटिकल एस्केप रूट” म्हणून दुय्यम – तिय्यम दर्जाचे प्रवक्ते त्या अँकर्सच्या डिबेटमध्ये पाठवून देता येऊ शकतात. पण हे राजकीय चातुर्य देखील I.N.D.I.A आघाडीतल्या मातब्बर नेत्यांना दाखविता आले नाही. उलट अँकर्स वरच्या बहिष्काराचा मुद्दा I.N.D.I.A आघाडीतल्या नेत्यांनी स्वतःहून पुढे आणला आणि स्वतःच्याच पायावर राजकीय धोंडा पाडून घेतला!!
आता त्यांच्या मागे लिबरल जमातीने कितीही बौद्धिक बळ उभे केले अथवा सोशल मीडियातून “बौद्धिक कव्हर फायर” केले, तरी त्याचा उपयोग होणार नाही. कारण हा मुद्दा भाजपने उचलला आहे. त्यांनी इंदिरा गांधींच्या काळात माध्यमांवर बंधने आणि राहुल गांधींच्या काळात माध्यमांवर बहिष्कार अशी जोडणी केली आहे आणि त्याला I.N.D.I.A आघाडीकडे उत्तर नाही.
केवळ गोदी मीडिया म्हणून त्यावर टीका करून भागणार नाही. त्याचा परिणामकारक प्रतिवाद करावा लागेल. वास्तविक भाजप किंवा उजव्या विचारसरणीचा थिंक टॅंक मिळाला घाबरतो असे पर्सेप्शन जगभर आहे. पण इथे उलटेच झालेले दिसते. I.N.D.I.A आघाडीतलेच नेते मीडियाला घाबरून बहिष्काराच्या नावाने पलायन कर्ते झाले. त्यामुळेच वर दिलेले शीर्षक चपखल ठरते. इंडिया आघाडीच्या चुकत्या चाली, आयते मुद्दे मोदींच्या हाती!!, हेच I.N.D.I.A आघाडीच्या नेत्यांच्या राजकीय वर्तणुकीतून खरे ठरत आहे!!… I.N.D.I.A आघाडीतले नेते आणि त्यांना “बौद्धिक कव्हर फायर” देणारे लिबरल म्होरके भाजप समर्थकांना मोदींचे अंध भक्त म्हणतात. पण हे विरोधकच मोदींचे अंधविरोध भक्त बनले आहेत, हे त्यांना स्वतःलाच समजत नाही!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more