विशेष प्रतिनिधी
नागपूर : लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नसल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Amit Shah ) यांनी भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना मतांमध्ये कशी वाढ करायची याचा कानमंत्र दिला. गावागावांमध्ये सरपंच माजी सरपंच तसेच सरपंच पदाच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार यांना पक्षाशी जोडून घ्या त्यांना विशिष्ट काम आणि जबाबदारी द्या प्रत्येक बूथ वर 10 % मतदान वाढवायचा प्रयत्न करा. या गोष्टींचा त्यामध्ये समावेश आहे.
भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज भाजपच्या कार्यकर्ता संवाद बैठकीसाठी नागपुरात आले होते. कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने अमित शाह यांनी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. विशेष म्हणजे महायुतीत आणि भाजपात उमेदवार दिल्यानंतर पक्षातील नेत्यांनी बंडखोरी न करण्याचं त्यांनी बजावलं आहे. कुठल्याही परिस्थितीत बंडखोरी खपवून घेणार नाही, असा इशाराच शाह यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
अमित शाह यांनी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत नागपूरमध्ये बैठक घेतली. त्यामध्ये, विधानसभा निवडणुकांची रणनीती आणि मार्गदर्शन केले. मतदारसंघातील बूथवर विशेष लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी पदाधिकारी व नेत्यांना केलं. भाजपला विदर्भच महाराष्ट्राची निवडणूक जिंकून देईल, असे अमित शाह यांनी म्हटल्याचे नागपूर भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी सांगितले.
गटबाजी अजिबात चालणार नाही
गाव पातळीवर निवडणूक हरलेल्या सरपंचपदाच्या उमेदवारांना पक्षात घेण्याचा प्रयत्न करा. विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक बूथ वर दहा टक्के मत वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. नेते हेदेखील पक्षाचे कार्यकर्तेच आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावं. केवळ कार्यकर्त्यांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही, प्रत्यक्ष बुथवर जाऊन काम करावं लागेल अशा शब्दात अमित शाह यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही बैठकीत कानपिचक्या दिल्या. प्रत्येक बूथवरील विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवरही लक्ष केंद्रित करा, त्यांना जोडण्याचे प्रयत्न करा. भाजपात विधानसभा निवडणुकांवेळी मतदारसंघात गटबाजी मुळीच खपवून घेतली जाणार आहे. उमेदवारी मिळाली नाही, म्हणून नाराजी हे मी बिलकुल सहन करणार नाही, अशा शब्दात राजी-नाराजीवर अमित शाह यांनी पदाधिकाऱ्यांना इशारा दिला.
नवरात्रीपासून कार्यकर्त्यांनी फिरावं
पुढील काही दिवसांत पुन्हा एकदा सणासुदीचे दिवस आहेत, त्यात नवरात्रीमुळे सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असणार आहे. यावेळ, कार्यक्रम व उत्सवासाठी लोकं एकत्र येतात. त्यामुळे, विजयादशमी ते धनत्रयोदशीपर्यंत प्रत्येक बुथवर तरुण कार्यकर्ते फिरले पाहिजे, अशा सूचनाही अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना केल्याची माहिती नागपूर भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App