विनेशनेही आज कुस्तीतून निवृत्ती देखील जाहीर केली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट ( Vinesh Phogat )अजूनही रौप्य पदक मिळवू शकते की नाही याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील ५० किलो गटाच्या अंतिम सामन्यातून अपात्र ठरल्यानंतर फोगटने क्रीडा लवादाच्या न्यायालयात अपील दाखल केले होते. विनेशच्या खटल्यात सीएएसचे चार वकील तिची बाजू मांडणार आहेत. विनेशच्या पदकाबाबत २४ तासांत निर्णय घेतला जाऊ शकतो. त्याचवेळी विनेशनेही आज (8 ऑगस्ट) कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली.
विनेश फोगटने बुधवारी पॅरिस ऑलिम्पिक फायनलमधून तिला अपात्र ठरवल्याच्या विरोधात सीएएसकडे अपील केले आणि तिला संयुक्त रौप्य पदक देण्याची मागणी केली. CAS 24 तासांत निर्णय देणार आहे. हे अपील 7 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 8.15 वाजता करण्यात आले आहे. ही वेळ लक्षात घेऊन निर्णयाची प्रतीक्षा केली जात आहे.
पॅरिस ऑलिम्पिकच्या ५० किलो फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट सहभागी होती. एकाच दिवसात तीन स्फोटक सामने जिंकून विनेशने फायनलमध्ये प्रवेश केला होता. कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय ठरली, परंतु अंतिम सामन्यापूर्वी तिचे वजन ५० किलो पेक्षा १०० ग्रॅम अधिक आढळल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. नियमांनुसार आता तिला कोणतेही पदक मिळणार नाही आणि ती या स्पर्धेत शेवटच्या स्थानावर राहणार आहे. मात्र आता तिने सीएएसकडे दाद मागितली आहे.
याशिवाय विनेश फोगटनेही कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करून तिने कुस्तीला कायमचा निरोप दिला आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले – आई, माझ्याकडून कुस्ती जिंकली, मी हरले, मला माफ कर. तुझे स्वप्न, माझे धैर्य, सर्व तुटले, माझ्याकडे यापेक्षा जास्त ताकद नाही. अलविदा कुस्ती 2001-2024 मी तुम्हा सर्वांचा सदैव ऋणी राहीन, क्षमस्व.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more