तामिळनाडूत अण्णा द्रमूकने भाजपशी युती तोडणे म्हणजे आयता स्टार प्रचारक हातातून घालविणे!!

तामिळनाडूत अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या जयललितांच्या पक्षाने भाजपशी युती तोडली. तसे त्यांनी अधिकृतपणे जाहीर केल्यानंतर तमिळनाडू भाजपने आपल्या कार्यालयासमोर फटाके फोडले. पण अण्णा द्रमुकने युती तोडल्यामुळे तामिळनाडूत भाजपचे त्यामुळे किती नुकसान होईल, या बातम्यांचा रतीब माध्यमांनी घातला आहे. पण तो रतीब घालताना माध्यमांनी तामिळनाडूच्या पारंपारिक राजकारणाचाच फक्त विचार केला आहे. त्यापलीकडे त्या बातम्यांमध्ये अन्य काही सापडत नाही. कारण तामिळनाडूतले राजकारण हे द्विपक्षीयच आहे आणि ते द्विपक्षीय कायम राहणार आहे हे गृहीतक मनात ठेवून भाजपच्या नुकसानीचा अंदाज माध्यमांनी मांडला आहे. AIADMK will may prove a major losser by snapping ties with BJP in tamilnadu, as they will loose star campaigner like PM Modi

पण मूळात जो भाजप तामिळनाडू राजकीय दृष्ट्या शून्यावस्थेत आहे, त्याचे नुकसान होऊन होऊन किती होईल?? तो काही मायनस मध्ये जाईल का?? याचा साधा विचारही माध्यमांनी केलेला दिसत नाही. म्हणजे तामिळनाडू विधानसभेत भाजपचे आज फक्त 4 आमदार आहेत, पण आधीच्या निवडणुकीत भाजपचे तिथे 0 आमदार होते. मग ते आमदार – 0 होतील का??, तर बिलकुल नाही!! गणिती हिशेबात विचार केला, तर मूळातच ज्या भाजपचे राजकीय अस्तित्व तामिळनाडू तोळामासा आहे, त्याचे नुकसान होऊन किती होणार तर ते 0 ते 4 या दरम्यानच होईल. त्यापलीकडे नाही!!

पण अण्णा द्रमुकने भाजपचे युती तोडणे याचा थोडा दीर्घकालीन विचार केला, तर मात्र यात भाजपच्या तोट्यापेक्षा अण्णा द्रमुकचा तोटा अधिक असल्याचे दिसेल. अण्णा द्रमुकने स्वतःहून भाजपशी युती तोडणे म्हणजे आयता हातात असलेला भाजपचा सर्वात मोठा स्टार प्रचारक स्वतःहून सोडून देणे होय!!… म्हणजे नरेंद्र मोदींना अण्णा द्रमूकने गमावणे होय!!

अण्णा द्रमुकाची तामिळनाडूतील सध्याची राजकीय अवस्था लक्षात घेता तो पक्ष नेतृत्वहीन आहे आणि त्यातही तो इडापड्डी पलानीस्वामी आणि ओ. पनीर सेल्वम यांच्यात विभागलेला आहे. जयललितांच्या नेतृत्वाखाली अण्णा द्रमूक जेवढा प्रभावी आणि बळकट होता, तेवढा तो 2019 च्या ही निवडणुकीत उरलेला नव्हता, ही वस्तुस्थिती आहे!! कारण 2019 च्या निवडणुकीत भाजपची साथ मिळूनही आणि नरेंद्र मोदी हे त्यांचे स्टार प्रचारक असूनही अण्णा द्रमुक पक्षाला 234 जागा असलेल्या विधानसभेत फक्त 52 आमदार निवडून आणता आले होते. वास्तविक त्या निवडणुकीआधी अण्णा द्रमुक हा पक्ष सत्ताधारी होता. जयललितांच्या निधनानंतर सुमारे तीन वर्षे इडापड्डी पलानीस्वामी तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते. म्हणजे एका हातात सत्ता आणि दुसऱ्या हाताशी नरेंद्र मोदींसारखा स्टार प्रचारक एवढे राजकीय भांडवल असूनही जयललिता यांच्या निधनानंतर त्यांना अण्णा द्रमुकचे 52 आमदारांपेक्षा जास्त आमदार निवडून आणता आले नव्हते.

त्या तुलनेत करुणानिधींच्या निधनानंतर द्रविड मुन्नेत्र कळघमची सूत्रे ज्या पद्धतीने एम. के. स्टालिन यांनी हातात घेतली, त्यांनी तामिळनाडूत अण्णा द्रमुकाचा धुव्वा उडवून दाखविला.



