विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : स्वत:च्या मतदारसंघाची जबाबदारी पत्नीवर सोपवून भाजपच्या प्रचारासाठी संपूर्ण राज्यात फिरणारे बिस्वजित सिंग यांना मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाचे बक्षीस मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मणिपूरमध्ये भाजपने प्रथमच स्वबळावर बहुमत मिळवले. यामागे बिस्वजित सिंग यांचे प्रयत्न महत्वाचे ठरले आहेत.Biswajit Singh to get Manipur CM post
मणिपूरमध्ये भाजपने 32 जागा जिंकून सत्ता राखली आणि 60 सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसला केवळ पाच जागा जिंकता आल्या. नॅशनल पीपल्स पाटीर्ने सात, जनता दल (युनायटेड) सहा, नागा पीपल्स फ्रंटने पाच, कुकी पीपल्स अलायन्सने दोन आणि अपक्षांनी तीन जागा जिंकल्या आहेत.
भाजपने मुख्यमंत्री बिरेन सिंग यांच्यासोबत मुख्य चेहरा म्हणून निवडणूक लढवली होती, परंतु पुढील मुख्यमंत्रिपदावर पक्षाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. बिरेन सिंग यांनी बुधवारी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती आणि याला सौजन्य भेट असे म्हटले होते.
थोंगम बिस्वजित सिंग यांनी सुमारे सहा वर्षांपूर्वी तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. या काळात राज्यातील प्रभावी भाजपचे नेते म्हणून त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. ते 2017 मध्ये मुख्यमंत्रीपदासाठी शर्यतीत होते. मात्र, त्यांनी एन बिरेन सिंग यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता.
बिस्वजित सिंग यांना सरकारमध्ये महत्त्वाची खाती देण्यात आली होती. चार वेळा आमदार राहिलेले, बिस्वजित सिंह यांनी 2017 मध्ये नागा पीपल्स फ्रंट आणि नॅशनल पीपल्स पार्टी यांच्याशी भाजपच्या युतीवर शिक्कामोर्तब करून सीमावर्ती राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील पहिले सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
बिस्वजित सिंग यांनी थोंगजू येथून यंदाची विधानसभा निवडणूक जिंकली. त्यांच्या समर्थकांनी सांगितले की त्यांनी त्यांच्या मतदारसंघात प्रचार केला नाही आणि इतर जागांसाठी वेळ दिला आणि त्यांच्या पत्नीने त्यांचा प्रचार केला. बिस्वजित सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, त्यांना पक्षांतर विरोधी कायद्यानुसार अपात्र ठरवण्यात आले आणि पोटनिवडणूक मोठ्या फरकाने जिंकली.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, जे नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्स चे संयोजक आहेत, यांनी अलीकडेच राज्यात भाजपला मजबूत करण्यासाठी बिस्वजित सिंग यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले होते. विश्वजितने दिलेले योगदान कमी मानले जाऊ शकत नाही. मणिपूरमध्ये जेव्हा जेव्हा एखादी समस्या उद्भवली तेव्हा त्यांनी मला ताबडतोब फोन केला आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारशी बोलण्यास सांगितले. मणिपूरच्या जनतेच्या ह्रदयात ते आहेत असे सरमा म्हणाले होते.
काँग्रेस राजवटीत अनेक घोटाळे उघड करण्याचे श्रेयही बिस्वजित सिंग यांना जाते. राज्यातील भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवडणुकीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची निरीक्षक आणि कायदा मंत्री किरेन रिजिजू यांची सहनिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पुढील आठवड्याच्या सुरुवातीला ही बैठक इंफाळमध्ये होण्याची शक्यता आहे. बिस्वजित सिंग यांनाही त्यांच्या समर्थनार्थ आमदारांमध्ये चांगला दबदबा असल्याचे दिसून येत आहे आणि पुढील मुख्यमंत्रिपदाच्या निवडीबाबत चर्चा सुरू आहे.
बिस्वजित सिंग यांनी गुरुवारी राज्याच्या पुढील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आपल्याबद्दलच्या अंदाजांवर भाष्य करण्यास नकार दिला होता. ते म्हणाले, मला यावर भाष्य करायचे नाही. आमच्यात कोणताही गट नाही, हे निश्चित आहे. भाजप हा लोकशाहीवादी पक्ष आहे आणि नेतृत्वच मुख्यमंत्री ठरवेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App