या पार्श्वभूमीवर 2024 च्या निवडणुकीच्या विचार केला, तर अण्णा द्रमुकचा भाजपची युती तोडण्याचा निर्णय हा भाजपचे खूप मर्यादित नुकसान करणारा असेल, पण स्वतःचे मात्र दीर्घकालीन नुकसान करणारा ठरणार असेल. कारण त्या पक्षाला ना आपल्यातली दुफळी मिटवता आली, ना पहिल्या दर्जाचे द्रविडी पक्षाचे नेतृत्व निर्माण करता आले!!

… आणि आता जेव्हा भाजप अण्णामलाईंच्या नेतृत्वाखाली तामिळनाडूमध्ये राजकीय हातपाय पसरतो आहे, त्यावेळी आपली राजकीय भूमी तो व्यापेल या भीतीतून अण्णा द्रमुकने भाजपशी युती तोडली आहे.

आता कितीही नाही म्हटले तरी भाजप दोन द्रविड पक्षांची विशिष्ट राजकीय भूमी व्यापणार हे उघड आहे. त्यातही द्रविड मुन्नेत्र कळघम ज्या पद्धतीने सनातन धर्माविरुद्ध आक्रमक द्वेषमूलक प्रचार करतो आहे, ते पाहता भाजप सनातन मुद्द्यावर तामिळनाडूत घट्ट पाय रोवून उभा राहणार हे उघड आहे. मग अशावेळी भाजपचा हात धरून राहणे हे खरे म्हणजे अण्णा द्रमुकच्या तत्कालीन लाभाचे देखील ठरले असते. पण अण्णामलाई हे अण्णाद्रमुक विरुद्ध प्रचार करतात हे कारण पुढे करून अण्णा द्रमुकने भाजपशी युती तोडली. ही युती तोडणे अण्णा द्रमुकलाच घातक ठरणार आहे.

याकडे आणखी एका वेगळ्या दृष्टीने बघता येईल ती म्हणजे, जयललिता यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत द्रविडी राजकारण केले हे खरेच. ते नाकारण्यात मतलब नाही, पण जयललितांच्या कारकिर्दीचा बारकाईने आढावा घेतला, तर त्या व्यक्तिगत पातळीवर सनातन धर्माचेच अनुसरण करत होत्या. अनेकदा नवस सायास करून राजकीय यश मिळवल्यानंतर वेगवेगळ्या मंदिरांना दानधर्म करीत होत्या. अगदी मंदिरांना हत्तींची दाने देत होत्या. त्यामुळे द्रविड मुन्नेत्र कळघम सनातन धर्मा विरोधात प्रचाराची धार वाढवित असताना अण्णा द्रमुकला जयललितांच्या व्यक्तिगत सनातन धर्माचे अनुसरण हा खरं म्हणजे राजकीय वारसा पुढे करता आला असता, पण आता तो वारसा आयता अण्णामलाईंच्या हाती जाणार आहे!! कारण अण्णा द्रमूकने भाजपशी युती तोडून जयललितांचा सनातन वारसा स्वतःहून भाजपच्या हातात दिला आहे. या अर्थाने देखील अण्णा द्रमूकचे नुकसानच आहे.

अण्णा द्रमुक तामिळनाडूत संघटनात्मक बळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. भाजपपेक्षा त्या पक्षाची संघटनात्मक ताकद सध्या जास्त आहे हे उघड आहे. पण ती ताकद “प्रभाव नेतृत्वहीन” आहे आणि नेता प्रभावी नसेल, तर त्यातून त्या ताकदीतूनही निर्णायक विजय मिळेल की नाही याविषयी दाट शंका आहे!!

उलट अण्णामलाईंच्या रूपाने तामिळनाडूत एक प्रभावी विरोधी पक्षनेता उभा राहत आहे. एम. के. स्टालिन यांना आपणच टक्कर देऊ शकतो याचा आत्मविश्वास अण्णामलाई यांनी आपल्या राजकीय वाटचालीतून निर्माण केला आहे. खरं म्हणजे पलानीस्वामी आणि पनीर सेल्वम यांना तो आत्मविश्वास निर्माण करता आला असता. पण तो त्यांनी केला नाही. त्या ऐवजी ते विभक्त राहून संघटनात्मक बळकटीच्या जोरावर अण्णा द्रमुक वाढवू पाहत आहेत. पण हे करताना त्यांना त्यांच्या अंगभूत नेतृत्वाच्या मर्यादाच आड येत आहेत. …आणि त्यातही भाजपशी युती तोडल्याची राजकीय किंमत त्यांना चुकवावी लागण्याची दाट शक्यता आहे!!

AIADMK will may prove a major losser by snapping ties with BJP in tamilnadu, as they will loose star campaigner like PM Modi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात